चेल्सी सरस

किशोर पेटकर
सोमवार, 14 जून 2021

क्रीडांगण

युरोपातील प्रतिष्ठेच्या चँपियन्स लीग फुटबॉल विजेतेपदासाठी दोन इंग्लिश संघांत पोर्तुगालमधील पोर्तो येथे लढत झाली. इंग्लिश प्रीमियर लीग जिंकलेल्या मँचेस्टर सिटीला चेल्सी क्लबने आव्हान दिले. प्रीमियर लीगमध्ये चेल्सी क्लबला चौथा क्रमांक मिळाला. अव्वल स्थानावरील मँचेस्टर सिटीपेक्षा त्याचे १९ गुण कमी होते. 

मँचेस्टर सिटीचा फॉर्म पाहता पेप ग्वार्दिओला यांच्या मार्गदर्शनाखालील मँचेस्टर सिटी प्रथमच चँपियन्स लीग जिंकेल असा होरा होता. चेल्सी क्लब अंडरडॉग्ज होता, पण अखेरीस तेच सरस ठरले. युवा जर्मन खेळाडू काई हावेर्टझ याने पूर्वार्धात नोंदविलेल्या गोलच्या बळावर चेल्सी क्लबने दुसऱ्यांदा चँपियन्स लीग करंडकावर नाव कोरले. यापूर्वी २०१२ साली ते युरोपात विजेते ठरले होते. 

चेल्सी क्लबच्या बचावफळीने मँचेस्टर सिटीच्या आक्रमणाची चांगलीच कोंडी केली, त्यामुळे ग्वार्दिओला यांच्या संघाला वर्चस्व राखता आले नाही. चेल्सी क्लबचा फ्रेंच खेळाडू न्गोलो कांटे उल्लेखनीय ठरला. त्यामुळे स्टॅमफोर्ड ब्रिजवरील संघाला आघाडी अबाधित राखता आली.

टुकल यांचे यश
जर्मन प्रशिक्षक थॉमस टुकल यांच्या मार्गदर्शनाखाली चेल्सी क्लबने यश मिळवले. ४७ वर्षीय टुकल यांनी या वर्षी जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात चेल्सी क्लबचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. फ्रँक लँपार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली संघ अपेक्षित निकाल नोंदवू शकला नाही, त्यामुळे चेल्सी क्लब व्यवस्थापन नाराज झाले. परिणामी लँपार्ड यांच्या प्रशिक्षकपदावर गदा आली. दुसरीकडे टुकल यांना फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मेन क्लबच्या (पीएसजी) व्यवस्थापनाने बाहेरचा रस्ता दाखविला होता. गेल्यावर्षी टुकल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसजी संघाने चँपियन्स लीग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती, पण जर्मनीचा बायर्न म्युनिक संघ वरचढ ठरल्याने टुकल व पीएसजी संघाचे स्वप्न भंगले. नंतर पीएसजी संघ व्यवस्थापन आणि टुकल यांच्यातील मतभेद खूपच ताणले गेले. गतवर्षी ख्रिसमसपूर्वी टुकल यांना डच्चू देण्यात आला. 

चेल्सी क्लब नव्या प्रशिक्षकाच्या शोधात होता, टुकल यांच्या निवडीने लँपार्ड यांची जागा भरून काढणारा प्रशिक्षक लाभला. या जर्मन प्रशिक्षकाने चेल्सी क्लबची धुरा स्वीकारली, तेव्हा हा संघ प्रीमियर लीगमध्ये चक्क नवव्या क्रमांकावर होता. त्यानंतर टुकल यांनी संघाला चौथ्या क्रमांकावर नेत पुढील मोसमातील चँपियन्स लीगसाठी पात्रताही मिळवून दिली. आता चँपियन्स लीग जिंकल्यामुळे चेल्सी क्लबने प्रशिक्षकाचा करार २०२४पर्यंत वाढविला आहे.

संधी हुकली
एकाच मोसमात इंग्लिश प्रीमियर लीग आणि चँपियन्स लीग जिंकण्याचा दुग्धशर्करायोग मँचेस्टर सिटीला साधता आला नाही. यापूर्वी असा पराक्रम मँचेस्टर युनायटेडने १९९८-९९ व २००७-०८ मोसमात, तर लिव्हरपूल क्लबने १९७६-७७ व १९८३-८४ मोसमात बजावला होता. मात्र मँचेस्टर सिटी प्रीमियर लीग करंडकानंतर चँपियन्स लीग यशापासून दूरच राहिला. बार्सिलोना क्लबचे प्रशिक्षक असताना पेप ग्वार्दिओला यांनी दोन वेळा चँपियन्स लीग करंडक उंचावला, पण या दशकभरात ५० वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षकास बायर्न म्युनिक व मँचेस्टर सिटीतर्फे चँपियन्स लीग करंडक जिंकता आलेला नाही.

संबंधित बातम्या