कणखर मानसिकतेचा धडाका

किशोर पेटकर
सोमवार, 21 जून 2021

क्रीडांगण

पॅरिसमधील ऐतिहासिक रोलँ गॅरोच्या मातीच्या कोर्टवर सर्बियाच्या ३४ वर्षीय नोव्हाक जोकोविच याने भन्नाट खेळ केला. कणखर मानसिकतेच्या बळावर धडाका राखताना या अव्वल मानांकित पुरुष टेनिसपटूने कारकिर्दीतील १९वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकाविले. तर, चेक प्रजासत्ताकाची २५ वर्षीय बार्बोरा क्रेजिकोव्हा हिने महिला टेनिसमध्ये डबल धमाका केला. फ्रेंच ओपनमध्ये एकेरीबरोबरच दुहेरीतही बाजी मारणारी २१ वर्षांतील ती अवघी दुसरी महिला टेनिसपटू ठरली. 

यशप्राप्तीसाठी नोव्हाक जोकोविचला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. अखेरीस त्याची सहनशक्ती सरस ठरली, त्यामुळेच २०१६ नंतर या जिगरबाज टेनिसपटूला फ्रेंच ओपन कारकिर्दीत दुसऱ्यांदा जिंकता आली. अठ्ठेचाळीस तासांच्या कालावधीत तो दोन वेळा जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर जिंकला. उपांत्य फेरीत फ्रेंच ओपन तेरा वेळा जिंकलेल्या स्पेनच्या राफेल नदालविरुद्ध जोकोविचला पहिला सेट गमवावा लागला, पण त्याने जिद्द गमावली नाही. नंतर ओळीने तिन्ही सेट जिंकून नदालची रोलँ गॅरोवरील मत्तेदारी संपुष्टात आणली. त्या लढतीत नदालने बऱ्याच चुका केल्या, त्याचा चाणाक्षपणे लाभ उठवत नोव्हाकने आगेकूच राखली.

चिवट खेळ
अंतिम लढतीत जोकोविचने कमाल केली. ग्रीसचा २२ वर्षीय पाचवा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास इतिहास रचण्यापासून फक्त एक सेट दूर होता, तर पहिले दोन्ही सेट गमावल्यामुळे सर्बियन खेळाडू पराभवाच्या खोल खाईत होता. मात्र अचाट खेळाच्या बळावर जोकोविचने अविश्वसनीय मुसंडी मारली. पुढील तिन्ही सेट खिशात टाकत त्याने प्रचंड आत्मविश्वासाचा नमुनाच सादर केला. पराभवानंतर निराशेने आपले डोके हातात पकडून बसण्याव्यतिरिक्त त्सित्सिपास काहीच करू शकला नाही. पहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाचा करंडक या ग्रीक खेळाडूच्या हातून ऐनवेळी निसटला, त्यास जोकोविचचा चिवटपणा कारणीभूत ठरला. जोकोविचने केवळ अंतिम लढतीतच पराभवाच्या दाढेतून विजय खेचून आणला असे नव्हे, तर चौथ्या फेरीतील लढतीतही त्याची नौका खोल पाण्यात गट्यांगळ्या खात होती. इटलीचा १९ वर्षीय नवोदित, पण प्रतिभाशाली लॉरेन्झो मुसेट्टी सनसनाटी निकाल नोंदविण्याच्या वाटेवर होता. त्याने दोन्ही सेट जिंकून जोकोविचला जबरदस्त धक्का दिला. जोकोविचसाठी ही सणसणीत चपराकच होती. तो वेळीच सावरला, खडबडून जागा झाला. नंतर एका गेमच्या मोबदल्यात त्याने पुढील दोन्ही सेट जिंकत बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये तो ४-० फरकाने आघाडीवर असताना इटालियन खेळाडूने सामना सोडला. एकंदरीत जोकोविचसाठी यंदाच्या फ्रेंच ओपन विजेतेपदापर्यंतची वाटचाल खूपच खडतर ठरली.

विक्रमाची संधी
पुरुष एकेरीत स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पॅनिश राफेल नदाल यांनी प्रत्येकी वीस ग्रँड स्लॅम करंडक जिंकले आहेत. त्यांच्या तुलनेत जोकोविच एक ग्रँड स्लॅम दूर आहे. वयाच्या विचार करता, त्याला सर्वाधिक ग्रँड स्लॅम करंडक जिंकणे शक्य आहे. फेडरर लवकरच चाळीस वर्षांचा होईल, तर नदाल ३५ वर्षांचा आहे. गतवर्षीचे रोलँ गॅरोवरील विजेतेपद वगळता, तो २०१९ नंतर प्रमुख स्पर्धा जिंकू शकलेला नाही. येत्या आठ ऑगस्टला चाळिसावा वाढदिवस साजरा करणाऱ्या फेडररने शेवटचे ग्रँड स्लॅम यश मेलबर्नमध्ये साकारले होते. २०१८ ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर हा स्विस दिग्गज आणखी एका करंडकाची आस बाळगून आहे, पण यशप्राप्ती शक्य होत नाही. फेडरर आणि नदालच्या तुलनेत वाढत्या वयासह जोकोविचचे सातत्य कौतुकास्पद आहे. यावर्षीच्या सुरुवातीस त्याने ऑस्ट्रेलियन ओपन करंडक उंचावला. २०१८ पासून त्याने चार ग्रँड स्लॅम स्पर्धांत मिळून सात वेळा विजेतेपदास गवसणी घातली आहे. याचाच अर्थ जोकोविचला ग्रेटेस्ट ऑल द टाईम होण्याची जास्त संधी आहे. दुखापतींना दूर राखण्यासाठी त्याचे नियोजनही प्रशंसनीय आहे. स्वतःला तंदुरुस्त राखत त्याने आगेकूच राखली आहे आणि त्यामुळेच चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा दोन वेळा जिंकण्याचा पराक्रम तो साधू शकला.

क्रेजिकोव्हाचा डबल धमाका
चेक प्रजासत्ताकाची २५ वर्षीय बार्बोरा क्रेजिकोव्हा हिने महिला टेनिसमध्ये डबल धमाका केला. फ्रेंच ओपनमध्ये एकेरीबरोबरच दुहेरीतही बाजी मारणारी ती २१ वर्षांतील अवघी दुसरी महिला टेनिसपटू ठरली. रोलँ गॅरोच्या मातीच्या कोर्टवर २००० साली मेरी पियर्सने एकेरी-दुहेरीत विजेतेपद साकारले होते. यंदा दुहेरीत कॅटरिना सिनियाकोवा क्रेजिकोव्हाची सहकारी होती. तिने महिला एकेरीत बिगर मानांकित असूनही सनसनाटी निकाल नोंदविला. प्रतिस्पर्धी रशियाची अनास्तासिया पावल्यूचेन्कोवा हिला तीन सेट्समध्ये हरवत क्रेजिकोव्हाने प्रथमच ग्रँड स्लॅम करंडक यश साकारले. खरे म्हणजे, तिला दुहेरीतील निष्णात खेळाडू या नात्याने ओळखले जाते, आता तिने एकेरीतही वर्चस्व सिद्ध केले आहे. फ्रेंच ओपनमधील सुझान लेंग्लें कप जिंकणारी ती चाळीस वर्षांतील दुसरीच चेक महिला टेनिसपटू ठरली. १९८१ साली तत्कालीन चेकोस्लोव्हाकियाचे प्रतिनिधित्व करताना हाना मांडलीकोव्हा पॅरिसमधील मातीच्या कोर्टवर विजेती ठरली होती. यंदा क्रेजिकोव्हाने अलौकिक खेळ केला. अंतिम लढतीत ३१वी मानांकित पावल्यूचेन्कोवा हिला विजेतेपदासाठीची स्पर्धक मानले जात होते. कारण तिने अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीत जायंट किलर कामगिरी प्रदर्शित केली होती. चौथ्या फेरीत व्हिक्टोरिया अझारेन्का हिला चुरशीच्या लढतीत हरविल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत रशियन खेळाडू अफलातून मुसंडी मारली होती. एलेना रिबाकिना हिला नमविताना पावल्यूचेन्कोवा हिला जबरदस्त संघर्ष करावा लागला. रिबाकिना हिने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सची वाटचाल खंडित करताना या दिग्गज अमेरिकी टेनिसपटूला २४व्या ग्रँड स्लॅमपासून दूर ठेवले होते.

सर्वोत्तम कामगिरी
महिला एकेरीतील उपविजेती पावल्यूचेन्कोवा ५२व्या मेजर स्पर्धेत खेळत होती, तर क्रेजिकोव्हा पाचव्यांदाच मेजर स्पर्धेच्या एकेरीत खेळत होती. स्पर्धेपूर्वी ती ३३व्या स्थानी होती. गतवर्षी तिने पॅरिसमधील स्पर्धेत चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती, यंदा चक्क विजेतेपदाच्या करंडकास चुंबन देत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. विशेष बाब म्हणजे, पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम जिंकलेल्या क्रेजिकोव्हा हिने यापूर्वी कधीच विंबल्डन अथवा अमेरिकन ओपनच्या एकेरीतील मुख्य फेरीसाठी पात्रता मिळविलेली नाही. फ्रेंच ओपनमध्ये दुहेरी यश प्राप्त केल्याने आता ही चेक खेळाडू दुहेरीत अव्वल स्थानी येईल. एकेरीत तिने पंधराव्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली आहे. चेक प्रजासत्ताकाची माजी महान महिला टेनिसपटू याना नोव्होत्नाकडून क्रेजिकोव्हास टेनिसचे शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळाले, त्यामुळेच कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम तिने आपल्या मेंटॉरला अर्पण केले. माजी विंबल्डन विजेत्या याना यांचे २०१७ साली वयाच्या ४९व्या वर्षी निधन झाले.

मार्गदर्शकाचा लौकिक राखत क्रेजिकोव्हाने मातीच्या कोर्टवर दबदबा राखला. यंदा तिने क्ले कोर्टवर १८ पैकी १५ सामने जिंकले आहेत. याना नोव्होत्ना दोन वेळा फ्रेंच ओपनच्या एकेरीत उपांत्य फेरीत पराजित झाली, मात्र शिष्येने याच मैदानावर विजेतेपद मिळवून मार्गदर्शकास आगळी भेट दिली.

फेडरर कमबॅक करणार?
जागतिक टेनिसमधील महान खेळाडू रॉजर फेडरर याने जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर फ्रेंच ओपनमध्ये पुनरागमन केले. गतवर्षी तो या स्पर्धेत खेळला नव्हता, यंदा दोन सामने चार सेट्समध्ये जिंकत त्याने चौथ्या फेरीत धडक मारली, पण शरीर साथ देत नसल्याच्या कारणास्तव त्याला माघार घ्यावी लागली. फेडररचा खेळ मातीच्या कोर्टवर विशेष बहरलेला पाहायला मिळालेला नाही, तरीही त्याने २००९ साली रोलँ गॅरोवर बाजी मारत फ्रेंच ओपन जिंकण्याची स्वप्नपूर्ती केली. तो चाळिशीच्या उंबरठ्यावर आहे. फ्रेंच ओपनमध्ये तो दीर्घ कालावधीनंतर उतरला होता. सोळा महिन्यांतील त्याची ही तिसरीच स्पर्धा होती. फेडररला गुडघादुखी सतावत आहे, वय वाढत आहे आणि तरीही त्याची टेनिस कोर्टवर उतरण्याची इच्छाशक्ती कमी झालेली नाही. कदाचित प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर तो कमबॅक करू शकतो. विंबल्डन स्पर्धेतील हिरवळीचे कोर्ट हे त्याचे आवडते. या ठिकाणी तो तब्बल आठ वेळा जिंकला आहे. चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे. गतवर्षी कोरोनाच्या साथीमुळे विंबल्डन झाली नव्हती, यंदा या स्पर्धेची उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या