प्रेरणास्रोत!

किशोर पेटकर
सोमवार, 28 जून 2021

क्रीडांगण

मिल्खा सिंग हे नाव भारतीय क्रीडा इतिहासातील एक आख्यायिकाच आहे. भारतीय ॲथलेटिक्समधील एक प्रेरणास्रोत! स्वतंत्र भारतातील या मजबूत शीख युवकाने अतिशय वेगाने धावत जागतिक मैदानावर लक्ष वेधून घेतले. त्याने जिद्दीने धावत ऑलिंपिक, आशियाई स्पर्धा गाजविल्या. 

मिल्खा सिंग स्वभावाने अतिशय नम्र. वयाच्या ९१व्या वर्षीही ताठ चालत. पण अनपेक्षितपणे कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आणि अतिशय चपळ, तेजतर्रार पाय कायमचे थांबले. फाळणीच्या वेळेस जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानमधून धावत सुटलेले मिल्खा शेवटपर्यंत झुंजार ठरले. नव्वदीतील या महान खेळाडूने अतिशय प्रबळ आत्मशक्तीच्या बळावर कोरोना विषाणूला तब्बल महिनाभर झुंजविले. पण अखेरीस शरीर थकले आणि देशाने श्रेष्ठ सुपूत्र गमावला.

मिल्खा यांचा जन्म अखंड पंजाब प्रांतातील गोविंदपुरा गावात झाला. ब्रिटिशांच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळत असताना देशाची फाळणी झाली. त्यानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये पालकांसह कुटुंब गमावल्याने मिल्खा यांच्या बालमनावर जहरी जखम झाली. त्यांनी पाकिस्तानातील वेगवान धावपटूला (अब्दुल खलिक) त्याच्या भूमीत जाऊन हरविले. पाकिस्तानला पराभव मान्य करावा लागला आणि त्यांच्याच राष्ट्राध्यक्षाने (जनरल अयुब खान) ‘फ्लाईंग सीख’ ही सार्थ उपाधी त्यांना बहाल केली. खरोखरच ते हवेत उडत असल्याप्रमाणे भन्नाट वेगाने धावत. ज्या देशाने दुःख दिले, त्याच देशात सन्मान व्हावा हा नैसर्गिक न्यायच ठरला.
लष्करात जडणघडण
भारतीय लष्करात जडणघडण झालेल्या मिल्खा यांनी अथक परिश्रमाच्या बळावर ठसा उमटविला. लष्करात पात्र ठरण्यासाठी त्यांना चार वेळा परीक्षा द्यावी लागली. लष्करी शिस्तीत त्यांची वेगाने धावण्याची उपजत गुणवत्ता बहरली. सराव, परिश्रम याव्यतिरिक्त त्यांना काही सुचतच नसे. मिल्खा यांचे ऐतिहासिक ऑलिंपिक पदक थोडक्यात हुकले, मात्र तमाम भारतायांसाठी त्यांची कामगिरी अभिमानास्पद ठरली. 

०.१ सेकंदाचे महत्त्व
रोममध्ये ०.१ सेकंद फरकाने हुकलेल्या पदकाने मिल्खा व्यथित होत, त्यास ते वाईट आठवणी मानत. तेव्हा सारा देश हळहळला होता. या स्पर्धेपूर्वी दोन वर्षे अगोदर कार्डिफ येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिल्खा यांनी ४६.६ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले, तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या माल्कम स्पेन्स याला मागे टाकले होते. राष्ट्रकुल स्पर्धेत सोनेरी कामगिरी करणारे मिल्खा हे स्वतंत्र भारतातील पहिले ॲथलिट. रोममध्ये ते अधिक वेगाने धावले, पण स्पेन्स फोटो फिनिशमध्ये वरचढ ठरले. दक्षिण आफ्रिकन धावपटूने ४५.५ सेकंदासह ब्राँझपदक जिंकले, तर मिल्खा यांनी ४५.६ सेकंद (फोटो फिनिश तज्ज्ञांकडून ४५.७३ सेकंद) नोंदविल्याने ते चौथ्या स्थानी राहिले. त्यांच्या कारकिर्दीत १९५८ ते १९६२ हा कालावधी देदीप्यमान ठरला. त्या अवधीत त्यांनी २००, ४०० मीटर शर्यतीत अचाट वेग प्रदर्शित केला. राष्ट्रकुल स्पर्धेत एक, तसेच दोन आशियाई क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदकांची कमाई केली. ऑलिंपिक ॲथलेटिक्समध्ये अंतिम फेरी गाठणारे ते पहिले भारतीय ठरले. एकूण तीन ऑलिंपिक स्पर्धांत देशाचे प्रतिनिधित्व केलेले मिल्खा १९६४मधील राष्ट्रीय स्पर्धेतील ४०० मीटर शर्यतीत दुसरे आले आणि त्याचवेळी त्यांनी स्पर्धात्मक ट्रॅकचा निरोप घेण्याची योग्य वेळ असल्याचे जाणले.
 

संबंधित बातम्या