‘बुद्धि’मान अभिमन्यू

किशोर पेटकर
सोमवार, 12 जुलै 2021


क्रीडांगण

जागतिक बुद्धिबळात अभिमन्यू मिश्रा या अवघ्या बारा वर्षांच्या मुलाने लक्ष वेधून घेतले आहे. अचाट बुद्धी, विचारपूर्वक चाली रचत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणाऱ्या अभिमन्यूची कामगिरी कौतुकास्पद असून बुद्धिबळातील दिग्गजांनीही या ‘बुद्धि’मान खेळाडूची पाठ थोपटली आहे. 

हंगेरीतील बुडापेस्ट येथील स्पर्धेत अभिमन्यूने ३० जून रोजी ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक नॉर्म आणि तांत्रिक बाबींची पूर्तता केली, त्यावेळी तो १२ वर्षे ४ महिने व २५ दिवसांचा होता. साहजिकच सर्वांत कमी वयाचा ग्रँडमास्टर हा विक्रम त्याच्या नावे नोंदवला गेला. युक्रेनच्या सर्जी कार्जाकिन याने २००२ साली ग्रँडमास्टर किताबासाठी पात्रता मिळविली, तेव्हा तो १२ वर्षे ७ महिन्यांचा होता. भारतीय डी. गुकेश याने १२ वर्षे ७ महिने व १७ दिवसांचा असताना ग्रँडमास्टर किताब निश्चित केला होता. कर्जाकिन, गुकेश यांना मागे टाकत अभिमन्यू याने नवा अध्याय लिहिला आहे. अभिमन्यू भारतीय वंशाचा अमेरिकी खेळाडू आहे. न्यूजर्सी येथील या मुलाने आता जागतिक विजेता होण्याचे ध्येय बाळगले असून त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 

वडिलांची मोलाचा साथ
अभिमन्यूचे वडील हेमंत मिश्रा हे त्याचे पहिले गुरू. मूळ भोपाळ येथील हेमंतदेखील बुद्धिबळपटू होते. मुलाने फार मोठी झेप घ्यावी हे स्वप्न बाळगून हेमंत यांनी अभिमन्यूला जगज्जेता बुद्धिबळपटू करण्यासाठी सारे नियोजन केले आहे. त्यात हेमंत स्वतः आपला वेळ खर्च आहेतच, तसेच अभिमन्यूची आगेकूच रोखली जाऊ नये यासाठी आर्थिक अंदाजपत्रकही तयार केले आहे. अभिमन्यू साधारणतः अडीच वर्षांचा असताना वडिलांकडून बुद्धिबळ शिकू. तीन वर्षांचा असताना तो इवलाशा बोटांनी प्यादे पटावर खेळवू लागला. अभिमन्यूची आई स्वाती यांना बुद्धिबळ अवगत नाही, मात्र त्यांनीही मुलाला जागतिक विजेता करण्याच्या पतीच्या ध्येयाला साथ दिली. पालकांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे अभिमन्यूला जिद्दीने ध्येयपूर्तीच्या दिशेने घोडदौड राखता आली. 

कोरोना महासाथीची युरोपातील लाट ओसरू लागल्यानंतर तेथे बुद्धिबळ स्पर्धा सुरू झाल्या. त्याचा फायदा हेमंत यांनी घेतला. अभिमन्यू हंगेरीत बुद्धिबळ स्पर्धा खेळण्यास दाखल झाला. अवघ्या तीन महिन्यांत ग्रँडमास्टर किताबाचे तीन नॉर्म आणि जवळपास १०० यलो गुणांची कमाई करत या चाणाक्ष मुलाने नवी कीर्ती मिळविली.

प्रगल्भ मार्गदर्शनाची साथ
अभिमन्यू पाच वर्षांचा असताना प्रगत बुद्धिबळ प्रशिक्षणासाठी हेमंत यांनी मुलाला न्यूजर्सीतील किंग्ज अँड क्वीन्स चेस अकादमीत दाखल केले. तेथे अभिमन्यूला भारतीय ग्रँडमास्टर मागेश चंद्रन पंचनाथन, तसेच अनुप्रिता पाटील यांचे तरबेज मार्गदर्शन लाभले. तो सहा वर्षांचा असताना आणखी एक भारतीय ग्रँडमास्टर सुब्रह्मण्यम अरुण प्रसाद यांचे मार्गदर्शन लाभू लागले आणि सहा वर्षांच्या कालावधीत तो ग्रँडमास्टर झाला. वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत २७०० यलो गुणांचा टप्पा गाठण्याच्या खडतर आव्हानासाठी आता अभिमन्यू सज्ज होत आहे.

संबंधित बातम्या