अखेर ऑलिंपिकचा पडदा उघडला

किशोर पेटकर
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

क्रीडांगण

कोरोना विषाणू महासाथीने जगभरात हाहाकार माजविल्यामुळे गतवर्षी नियोजित असलेली टोकियो ऑलिंपिक स्पर्धा लांबणीवर पडली. तेव्हा स्पर्धा वर्षभरानंतर होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) जाहीर केले, पण महासाथीच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा टोकियो ऑलिंपिकवर काळे ढग जमा झाले होते. स्पर्धा रद्द करणेच योग्य ठरेल हा मतप्रवाह वरचढ होत असताना जपान सरकारही द्विधा मनःस्थितीत होते, मात्र आयओसी ठाम राहिले आणि अखेर २३ जुलै रोजी टोकियोत ऑलिंपिक स्पर्धेचा पडदा उघडला गेला. 

ऑलिंपिकच्या उद्‍घाटनाचा सोहळा रंगला, क्रीडा मैदानावर उत्साह परतला. कोरोना महासाथीचा संभाव्य धोका ओळखून क्रीडाप्रेमी, चाहत्यांविना ऑलिंपिकला सुरुवात झाली ही सल आहेच, पण त्याचवेळी महासाथीला शह देत क्रीडा कौशल्य मैदानावर परतले याचे समाधान जास्त आहे. ऑलिंपिक स्पर्धा रद्द झाली असती, तर केवळ आयओसीचेच नव्हे, तर क्रीडापटूंचेही अतीव नुकसान झाले असते. चार-पाच वर्षांची मेहनत, त्याग, जिद्द, जिगर मातीमोल झाली असती. 

जगाला संदेश

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अजूनही टोकियो ऑलिंपिकला एका वर्गाचा तीव्र विरोध आहे, तरीही ऑलिंपिक नगरीतील अपूर्व उल्हासाने जग संकटाचा एकत्रितपणे सामना करू शकते हा संदेशही अधोरेखित झाला. टोकियोतील ऑलिंपिक स्टेडियमवर क्रीडाज्योत प्रज्वलित झाली आणि सारे क्रीडाविश्व प्रेरित झाले. ‘वेगवान, उत्तुंग, बलवान आणि (आता नव्याने जोडलेला शब्द) एकत्र’ हे ऑलिंपिक स्पर्धेचे बोधवाक्य आहे. महासाथीच्या प्रखरतेवर मात करत क्रीडापटू जबरदस्त इच्छाशक्तीने ऑलिंपिक नगरीत दाखल झाले, तेव्हा टोकियोत कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत होती. काही क्रीडापटूंना संसर्ग झाला, पण क्रीडा कालचक्र थांबले नाही हे विशेष आहे. समोर जीवघेणा धोका आ वासून असतानाही क्रीडापटूंनी लढण्याची, जगण्याची आणि स्पर्धा करण्याची अपूर्व उमेद एकत्रितपणे प्रदर्शित केली. त्यामुळेच टोकियो ऑलिंपिकला ‘गेम्स ऑफ होप’ असेही म्हटले जाते. विशेष बाब म्हणजे, यंदा स्पर्धेत महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला आहे. जगभरातील महिला क्रीडापटूंचे धाडस वाखाणण्याजोगे आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये २०५ देशांतील सुमारे ११ हजार क्रीडापटू एकूण ३३ खेळात सहभागी झाले आहेत, त्यापैकी ४९ टक्के खेळाडू महिला आहेत. 

वेल डन मीराबाई!

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला पदकासाठी जास्त प्रतीक्षा करावी लागली नाही. हा लेख लिहिला तेव्हा, मणिपूरची जिगरबाज महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ४९ किलो वेटलिफ्टिंगमध्ये रुपेरी कामगिरी साधल्याने भारताच्या नावावर यावेळच्या स्पर्धेतील पहिले पदक नोंदीत झाले. मीराबाईचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये मीराबाई अपयशी ठरली होती. त्यामुळे औदासिन्य येणे स्वाभाविकच होते, मात्र ती वेळीच सावरली. नैराश्य झटकून २०१७ मधील जागतिक स्पर्धेत सहभागी झाली आणि विजेतीही ठरली. यावर्षी ताश्कंदमध्ये आशियायी वेटलिफ्टिंग स्पर्धेत क्लीन अँड जर्क प्रकारात जागतिक विक्रमाला गवसणी घातली. महासाथीमुळे सुमारे १६ महिने आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगपासून दूर राहिलेल्या मीराबाईचे पुनरागमन आश्वासक ठरले. आता ऑलिंपिक पदक जिंकून तिने साऱ्या भारतीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी बजावली.

 

संबंधित बातम्या