भारताची शान... सिंधू!

किशोर पेटकर
सोमवार, 9 ऑगस्ट 2021

क्रीडांगण

जपानची राजधानी असलेल्या टोकियोतील ऑलिंपिक स्पर्धेत भारताची विख्यात बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने ऐतिहासिक कामगिरी नोंदविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘ती भारताची शान असून आमची एक सर्वात महान ऑलिंपियन आहे.’ खरोखरच सिंधू देशाचा गौरव आणि अभिमान आहे...

पी. व्ही. सिंधू लागोपाठ दोन ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकणारी भारताची पहिलीच महिला क्रीडापटू आहे. सिंधूने २०१६मधील रिओ ऑलिंपिकमध्ये एकेरीत रौप्य जिंकून अविस्मरणीय झेप घेतली. टोकियोत तिला रुपेरी पदकाचा रंग सोनेरी करता आला नाही, पण तिने मेहनत वाया जाऊ दिली नाही. स्वतः सिंधू टोकियोतील कांस्यपदक मौल्यवान मानते. तिच्या मते, यापूर्वीच्या ऑलिंपिकमध्ये खेळत असताना तिच्याकडून पदकाची मोठी अपेक्षा नव्हती, मात्र टोकियोत ती पदकासाठी संभाव्य स्पर्धक होती. त्यामुळे अतिरिक्त दबाव झेलत तिला खेळावे लागले. उपांत्य लढतीत तैवानच्या तई झू-यिंगविरुद्ध सिंधूला विशेष सूर गवसला नाही, मात्र चीनची हे बिंग जियाओ हिच्याविरुद्ध ती त्वेषाने लढली. कौशल्यास आक्रमकतेची अफलातून जोड देत सिंधूने अब्जावधी भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. 

अद्वितीय पराक्रम
पदकाचा दबाव, नंतर उपांत्य फेरीतील हार यामुळे सिंधूच्या मनात भावनांचा कल्लोळ उठणे साहजिकच होते. तिनेच सांगितले, ‘अंतिम लढतीत खेळायला मिळाले नाही याचे दुःख करायचे, की कांस्यपदकाचा आनंद साजरा करायचा हा विचार मनात घर करू पाहत होता.’ हैदराबादच्या या २६ वर्षीय मुलीने पूर्ण एकाग्रता साधत चिनी प्रतिस्पर्धीचे आक्रमण ५२ मिनिटांत परतावून लावले. त्यावेळी ऑलिंपिक पदकासाठी प्रेरित झालेल्या सिंधूचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले. ऑलिंपिक कुस्तीत सुशील कुमारने २००८ साली बीजिंगमध्ये कांस्य, तर २०१२ साली लंडनमध्ये रौप्यपदक जिंकले, आता या पंगतीत सिंधू आली आहे. तिचा पराक्रम अद्वितीय आहे. सिंधूने आत्ताच पुढील ऑलिंपिकवर लक्ष केंद्रित केले आहे. 

क्रीडापटू पालकांच्या पोटी जन्माला आलेली ही मुलगी कमालीची जिद्दी आहे. तिच्यापाशी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पाच पदके आहेत, त्यात सुवर्ण व रौप्यपदकाचाही समावेश आहे. २०१९ साली तिने जागतिक विजेतेपद मिळवून भारतीय बॅडमिंटनमध्ये सोनेरी अध्यायाची नोंद केली.

प्रशिक्षक बदलला, तरीही...
सिंधूच्या बॅडमिंटन वाटचालीत पुल्लेला गोपिचंद यांचा अनन्यसाधारण वाटा आहे. भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू असलेल्या गोपिचंद यांनी प्रशिक्षक या नात्याने देशातील बॅडमिंटन गुणवत्तेस विजयपथावर नेले. अगोदर साईना नेहवाल, नंतर सिंधू अशा दोन ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडू त्यांनी देशाला दिल्या आहेत. कालांतराने सिंधूने गोपिचंद यांची अकादमी सोडली व ती प्रदीप राजू यांच्या गाचिबौली येथील सुचित्रा अकादमीत दाखल झाली. दक्षिण कोरियन माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पार्क तेई सँग तिचे नवे वैयक्तिक प्रशिक्षक झाले. टोकियोतील पदक पार्क यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाले आहे. सिंधूने प्रशिक्षक बदलला, पण त्याचा परिणाम तिच्या पदकापर्यंतच्या वाटचालीवर झाला नाही ही बाबही अधोरेखित झाली. जिंकणे हेच तिचे अंतिम ध्येय असते.

संबंधित बातम्या