आश्वासक भारतीय हॉकी

किशोर पेटकर
सोमवार, 23 ऑगस्ट 2021


क्रीडांगण

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकी आश्वासक भासली. ओडिशा राज्य सरकारकडून मिळणारे आर्थिक साह्य भारतीय हॉकीचे मनोबल उंचावणारे ठरले. ऑलिंपिक पुरुष हॉकीत आठ सुवर्ण, एक रौप्य व तीन कांस्यपदकांसह एकूण बारा पदके जिंकणारा भारतीय संघ सर्वाधिक यशस्वी ठरला आहे.

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ पदक जिंकेल अशी शाश्‍वती देता येत नव्हती, पण तब्बल ४१ वर्षांच्या वनवासानंतर हॉकीतील ऑलिंपिक पदक भारतात आले. जर्मनीसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला चुरशीच्या लढतीत नमवून भारतीय संघाने कांस्यपदक जिंकले. भारतीय महिलांनाही ऐतिहासिक संधी होती. केवळ तिसऱ्यांदा ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या महिला संघाने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. ग्रेट ब्रिटनला हरविले असते, तर कांस्यपदक भारतीय मुलींच्या गळ्यात दिसले असते. मात्र, चौथा क्रमांकही भारतीय महिला हॉकीसाठी अनन्यसाधारण ठरला. आता आंतरराष्ट्रीय महिला हॉकीत भारतीय मुलींना आता प्रबळ प्रतिस्पर्धी कमी लेखणार नाहीत. 

चमकदार कामगिरीने ऊर्जा
देशात राष्ट्रीय खेळ असलेली हॉकी पुन्हा एकदा तेजोमय झाली आहे. महिलांनी साखळी फेरीतील कमजोर सुरुवातीनंतर कौतुकास्पद पुनरागमन केले. पुरुषांनीही साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाकडून १-७ असा मानहानिकारक पराभव पत्करल्यानंतर धडाका राखला. पराभूत मानसिकता, नैराश्य यांना झिडकारत पुरुष व महिला हॉकी संघाने टोकियोत नवा अध्याय लिहिला तो भारतीय हॉकीस लोकप्रियतेबरोबरच नवी ऊर्जा प्राप्त करून देणारा आहे, आणि तो दीर्घकाळ स्मरणात राहील. भारतीय महिलांनी १९८० साली मॉस्कोत चौथा क्रमांक प्राप्त केला होता. त्यानंतर २०१६ साली रिओ ऑलिंपिकमध्ये खेळताना तब्बल बाराव्या स्थानी घसरण झाली. हाच संघ पाच वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये चौथ्या स्थानी दिसला. डच प्रशिक्षक शूअर्ड मरिन यांनी २०१७ पासून भारतीय हॉकीशी संबंधित आहेत. पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदावरून हटविल्यानंतर ते २०१८ महिला हॉकी संघाचे मार्गदर्शक झाले. तीन वर्षांत त्यांनी राणी रामपाल हिच्या नेतृत्वाखालील संघाला कणखर आणि खंबीर केले.

चार दशकांची प्रतीक्षा
मॉस्को ऑलिंपिकमध्ये १९८० साली भारताने पुरुष हॉकीत सुवर्णपदक जिंकले होते. २००८ साली बीजिंगमधील ऑलिंपिकसाठी भारतीय पुरुष संघ पात्र ठरू शकला नव्हता, तेव्हा या राष्ट्रीय खेळातल्या आपल्या कामगिरीमुळे खूपच नाचक्की झाली होती. २०१२ साली लंडनमध्ये बारावा क्रमांक, २०१६ साली रिओमध्ये आठवा क्रमांक मिळालेल्या भारतीय संघाने यंदा गतवैभवाची आठवण करून देणारा खेळ केला. ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचे मार्गदर्शनही परिणामकारक ठरले. महत्त्वाची बाब म्हणजे, हॉकी इंडियाने प्रशिक्षकाबाबत संगीत खुर्चीचा खेळ रोखला, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. तीन वर्षांपूर्वी जकार्ता आशियायी स्पर्धेत कांस्य, राष्ट्रकुल स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविलेल्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे रीड यांनी एप्रिल २०१९मध्ये स्वीकारली. त्यांनी मानसिकदृष्ट्या कणखर संघाची बांधणी केली. त्यामुळेच टोकियोत साखळीतील मोठ्या पराभवानंतर भारतीय पुरुष कांस्यपदकापर्यंत मजल गाठू शकले.

संबंधित बातम्या