न्यूयॉर्कमध्ये नवा जोश

किशोर पेटकर
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

क्रीडांगण

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये नवा जोश अनुभवण्यास मिळाला. फ्लशिंग मीडोजवरील आर्थर अॅश स्टेडियमवर महिला गटात एमा राडुकानू आणि पुरुष गटात डॅनिल मेदवेदेव हे नवे विजेते प्रकाशमान झाले. 

महिला गटातील ब्रिटिश खेळाडू एमा राडुकानू ही तर अवघ्या अठरा वर्षांची. दीर्घ कालावधीनंतर महिला टेनिसमधील विशीच्या आतील विजेती करंडक उंचावताना दिसली. सतरा वर्षांपूर्वी रशियाच्या मारिया शारापोवा हिने वयाच्या सतराव्या वर्षी विंबल्डन स्पर्धा जिंकली होती. पुरुषांमध्ये रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याने सर्बियन नोवाक जोकोविच याचे वर्चस्व मोडीत काढताना, अव्वल क्रमांकाच्या खेळाडूचा स्वप्नभंगही केला. जोकोविच जिंकला असता, तर एका कॅलेंडर वर्षात ऑस्ट्रेलियन, फ्रेंच ओपन, विंबल्डन आणि यूएस ओपन असे चारही ग्रँड स्लॅम जिंकण्याचा पराक्रम त्याने साधला असता, मात्र तसे झाले नाही. महान खेळाडू रॉड लेव्हर यांनी पुरुष गटात १९६२ व नंतर १९६९मध्ये वर्षातील चारही ग्रँड स्लॅम जिंकण्याचा पराक्रम साधला होता, त्यानंतर एकाही पुरुष टेनिसपटूने कॅलेंडर स्लॅमचा दुर्मीळ मान मिळविलेला नाही. महिलांत स्टेफी ग्राफने १९८८ साली चारही मेजर स्पर्धा, तसेच सोल ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून अद्वितीय गोल्डन स्लॅम साकारले होते. हा विक्रम करणारी ती एकमेव टेनिसपटू आहे. यंदा जोकोविचचे कॅलेंडर आणि गोल्डन स्लॅमही हुकले.

एमाची कमाल
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एमा राडुकानू महिला एकेरीत दीडशेव्या क्रमांकावर होती. साहजिकच तिला पात्रता फेरीत खेळावे लागले. तेव्हा ही ब्रिटिश मुलगी कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकणार असा विचारही कोणी केला नसेल. कारण, सेरेना विल्यम्सने माघार घेतली असली, तरी अन्य अनुभवी आणि मातब्बर महिला टेनिसपटू न्यूयॉर्कमध्ये दाखल झाल्या होत्या. जिगरबाज एमाने कमाल केली. पात्रता फेरीतील तिन्ही लढती, तसेच मुख्य फेरीत सलग सात विजय नोंदवत ह्या मुलीने ग्रँड स्लॅम किताबास गवसणी घातली. ग्रँड स्लॅम जिंकणारी ती पहिलीच क्लालिफायर ठरली. या वाटचालीत तिने वीस सेट्स जिंकले, तर फक्त पन्नास गेम्स गमावले. सेरेनाने २०१४ साली एकही सेट न गमावता बाजी मारली होती, त्यानंतर एमाने अशी कामगिरी साधली. तिच्या ग्रँड स्लॅम अजिंक्यपदामुळे कितीतरी विक्रमांना उजाळा मिळाला. चव्वेचाळीस वर्षांनंतर प्रथमच एका ब्रिटिश महिला टेनिसपटूच्या हाती ग्रँड स्लॅम करंडक दिसला. १९६८नंतर अमेरिकन ओपन जिंकणारी एमा पहिलीच ब्रिटिश महिला टेनिसपटू ठरली. 

जिगरबाज वाटचाल
एमा राडुकानू ही मूळची ब्रिटिश नाही. तिचे वडील रुमानियाचे, तर आई चिनी. दोघेही आर्थिकविषयक व्यावसायिक. एमाचा जन्म कॅनडातील टोरांटो येथील. वयाच्या दुसऱ्या वर्षी ती पालकांसमवेत दक्षिण लंडनमध्ये स्थायिक झाली आणि वयाच्या पाचव्या वर्षी टेनिसचे रॅकेट हाती घेतले. या मुलीची वाटचाल जिगरबाज आहे. या वर्षी जुलैमध्ये ती जागतिक महिला एकेरी क्रमवारीत सव्वातिनशेच्या पुढे होती. तेव्हा विंबल्डन स्पर्धेत वाईल्ड कार्डसह खेळताना तिने चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती, मात्र श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने एमाला माघार घ्यावी लागली होती. न्यूयॉर्कमध्ये एमाने शारीरिक तंदुरुस्तीवर भर देत फायनल जिंकताना कॅनडाची लैला फर्नांडेज हिचा ६-४, ६-३ असा सरळ सेट्समध्ये पाडाव केला. एमाने लहान वयात मोठे यश प्राप्त केले आहे. अशी किमया यापूर्वी अन्य महिला टेनिसपटूंनी साधली आहे व त्या खूप यशस्वीही ठरल्या आहेत. एमा ही परंपरा पुढे नेणार का हा प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी थांबवे लागले, मात्र अमेरिकन ओपनमध्ये क्लालिफायर गटातून येणारी ही खेळाडू मानसिकदृष्ट्या खूपच कणखर आणि मेहनती आहे हे मात्र निश्चित.

महिला टेनिसमध्ये नवी आशा
सेरेना विल्यम्स आता ३९ वर्षांची आहे. ती २४व्या विक्रमी ग्रँड स्लॅम करंडकासाठी कारकीर्द ताणत आहे. सध्या जपानच्या नाओमी ओसाका हिने अपेक्षा उंचावल्या आहेत, पण ती सध्या मानसिक स्वास्थ सांभाळण्यासाठी संघर्ष करताना दिसतेय. अन्य खेळाडू आहेत, पण त्यांच्यात सातत्याचा अभाव आहे. अशा परिस्थितीत एमा, तसेच अमेरिकन ओपन फायनलमधील तिची प्रतिस्पर्धी लैला यांनी अपेक्षा उंचावल्या आहेत. लैला १९ वर्षांची आहे. अमेरिकन ओपनमध्ये तीसुद्धा एमाप्रमाणे बिगरमानांकित होती. फ्लशिंग मीडोजवर धडाका राखताना तिने नाओमी ओसाका, अँजेलिक केर्बर, अरिना साबालेन्का, एलिना स्वितोलाना आदी मातब्बर खेळाडूंना पाणी पाजले. एमा आणि लैला या युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टेनिसमधील अपेक्षापूर्तींचा दबाव झेलत वाटचाल राखल्यास त्यांच्यातील द्वंद खेळाचा स्तर आणि लोकप्रियता वाढविणारे ठरू शकते.

जोकोविचचे स्वप्न भंगले
जागतिक टेनिसमध्ये ३४ वर्षीय जोकोविचने पुरुष एकेरीत २०२१मध्ये अमेरिकन ओपनची अंतिम लढत वगळता ग्रँड स्लॅम स्पर्धांत ओळीने २७ लढती जिंकला. फेब्रुवारीत हार्ड कोर्टवर ऑस्ट्रेलियन ओपन, जूनमध्ये मातीच्या कोर्टवर फ्रेंच ओपन, तर जुलैमध्ये हिरवळीवर विंबल्डन स्पर्धा जिंकून हा सर्बियन खेळाडू आणखी एका उच्चांकासाठी सज्ज झाला होता, पण त्यापूर्वी टोकियो ऑलिंपिकमध्ये त्याला सपशेल पराभव पत्करावा लागला. ब्राँझपदकही जिंकता आले नाही. आर्थर अॅश स्टेडियमवर टोकियोतील अपयश भरून काढण्याचा त्याचा मानस होता, पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या वीस ग्रँड स्लॅम विजेतेपदांशी त्याची बरोबरी कायम राहिली. फ्लशिंग मीडोजवर पराभूत झाल्यानंतर जोकोविचने अपयशाचा सारा राग हातातील रॅकेटवर काढला. हल्ली टेनिस कोर्टवर आपल्या भावनांना आवर घालणे या अव्वल मानांकितास जमत नाही. वारंवार त्याचा तोल ढळतो. गेल्या वर्षी त्याने रागाने चेंडू जोराने मारला, तो सामन्यातील अधिकाऱ्यास लागला व त्याची अमेरिकन ओपनमधून मानांकन गुणासह हकालपट्टी झाली होती. जोकोविचची कामगिरी महान आहे, पण त्याचे वर्तन सभ्यतेची चौकट तोडताना पाहायला मिळते.

मेदवेदेवकडून पराभवाचा बदला
या वर्षी फेब्रुवारीत २५ वर्षीय डॅनिल मेदवेदेवने ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली होती, पण त्याला जोकोविचचा झंझावात रोखता आला नव्हता. अमेरिकन ओपनमध्ये रशियन खेळाडूने पराभवाचा बदला ६-४, ६-४, ६-४ अशा सरळ सेट्समधील विजयासह घेतला. असा पराक्रम करणारा तो येवजेनी काफेलनिकोव व माराट साफिन यांच्यानंतरचा दुसरा रशियन पुरुष टेनिसपटू ठरला. अमेरिकन ओपनमध्ये मेदवेदेवचा खेळ बहरतो. मागील दोन वर्षे त्याला विजेतेपदाने हुलकावणी दिली, पण यंदा करंडक त्याच्या हाती आला. यंदा फ्रेंच ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी आणि विंबल्डनमध्ये चौथी फेरी गाठलेल्या मेदवेदेवने अमेरिकेत अपेक्षापूर्ती केली. टोकियो ऑलिंपिकमध्ये हा द्वितीय मानांकित खेळाडू सुवर्णपदकासाठी स्पर्धक होता, परंतु टोकियोतील उष्ण हवामानाने तो कमालीचा हैराण झाला. आरोग्यविषयक चिंता व्यक्त करत त्याने ऑलिंपिक टेनिस संयोजनावर जाहीर टीकाही केली. अखेरीस उपांत्यपूर्व फेरीतच त्याचे आव्हान आटोपले. नव्या मोसमात जोकोविच आणखी स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज होईल, नदालकडूनही यशस्वी पुनरागमन अपेक्षित आहे. मेदवेदेव, तसेच अलेक्झांडर झ्वेरेव, डॉमनिक थीम या नव्या दमाच्या खेळाडूंकडूनही मोठ्या अपेक्षा असतील.

एमाचे भारत कनेक्शन...
अमेरिकन ओपन महिला एकेरीतील विजेती एमा राडुकानू हिने दोन वर्षांपूर्वी भारतात खेळताना यशही मिळवले होते. डिसेंबर २०१९मध्ये एमा भारतात आयटीएफ स्पर्धा मालिकेतील पुणे व सोलापूर येथील टप्प्यात खेळली होती. पुण्यास तिने पात्रता फेरीतून आगेकूच राखत करंडकही पटकावला होता. त्यापूर्वी २०१८ साली आयटीएफ ज्युनियर टेनिस ग्रेड-३मध्ये ती भारतातील स्पर्धांत खेळली होती. चंडीगड व दिल्लीतील टप्प्यात तिने यश प्राप्त केले होते. पुरुष एकेरीतील विजेता मेदवेदेव याने २०१७ साली चेन्नई ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

संबंधित बातम्या