विराटचा अपेक्षित निर्णय

किशोर पेटकर
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021

क्रीडांगण

विराट कोहलीने टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार या नात्याने यावेळची आयपीएल स्पर्धा शेवटची असल्याचे जाहीर करून विराटने चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 

इं ग्लंडमधील कसोटी मालिकेदरम्यान भारतीय क्रिकेट संघ प्रशिक्षक रवी शास्त्री, तसेच सपोर्ट स्टाफला कोरोना विषाणूने घेरल्यामुळे संघात चलबिचल झाली, नंतर इंग्लंडविरुद्धची अखेरची कसोटी झालीच नाही. सारे खेळाडू आपापल्या आयपीएल संघात रुजू होण्याच्या तयारीत असताना विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी विराटची कर्णधारपदी निवड होऊनही चर्चेस ऊत आला. त्यातच विराटने स्वखुशीने टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचे जाहीर केले, अर्थात तो यावेळच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत आरसीबी संघाचा कर्णधार या नात्याने नाणेफेकीस जाताना दिसेल, पण ही शेवटची स्पर्धा असेल. त्याने कामाच्या ताणाचे कारण देत टी-२० कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचे ठरविले आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार या नात्याने यावेळची आयपीएल स्पर्धा शेवटची असल्याचे जाहीर करून विराटने चर्चेला पूर्णविराम दिला आहे. भविष्यात तो आयपीएल स्पर्धेत फक्त खेळाडूच असेल. एकंदरीत टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराटने पूर्ण विचारांतीच घेतलेला असणार हे पक्के आहे. गेल्या काही महिन्यांत त्याच्या फलंदाजीवर परिणाम झाल्याचे जाणवले, त्यामुळे कर्णधारपदाऐवजी फलंदाजीवर जास्त लक्ष देण्याचा विराटचा निर्णय अपेक्षित वाटतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सलग ५३ डावात त्याला शतक नोंदविता आलेले नाही.

प्रतीक्षा आयसीसी करंडकाची

विराटने महेंद्रसिंग धोनीकडून भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे जानेवारी २०१७मध्ये घेतली. कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरही तो विराजमान झाला. क्रिकेटमध्ये महानतेचा कळस गाठलेल्या या जिगरबाज फलंदाजास संघाचे नेतृत्व करताना आयसीसी स्पर्धेत एकही करंडक जिंकता आलेला नाही. २०१७ सालच्या चँपियन्स करंडक स्पर्धेत तो कर्णधार असताना भारताला अंतिम लढतीत पाकिस्तानकडून हार पत्करावी लागली. २०१९मधील एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडकात भारताचे आव्हान उपांत्य फेरीत आटोपले, तर या वर्षी कसोटीतील जागतिक विजेतेपदासाठी खेळताना विराटचा संघ न्यूझीलंडवर मात करू शकला नाही. टी-२० संघाच्या कर्णधारपदी विराटच्या कामगिरीची सरासरी धोनीपेक्षा सरस असली, तरी त्याने अजून प्रमुख स्पर्धा जिंकलेली नाही याकडे नेहमीच लक्ष वेधले जाते. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने आत्तापर्यंत पाच टी-२० मालिका जिंकल्या आहेत, त्यापैकी दोन परदेशातील आहेत. संयुक्त अरब अमिराती व ओमानमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वकरंडकात भारतीय संघ विजेता ठरल्यास, ते यश विराटसाठी खूपच भावनिक असेल.  टी-२० क्रिकेटमध्ये भारताने २००७नंतर विश्वकरंडक उंचावलेला नाही.

रोहित स्पर्धेत...

विराट लवकरच ३३वा वाढदिवस साजरा करेल. त्याचा सहकारी रोहित शर्मा दोन वर्षांनी मोठा आहे, तरीही विराटनंतर टी-२० कर्णधारपदासाठी मुंबईच्या या फलंदाजास प्रमुख स्पर्धक मानले जाते. रोहितच्या आयपीएल स्पर्धेतील यशस्वी कामगिरीचा दाखला दिला जातो. मुंबई इंडियन्सने रोहितच्या नेतृत्वाखाली पाच वेळा आयपीएल करंडक पटकाविला आहे. कर्णधारपदासाठी रोहित योग्य उमेदवार आहेच, मात्र वयाचा विचार करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तरुण चेहऱ्याच्याही शोधात नक्कीच असेल.

संबंधित बातम्या