भारतीय महिला क्रिकेटपटूंची छाप

किशोर पेटकर
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

क्रीडांगण

भारतीय महिला क्रिकेट संघाला दीर्घ कालावधीनंतर दोन कसोटी क्रिकेट सामने खेळायला मिळाले. इंग्लंड दौऱ्यातील एकमेव कसोटीनंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारतीय महिलांनी दिन-रात्र कसोटीत अनिर्णित निकाल नोंदविला. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी संस्मरणीय ठरली. 

भारतीय महिला संघ प्रथमच गुलाबी चेंडूने दिन-रात्र कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरला. एकदिवसीय व टी-२० या झटपट क्रिकेटच्या तुलनेत भारतीय महिला कसोटी क्रिकेटमध्ये फारच कमी खेळल्या आहेत. दिन-रात्र आणि गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव नसताना मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजविले. सामन्यात पावसाने वारंवार व्यत्यय आणला नसता, तर कदाचित भारतीय संघाने ऐतिहासिक विजयही नोंदविला असता. 

पाच दिवसीय कसोटीचा आग्रह
वेगवान गोलंदाजीत वयाच्या ३८व्या वर्षीही झुलन गोस्वामी भार वाहत असून धारदार मारा करताना दिसतेय. तिला नवोदित मेघना सिंग व पूजा वस्त्रकार या वेगवान गोलंदाजांची समर्थ साथ लाभली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या बॅट्सवूमन बॅकफूटवर गेलेल्या दिसल्या. कर्णधार मिताली राजने संघाची कामगिरी सर्वोत्तम ठरल्याचे सांगितले. महिलांच्या क्रिकेटमध्ये कसोटी चार दिवसीय आहेत, पुरुषांप्रमाणेच सामने पाच दिवसीय असावेत यासाठी चर्चा होते आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीत चारपैकी तीन डाव घोषित झाले. भारताच्या ८ बाद ३७७ घोषित धावसंख्येला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने ९ बाद २४१ धावांवर डाव घोषित केला. निकाल लागावा यासाठी हा प्रयत्न होता. नंतर भारतानेही दुसरा डाव ३ बाद १३५ धावांवर घोषित करून ऑस्ट्रेलियासमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले, जे शेवटच्या चौथ्या दिवशी अंतिम सत्रात अशक्यप्राय ठरले आणि भारतालाही ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही.

स्मृतीचा पराक्रम
अवघी चौथीच कसोटी लढत खेळणारी डावखुरी स्मृती मानधना पराक्रमी ठरली. महाराष्ट्राच्या या २५ वर्षीय खेळाडूने दिन-रात्र सामना आणि गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव नसतानाही सफाईदार फलंदाजीने कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक साकारले. दिन-रात्र कसोटीत शतक झळकाविणारी ती पहिलीच भारतीय महिला आहे. नेत्रदीपक फटकेबाजीने साऱ्यांना मोहित केलेल्या स्मृतीने ऑस्ट्रेलियात एकदिवसीय आणि कसोटीत शतक करणारी पहिली महिला हा मान मिळविला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत महिला कसोटीत प्रतिस्पर्धी संघातर्फे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदविण्याचा विक्रमही स्मृतीच्या नावे नोंदीत झाला. तिने २२ चौकार व एका षटकाराच्या मदतीने १२७ धावांची प्रेक्षणीय खेळी केली. अगोदरच्या दिवशी ८० धावांवर नाबाद राहिलेल्या स्मृतीने शतकी वेस पार करताना एकाग्रता ढळू दिली नाही. १९४९मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडच्या मॉली हाईडने नाबाद १२४ धावा केल्या होत्या, हा उच्चांक स्मृतीने मागे टाकला. भारताचे माजी शैलीदार सलामीवीर वसीम जाफर यांनी स्मृतीची देखणी फलंदाजी पाहून तिला ‘ऑफसाईडची देवी’ (The Goddess of the offside) ही समर्पक उपमा दिली आहे.

संबंधित बातम्या