ऑस्ट्रेलियाचे टी-२० श्रेष्ठत्व

किशोर पेटकर
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

क्रीडांगण

संयुक्त अरब अमिरातीत टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची मुख्य फेरी सुरू झाली त्यावेळेस विजेतेपदाची पहिली पसंती ऑस्ट्रेलियास नव्हती. साखळी फेरीत सलग पाच सामने जिंकलेला पाकिस्तान, तसेच अष्टपैलू इंग्लंड हे संघ टी-२० विश्वकरंडकासाठी भक्कम स्पर्धक होते. मात्र अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने अखेरीस कमाल केली. संघातील जागा गमावण्याच्या स्थितीत असलेल्या मॅथ्यू वेडने उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध लगावलेल्या तीन षटकारांनी कांगारूंची मानसिकताच बदलली. अंतिम लढतीत त्यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी न्यूझीलंडला चारीमुंड्या चीत केले. डेव्हिड वॉर्नरने करून दिलेली मजबूत सुरवात, नंतर मिशेल मार्शचा धडाका यामुळे ऑस्ट्रेलियासाठी १७३ धावांचे आव्हान खूपच सोपे ठरले. सात चेंडू आणि आठ विकेट राखून त्यांनी अंतिम लढत लीलया जिंकली. 

ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच वेळा जगज्जेतेपदाचा जल्लोष केलेला असला, तरी त्यांच्याकडे टी-२० विश्वकरंडक विजेतेपद नव्हते. यावेळी ही उणीव भरून निघाली. अकरा वर्षांपूर्वी ब्रिजटाऊन येथे त्यांना इंग्लंडचा संघ अंतिम लढतीत भारी ठरला होता. यंदा जस्टिन लँगर यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने ‘डार्क हॉर्स’ बनून स्वप्नपूर्ती साधली.

विश्वास सार्थ ठरविला
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० जगज्जेतेपदात त्यांच्या अनुभवी खेळाडूंनी विश्वास सार्थ ठरविल्याचे दिसून येते. विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी कांगारूंच्या संघाला विविध देशाविरुद्धच्या टी-२० मालिकेत सफाईदार खेळ करता आलेला नव्हता, त्यामुळे विजेतेपदाच्या शर्यतीत त्यांना फारशी पसंती नव्हती. सलामीचा डेव्हिड वॉर्नर हा त्यांचा हुकमी एक्का. विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात तो फॉर्म हरवून बसला. हा दिग्गज खेळाडू सनरायझर्स हैदराबादला नकोसा झाला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने त्याच्या प्रतिभेवर अविश्वास व्यक्त केला नाही. विश्वकरंडकाच्या मोठ्या व्यासपीठावर त्याची बॅट तळपली. अगोदर पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंडविरुद्ध त्याने विजयाची पायाभरणी केली. मिशेल मार्श याच्याकडून ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू या नात्याने सुरवातीपासून मोठ्या अपेक्षा बाळगल्या, मात्र दुखापतीमुळे माजी कसोटीपटू जेफ मार्श यांचा मुलगा अडखळत होता. महत्त्वाच्या सामन्यात नाबाद ७७ धावा करून त्याने आपण मॅचविनर असल्याचे सिद्ध केले. मार्कुस स्टॉयनिस हा सुद्धा झटपट क्रिकेटला साजेसा खेळाडू, सातत्याअभावी त्याच्यावरही टीका होत असे. ते अपयश त्याने उपांत्य लढतीतील निर्णायक खेळीने धुऊन काढले. ऑस्ट्रेलियाच्या जगज्जेतेपदात फिरकी गोलंदाज अॅडम झॅम्पा याला अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही. त्याने अमिरातीतील खेळपट्टीवर कल्पकतेने मारा केला, धावाही फारशा दिल्या नाहीत. अंतिम लढतीत जोश हेझलवूडने दिशा आणि टप्प्यावर हुकमत राखली.कमनशिबी किवी...

किवींच्या न्यू झीलंडला पुन्हा एकदा झटपट क्रिकेटमध्ये विश्वकरंडक जिंकण्यास अपयश आले. हा संघ जिगरबाज आणि लढवय्या, तरीही २०१५ व २०१९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये अंतिम फेरी गाठूनही विश्वकरंडकाने त्यांना हुलकावणी दिली. दुबईत ऑस्ट्रेलियाच्या धडाका रोखणे त्यांना जमले नाही. त्यामुळे एकदिवसीय आणि टी-२० मिळून विश्वकरंडकात तिसऱ्यांदा ते उपविजेतेच ठरले.

संबंधित बातम्या