‘वेगवान’ कर्णधार!

किशोर पेटकर
सोमवार, 6 डिसेंबर 2021

क्रीडांगण

ॲशेस मालिका तोंडावर असताना नव्या कर्णधार नियुक्तीबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोर पर्याय कमीच होते, त्यामुळे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्याकडे संघाचे नेतृत्व आले आहे. 

संघातील सपोर्ट स्टाफमधील महिला सहकाऱ्यास अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कसोटी क्रिकेट कर्णधार टिम पेन याला राजीनामा द्यावा लागला. ऑस्ट्रेलियात डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ॲशेस क्रिकेट मालिकेच्या पार्श्वभूमीवर पेन याचा राजीनामा हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्काच होता.

कांगारूंच्या भूमीतील क्रिकेट जेवढे प्रतिभाशाली, तेवढेच कलंकितही ठरलेले आहे. त्यांचे क्रिकेटपटू अखिलाडूवृत्तीसाठी जास्त चर्चेत राहतात. पेन हासुद्धा वाट चुकलेला क्रिकेटपटू. स्वतःच्या भावनांना आवर घालणे त्याला जमले नाही. खरे म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याला पदावरून काढणारच होते, पण या भरकटलेल्या यष्टिरक्षकास निदान थोडेफार शहाणपण सुचले. नैतिकतेचे नाटक करत त्याने कर्णधारपद सोडण्याचे ठरविले. २०१८ साली चेंडू कुडतरण्याच्या कटात कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट या आपल्या संघ सहकाऱ्यास उत्तेजन दिल्याचा ठपका ठेवून स्टिव स्मिथला दोषी ठरविण्यात आले होते आणि जम बसलेल्या कर्णधारपदावर त्याला पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे अनपेक्षितपणे पेन याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघाचे नेतृत्व आले होते. ॲशेस मालिका तोंडावर असताना नव्या कर्णधार नियुक्तीबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोर पर्याय कमीच होते, त्यामुळे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्याकडे संघाचे नेतृत्व आले. कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या वेगवान गोलंदाजाकडे कर्णधारपद क्वचित बहाल केले जाते, साहजिकच कमिन्सची नियुक्ती भुवया उंचावणारी ठरली.

ऑस्ट्रेलियाचा ४७वा कर्णधार
कसोटी क्रिकेटमधील कर्णधारपद भूषविलेले गोलंदाज फारच कमी आहेत. बहुतांश वेळेस फलंदाजास नेतृत्वपदासाठी प्राधान्य दिले जाते. अष्टपैलू खेळाडूंवरही विश्वास दाखविला जातो, परंतु निव्वळ गोलंदाज कितीही प्रगल्भ असला, तरी त्याच्यावर नेतृत्वाची पूर्णवेळ जबाबदारी देताना खूप विचार केला जातो.

पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा ४७वा कसोटी कर्णधार ठरला आहे. यापूर्वी १९६४ साली रिची बेनॉ या गोलंदाजाकडे ऑस्ट्रेलियाचे पूर्णवेळ नेतृत्व देण्यात आले होते. महान फिरकी गोलंदाज बेनॉ यांनी नेतृत्वगुणांस न्याय दिला. आता कमिन्सकडून ऑस्ट्रेलियास फार मोठ्या अपेक्षा असतील. त्याला मदत करण्यासाठी स्टिव स्मिथ याच्याकडे उपकर्णधारपद देऊन ऑस्ट्रेलिया क्रिकेट व्यवस्थापनाने पर्यायी व्यवस्था केलेली आहेच. यापूर्वी पेन कर्णधार असताना कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार होता, त्यामुळे तो अगदीच नवखा आहे, असे म्हणता येणार नाही.

दशकभराची कारकीर्द
ऑस्ट्रेलियाचा हुकमी वेगवान गोलंदाज असलेल्या पॅट कमिन्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द दशकभराची आहे. सिडनीत जन्मलेल्या या २८ वर्षीय तेजतर्रार गोलंदाजाने ३४ कसोटींत १६४ विकेट मिळविल्या आहेत. त्याने नोव्हेंबर २०११मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा तो फक्त १८ वर्षांचा होता. तंदुरुस्त नसल्याचा मोठा फटका त्याच्या कारकिर्दीस बसला. मात्र, दुखापतीवर मात करत त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन केले आणि प्रमुख वेगवान गोलंदाज होण्यापर्यंत मजल मारली. दीडशेहून जास्त कसोटी बळी घेणाऱ्या या वेगवान गोलंदाजाला आता संघाच्या नेतृत्वाची अतिरिक्त जबाबदारी पेलायची आहे. त्यासाठी शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम राहावे लागले. आव्हान सोपे नाही, तरीही कमिन्सविषयी सुरुवातीच्या काळात सहानुभूती असेल.

संबंधित बातम्या