श्रीकांतचे रूपेरी यश

किशोर पेटकर
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021

क्रीडांगण

किदांबी श्रीकांत याने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत रौप्यपदक जिंकणारा पहिला भारतीय हा सन्मान पटकावला. स्पेनमध्ये झालेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत त्याने अंतिम फेरी गाठली. प्रतिस्पर्ध्यास जोरदार टक्कर दिली, पण सुवर्णपदक थोडक्यात हुकले. 

किदांबी श्रीकांतची कामगिरी अतुलनीय आहे. या २८ वर्षीय खेळाडूने जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानी राहून रौप्यपदक जिंकले. त्याने मलेशियात जन्मलेला सिंगापूरचा २४ वर्षीय खेळाडू लोह केन येव याला हरविले असते, तर भारतीय क्रीडा इतिहासातील ती फार मोठी घटना ठरली असती. 

महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने जागतिक विजेतेपद मिळविले आहे. तिने हा पराक्रम २०१९ साली केला होता. याशिवाय सिंधूने प्रत्येकी दोन वेळा रौप्य व कांस्यपदकाचीही कमाई केली आहे, तर साईना नेहवालने रौप्य, कांस्यपदक जिंकले आहे. जागतिक स्पर्धेत यापूर्वी भारतीय पुरुषांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्या प्रयत्नांत प्रकाश पदुकोणला १९८३ साली, तर बी. साई प्रणीत याला २०१९ साली कांस्यपदक मिळाले होते.

यावेळच्या जागतिक स्पर्धेत भारतीय पुरुषांची पताका उंच फडकली. श्रीकांत व २० वर्षीय लक्ष्य सेन यांच्यात उपांत्य लढत झाली. त्यात श्रीकांतचा अनुभव भारी ठरला. लक्ष्यला कांस्यपदकाचा मान मिळाला. एका जागतिक स्पर्धेत भारताच्या दोघा पुरुष बॅडमिंटनपटूंना पदक मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली. महिलांप्रमाणेच भारतीय पुरुषही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये गुणवत्तेस न्याय देत आहेत.

नावाजलेला खेळाडू

किदांबी श्रीकांत हा भारताचा नावाजलेला बॅडमिंटनपटू आहे. श्रीकांत लहानपणी भाऊ नंदगोपाळ याचा हात पकडून पुल्लेला गोपीचंद यांच्या हैदराबादमधील अकादमीत आला. गोपीचंद यांनी दुहेरीत खेळणाऱ्या श्रीकांतला एकेरीत आणले, त्याच्या उपजत गुणवत्तेला सुरेख पैलू पाडले. श्रीकांतनेही प्रशिक्षकांना निराश केले नाही. अल्पावधीत उत्तुंग झेप घेतली. २०१४ साली मोठा धमाका केला. चायना ओपन सुपर सीरिज प्रीमियर स्पर्धा जिंकताना चीनचा दिग्गज लिन डॅन याचा पाडाव केला. डॅन हा पाच वेळचा जागतिक, तर दोन वेळचा ऑलिंपिक विजेता. डॅनला हरविल्यानंतर श्रीकांतने मागे वळून पाहिलेच नाही. २०१७ साली त्याने कमाल केली. सुपर सीरिज मालिकेत इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क व फ्रेंच ओपन या चार स्पर्धा जिंकून दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळविले. एप्रिल २०१८मध्ये त्याने सर्वोत्तम मानांकन नोंदविताना जागतिक क्रमवारीत अग्रस्थान प्राप्त केले.

दुखापती आणि संघर्ष

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर श्रीकांतची कारकीर्द झेपावत असताना त्याला दुखापतीने त्रस्त केले. पायाच्या वेदना असह्य झाल्या आणि त्याचा प्रतिकूल परिणाम खेळावर झाला. येथूनच त्याचा संघर्ष सुरू झाला. पण त्याने हार मानली नाही. यशप्राप्तीसाठी अथक मेहनत हवीच. श्रीकांतनेही तेच केले आणि त्याचे गोड फळ स्पेनमध्ये चाखायला मिळाले. मानांकन घसरल्यामुळे टोकियो ऑलिंपिकला मुकलेल्या श्रीकांतच्या कारकिर्दीस पुन्हा सफलतेची किनार लाभली, जी खूपच आश्वासक आहे.

संबंधित बातम्या