हरभजनची निवृत्ती

किशोर पेटकर
सोमवार, 3 जानेवारी 2022

क्रीडांगण

हरभजन सिंग हा भारताचा दिग्गज, महान फिरकी गोलंदाज. कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे पहिली हॅटट्रिक नोंदविणारा आणि चारशेहून जास्त विकेट टिपणाऱ्या चार गोलंदाजांपैकी एक; जगज्जेतेपद मिळविलेल्या भारतीय संघाचा सदस्य. पंजाबमधील जालंधर येथील ‘भज्जी’ भारताचा ‘मॅचविनिंग’ गोलंदाज होता. २००१ साली भारताने ऑस्ट्रेलियास कसोटी मालिकेत पाणी पाजले. तेव्हा तीन कसोटींत ३२ विकेट टिपणारा ‘द टर्बनेटर’ यशाचा एक प्रमुख शिल्पकार होता. माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघाचा तो हुकमी गोलंदाज ठरला. या जिगरबाज ऑफ स्पिन गोलंदाजाचे वय वाढले तशी त्याच्या फिरकी गोलंदाजीतील धार कमी कमी होऊ लागली. भारतीय क्रिकेटमध्ये रविचंद्रन अश्विनचा उदय झाला. हळूहळू हरभजनचे संघातील महत्त्व कमी होऊ लागले. ऑगस्ट २०१५मध्ये शेवटचा कसोटी सामना, तर मार्च २०१६मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला. त्यानंतर डिसेंबर २०२१मध्ये या ४१ वर्षीय फिरकी गोलंदाजाने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या दर्जा, लौकिक लक्षात घेता या चँपियन गोलंदाजाने आपली निवृत्ती विनाकारण लांबविली हेच खरे. अत्त्युच्च पातळीवर खेळत असताना मैदानावरून निवृत्ती घेण्याची संधी लाभली नाही याचा सल त्याने जाहीरपणे व्यक्तही केलेला आहे.

कारकिर्दीस वादाची किनार
मार्च २००१मध्ये कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर हॅटट्रिकचा जल्लोष साजरा केलेल्या हरभजनने सुमारे दोन दशकांच्या कारकिर्दीत कित्येक चढउतार अनुभवले. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अँड्रूय सायमंड्स याच्याशी संबंधित ‘मंकीगेट’ वाद खूपच गाजला. हरभजनच्या मतानुसार, तो वाद अनावश्यक ताणला गेला. आयपीएल स्पर्धेत भारतीय संघातील सहकारी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याच्याशी झालेल्या बाचाबाचीनंतर भज्जीचा पारा चढला व त्याने श्रीसंतला थप्पड मारली. हे प्रकरण खूपच वादग्रस्त ठरले. हरभजनने याप्रकरणी नंतर जाहीर खेद व्यक्त केला. एक क्रिकेटपटू या नात्याने तो मैदानावर शंभर टक्के योगदान देण्यासाठी तत्पर राहिला. सर्वस्व झोकून खेळला. संघातून वगळल्यानंतर निवड समितीने असे का केले याचा शोध घेण्याचा त्याने प्रयत्न केला. उत्तर स्पष्ट होते, पण भज्जीला ते उमगले नाही, त्यामुळे त्याचा निवृत्तीचा निर्णय लांबला. यावर्षी

आयपीएल स्पर्धेत
कोलकाता नाईट रायडर्स संघातून खेळताना दुसऱ्या टप्प्यात त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आणि चाळिशीतील भज्जीने कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचे निश्चित केले. कदाचित तो भविष्यात राजकारण, प्रशिक्षणात दिसू शकतो, तसे संकेत आहेत.

देदीप्यमान कारकीर्द
हरभजन सिंग याची कारकीर्द अलौकिक आहे. १०३ कसोटीत ४१७ बळी ही कामगिरी त्याची महानता अधोरेखित करते. फलंदाजीतही योगदान देताना कसोटीत दोन शतकेही झळकावली. दर्जेदार फिरकी गोलंदाजीने भज्जीने भारताच्या कितीतरी विजयांत मोलाचा वाटा उचलला. हरभजनने देदीप्यमान कारकिर्दीत कसोटी, एकदिवसीय, टी-२० या आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल क्रिकेटमध्ये मिळून ८६१ विकेट टिपल्या. २००७मध्ये टी-२० आणि २०११मध्ये एकदिवसीय स्पर्धेतील विश्वविजेत्या संघाचा सदस्य असलेल्या भारताच्या या सफल फिरकी गोलंदाजास मानाचा मुजरा!

संबंधित बातम्या