‘वर्ल्डकप’चे वर्ष!

किशोर पेटकर
सोमवार, 10 जानेवारी 2022

क्रीडांगण

नवे साल उजाडले आहे. कोरोना विषाणूचा धोका कायम असूनही क्रीडा क्षेत्रात लगबग सुरू आहे. २०२२ हे वर्ष क्रीडापटू आणि क्रीडाप्रेमींसाठी भरगच्च आहे. कतार देशात होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची उत्कंठा साऱ्यांनाच आहे. कतारमधील हवामानामुळे फुटबॉल कॅलेंडरमध्ये विश्वकरंडक स्पर्धा प्रथमच हिवाळ्यात होतेय, त्यामुळे युरोपातील विविध व्यावसायिक फुटबॉल स्पर्धा खंडित होतील. एकूण ३२ देशांचा सहभाग असलेली ही स्पर्धा कतारमधील पाच शहरांतील आठ स्टेडियमवर होत आहे. २१ नोव्हेंबरला सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबरला होईल. गतविजेता फ्रान्स, ब्राझील, जर्मनी, स्पेन, इंग्लंड, अर्जेंटिना हे माजी विजेते आतापर्यंतच्या पात्र संघांत आहेत. पश्चिम आशियातील अरब देशात होणारी ही पहिलीच विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा असल्याने नवलाई आहे. संघांना जास्त प्रवासही करावा लागणार नाही, कारण पाचही यजमान शहरांतील अंतर शंभर किलोमीटरच्या आत आहे. कतारला यजमानपद देण्यावरून २०१० साली आरोप-प्रत्यारोप, वाद झाले. स्टेडियमचे बांधकाम सुरू असताना स्थलांतरीत मजुरांच्या आरोग्यविषयक प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजला. मात्र आता हा अरब देश महासाथीच्या कालखंडात भव्यदिव्य विश्वकरंडक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सज्ज होतोय.

भारतीयांचे लक्ष क्रिकेटकडे

विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, भारतीयांचे लक्ष क्रिकेटमधील टी-२० विश्वकरंडकाकडे असेल. १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धा होईल. गतवर्षी भारतात नियोजित असलेली स्पर्धा नंतर कोविडमुळे संयुक्त अरब अमिराती व ओमानमध्ये न्यावी लागली. स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने प्रथमच बाजी मारली. यावर्षी तेच यजमान आहेत. खरे म्हणजे, ही स्पर्धा २०२०मध्ये होणार होती, पण महासाथीमुळे लांबणीवर टाकण्यात आली. गतवर्षी टी-२० विश्वकरंडकात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पूर्ण अपयश आले. त्यानंतर रोहित शर्मा कर्णधारपदी आला. नव्या नेतृत्वाखाली संघ टी-२० विश्वकरंडक जिंकू शकेल का याचीच भारतीयांना जास्त उत्सुकता असेल.

मार्च-एप्रिलमध्ये न्यू झीलंडमध्ये महिलांची एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होईल. कोविडमुळे ही स्पर्धाही एका वर्षाने पुढे गेली होती. २०१७ साली या स्पर्धेत भारतीय महिला उपविजेत्या ठरल्या. यावेळेस स्पर्धेच्या कालावधीत भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या कामगिरीची निश्चितच चर्चा असेल. 

जानेवारी-फेब्रुवारीत वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेकडेही नजरा असतील. यापूर्वी या वयोगटातील विश्वकरंडकातून भारताला प्रतिथयश क्रिकेटपटू गवसले, आताही त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. चार वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या भारताला २०२० साली अंतिम लढतीत बांगलादेशने धक्का दिला होता. भारतीय संघाने हल्लीच १९ वर्षांखालील आशिया कप जिंकून तयारी चांगली झाल्याचे संकेत दिले आहेत.

नीरजकडेही लक्ष
जुलैमध्ये अमेरिकेतील ओरेगॉन येथे होणारी जागतिक मैदानी स्पर्धा, जुलै-ऑगस्टमध्ये बर्मिंगहॅम येथे होणारी राष्ट्रकुल स्पर्धा आणि सप्टेंबरमध्ये चीनमधील हँगझू येथे होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा भारतीय क्रीडापटूंसाठी अतिशय महत्त्वाची आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलेला भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्याकडे भारतीयांचे जास्त लक्ष असेल.

संबंधित बातम्या