उस्मान ख्वाजाने संधी साधली

किशोर पेटकर
सोमवार, 17 जानेवारी 2022

क्रीडांगण

किशोर पेटकर
कला आणि संस्कृती

 

 

क्रिकेट जगतात प्रतिष्ठेची असलेल्या ॲशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघात पाचव्या क्रमांकावरील फलंदाज कोण याची चर्चा होती. निवड समितीने स्थानिक स्पर्धेत धावांचे सातत्य राखलेल्या ट्रेव्हिस हेड व उस्मान ख्वाजा यांची निवड केली. दोघेही डावखुरे. इंग्लंडविरुद्धच्या ब्रिस्बेन येथील पहिल्या कसोटी ख्वाजा याच्या अनुभवाऐवजी ट्रेव्हिस हेडच्या आक्रमकतेला प्राधान्य देण्यात आले. प्रशिक्षक जस्टिन लँगर व निवड समितीचा विश्वास सार्थ ठरविताना हेड याने दीडशतकी खेळी केली. नंतर ऑस्ट्रेलियाने पहिले तिन्ही सामने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली. सिडनीतील चौथ्या कसोटीपूर्वी हेड कोविडबाधित ठरला आणि त्याला संघाबाहेर जावे लागले आणि ३५ वर्षीय ख्वाजा संघात आला. सुमारे अडीच वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघात पुनरागमन केलेल्या या फलंदाजाने संधीचे सोने केले. दोन्ही डावात शतके ठोकत, कारकिर्दीतील नवी इनिंग संस्मरणीय ठरविली, तसेच आपल्या फलंदाजीतील जादू अजूनही शाबूत असल्याचे सिद्ध केले.
मोजक्या ऑसी फलंदाजांत
ख्वाजाने पहिल्या डावात १३७, तर दुसऱ्या डावात नाबाद १०१ धावा करून ॲशेस मालिकेतील एका कसोटीत दोन्ही डावात शतके करणाऱ्या मोजक्या ऑसी फलंदाजांत स्थान मिळविले. यापूर्वी असा पराक्रम वॉरेन बेर्डस्ली, आर्थर मॉरिस, स्टीव वॉ, मॅथ्यू हेडन व स्टीव स्मिथ यांनीच केला होता. सिडनीतील ऐतिहासिक स्टेडियमवर झालेल्या कसोटीत यापूर्वी ऑस्ट्रेलियातर्फे डग वॉल्टर्स (१९६९, विरुद्ध वेस्ट इंडिज) व रिकी पाँटिंग (२००६, विरुद्ध दक्षिण आफ्रिका) यांनीच दोन्ही डावात शतके केली होती. 
इंग्लंडमध्ये २०१९ साली झालेल्या ॲशेस मालिकेत सातत्य न राखल्याने ख्वाजाला ऑस्ट्रेलिया संघातील जागेस मुकावे लागले होते. मुळात तो तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज. त्या जागी मार्नस लाबुशेन याने धावांचा रतीब टाकत कब्जा केल्यानंतर ख्वाजा संघाबाहेर गेला. सिडनी कसोटीत पाचव्या क्रमांकावर सफल ठरत, आपण एक ते पाच यापैकी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास सक्षम त्याने आता असल्याचे दाखवून दिले आहे.
पाकिस्तान ते ऑस्ट्रेलिया
उस्मान ख्वाजा याचा जन्म पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील. तो वयाच्या पाचव्या वर्षी पालकांसमवेत न्यू साऊथ वेल्समध्ये दाखल झाला आणि त्यानंतर पक्का कांगारू झाला. त्याची पत्नीही ऑस्ट्रेलियन आहे. २००८मध्ये न्यू साऊथ वेल्सतर्फे तो प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत उतरला. नंतर २०१२-१३ मोसमापासून त्याने क्वीन्सलंडचे प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली. ख्वाजाने शानदार फलंदाजी करत राष्ट्रीय संघ निवड समितीचे लक्ष वेधले. जानेवारी २०११मध्ये त्याला सिडनी येथे ॲशेस मालिकेतच ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी लाभली. ऑस्ट्रेलियाकडून तो एकदिवसीय, तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळला. पण त्याला खरी ओळख मिळाली ते कसोटी क्रिकेटमध्ये. वयाच्या ३५व्या वर्षी दमदार पुनरागमनासह दोन्ही डावात शतके करणाऱ्या ख्वाजाची प्रगल्भ फलंदाजी, तसेच दृढनिश्चय पाहता तो आणखी काही वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी 
निश्चितच सेवा बजावू शकतो.

संबंधित बातम्या