अखेर जोकोविच हरलाच!

किशोर पेटकर
सोमवार, 24 जानेवारी 2022

क्रीडांगण

खेळ श्रेष्ठ की खेळाडू? या प्रश्नाचे उत्तर परस्परविरोधी असू शकते. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत खेळण्याबाबत सर्बियाचा महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याची सर्व्ह दिशाहीन ठरली. ऑस्ट्रेलियन सरकारला बिनतोड सर्व्हने नामोहरम करण्याचा त्याचा डाव अंगलट आला आणि अखेर तो चारीमुंड्या चीत झाला. मेलबर्न पार्कवर पाय न ठेवताच त्याला हॉटेलमधूनच कांगारूंचा देश सोडावा लागला. कोरोना विषाणू महासाथीचे संकट कायम आहे. सारे जग लसीकरणास उत्तेजन देत आहे, मात्र सर्बियाचा हा ३४ वर्षीय दिग्गज टेनिसपटू कोविड निर्बंध पाळण्याच्या विरोधात आहे, असेच त्याच्या वर्तणुकीवरून जाणवले. युरोपात मागे महासाथीची लाट परमोच्च बिंदूवर असताना त्याने टेनिस स्पर्धेचे आयोजन केले, तेव्हा त्याच्यावर तुफान टीका झाली होती. आता लसीकरण आणि कोविड नियमांचे उल्लंघन करत त्याने ऑस्ट्रेलियात पाऊल ठेवले खरे, पण आपल्या देशातील नियम सर्वांना समान हा पायंडा ऑस्ट्रेलियन सरकारने मोडू दिला नाही, त्यावर तेथील फेडरल न्यायालयाच्या तिघा न्यायाधिशांनीही शिक्कामोर्तब केल्यामुळे जोकोविचला प्रत्यक्ष टेनिस कोर्टवर न उतरताच पराभूत व्हावे लागले. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, असे सांगण्यावाचून त्याच्यासमोर पर्याय नव्हता. अखेर तो हरलाच!

महान खेळाडूची बनवेगिरी
मेलबर्न विमानतळावर उतरल्यानंतर जोकोविच स्वतःच्याच जाळ्यात अडकला. कोविड नियमांबाबत ऑस्ट्रेलिया सरकार फार गंभीर आणि कडक आहे. आपण कोविड बाधित होतो, त्यामुळे लस घेणे अशक्य ठरले असा दावा केल्याने त्याला स्पर्धेत खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन ओपन संयोजक, तसेच व्हिक्टोरिया प्रशासनाने वैद्यकीय सवलत दिली. ही सूट मर्यादित स्वरूपाची असल्याने विमानतळावर दाखल होताच तेथील इमिग्रेशन व्यवस्थेने त्याला ताब्यात घेतले. त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. जोकोविच हॉटेलमध्ये विलगीकरणात असताना  जोकोविचच्या वकिलांनी मेलबर्नमधील न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी न्यायालयाने ऑस्ट्रेलियन सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचा निवाडा देत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडूस दिलासा दिला. तरीही सरकार झुकले नाही. इमिग्रेशन मंत्र्यांनी विशेषाधिकार वापरत जोकोविचचा व्हिसा दुसऱ्यांदा रद्द केला. त्याला देशात परवानगी दिल्यास ऑस्ट्रेलियातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न उद्‍भवेल, धोका निर्माण होईल या मताशी सरकार ठाम राहिले. जोकोविचच्या म्हणण्यानुसार, १६ डिसेंबर रोजी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह निघाली, तरीही १६ व १७ डिसेंबर रोजी तो बेलग्रेडमधील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाला; तो युवा टेनिसपटूंत मिसळल्याचे पुरावे मिळाले. स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर जोकोविचने कोरोना संबंधित कागदपत्रांची, तसेच लसीकरण अटीची पूर्तता केली नाही. परिणामी त्याला ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी प्रवेश मिळालाच नाही.

नियमांपेक्षा कोणीही मोठा नाही
नोव्हाक जोकोविचवरील कारवाईचे समर्थन करताना  ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी नियमांपेक्षा कोणीही मोठा नसल्याचा पुनरुच्चार केला. जोकोविचप्रमाणेच २० ग्रँडस्लॅम जिंकणारा स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल यानेही आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या वर्तनाशी असहमती व्यक्त केली. कुठल्याही खेळाडूपेक्षा स्पर्धा महत्त्वाची आहे, असे नदाल म्हणाला.

 

संबंधित बातम्या