सानिया आता थांबणार!

किशोर पेटकर
सोमवार, 31 जानेवारी 2022

क्रीडांगण

सानिया मिर्झाची व्यावसायिक आंतरराष्ट्रीय टेनिसमधील कारकीर्द आता थांबणार आहे. २००३ साली तिने व्यावसायिक टेनिस कोर्टवर पदार्पण केले. एकेरीच्या तुलनेत दुहेरीत तिची नैसर्गिक गुणवत्ता जास्त बहरली. भारतीय महिला टेनिसमधील ती पोस्टर गर्ल ठरली. अथक मेहनत, दृढनिश्चय, प्रबळ आत्मविश्वास या बळावर भारतीय महिला टेनिसला जागतिक पातळीवर कीर्ती प्राप्त करून दिली. तिने दुहेरीत एकूण सहा ग्रँडस्लॅमचा मान मिळविला. आता वयाच्या ३५व्या वर्षी तिने व्यावसायिक टेनिसचा निरोप घेण्याचे ठरविले आहे. 

२०२२मधील मोसम अखेरचा असल्याचे तिने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सांगितले. आई झाल्यानंतर ती जिद्दीने टेनिस कोर्टवर आली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रॅव्हा येथे विजेतेपदही मिळविले, पण वाढत्या वयाबरोबरच आपले शरीर समर्पक साथ देत नाही याची जाणीव झाल्यानंतर, तसेच सोबत लहान मूल असताना कोविड संकटकाळातील जोखीम लक्षात घेत तिने वेदना देणाऱ्या गुडघ्यांनाही विश्रांती देण्याचे ठरविले.

यशस्वी भारतीय महिला
जागतिक टेनिस कोर्टवर सानियाने १९ वर्षांच्या दीर्घ कालखंडात भारतीय महिला टेनिसला नावलौकीक आणि आदरही मिळवून दिला. महिला टेनिसमधील महान खेळाडू मार्टिना हिंगीसच्या साथीत सानियाने तीन वेळा महिला ग्रँडस्लॅममध्ये बाजी मारली. २०१५ साली विंबल्डन आणि अमेरिकन ओपनमध्ये, तर २०१६ साली ऑस्ट्रेलियनमध्ये ती दुहेरीत विजेती ठरली. महिला दुहेरीत ग्रँडस्लॅम जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. २००९मध्ये देशवासीय महेश भूपतीच्या साथीत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीत विजेतेपदाचा करंडक जिंकत सानियाने टेनिस कारकिर्दीतील नव्या अध्यायास सुरुवात केली होती. भूपतीसह तिने २०१२मध्ये फ्रेंच ओपनमध्ये, तर ब्रुनो सुवारिस याच्यासमवेत २०१४मध्ये अमेरिकन ओपन विजेतेपद मिळविले. याशिवाय दुहेरीत तिला पाच वेळा ग्रँडस्लॅम उपविजेतेपदावरही समाधान मानावे लागले. एकंदरीत दुहेरीत खेळण्याचा तिचा निर्णय योग्य आणि यशस्वीही ठरला. १३ एप्रिल २०१५ रोजी तिने दुहेरीत अव्वल क्रमांक पटकाविला, तिच्या कारकिर्दीतील हा अत्त्युच्च क्षण ठरला. त्यापूर्वी दहा वर्षांअगोदर, जागतिक महिला एकेरी क्रमवारीत पहिल्या शंभर जणीत स्थान मिळवून सानियाने चुणूक दाखविली होती. २००७ साली तिने एकेरीत २७व्या क्रमांकापर्यंत मजल मारून साऱ्यांना स्तिमित केले होते. देदीप्यमान कारकिर्दीत सानियाला देशात जबरदस्त लोकप्रियता, उच्च सन्मानही मिळाला. अर्जुन, खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषणने सन्मानित सानियाचे २०१६ साली रिओ येथे ऑलिंपिक पदक मात्र थोडक्यात हुकले.

पुनरागमनानंतर...
पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाहबद्ध झाल्यानंतरही सानियाने आंतरराष्ट्रीय मैदानावर भारतीय तिरंगा उंच फडकवत ठेवला. मातृत्वासाठी ऑक्टोबर २०१७पासून ती जीवलग टेनिस कोर्टपासून दूर गेली. मुलाच्या जन्मानंतर जानेवारी २०२०मध्ये तिने पुनरागमन केले, पण कामगिरीतील सातत्यापासून दूरच राहिली. टेनिस कोर्टवर नवप्रेरणा मिळवत ऊर्जा एकवटली.

परिश्रम घेतले, तंदुरुस्तीसह वजन कमी केले. आई झाल्यानंतरही टेनिसमधील पुनरागमनाचे उदाहरण सादर केले, मात्र अखेरीस तिला शरीराचे ऐकावेच लागले.

संबंधित बातम्या