लढवय्या राफा...!

किशोर पेटकर
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

क्रीडांगण

शूरवीर जिद्द सोडत नाही, लक्ष्यप्राप्तीपासून ढळत नाही. झुंजार लढाऊ बाण्याने प्रतिकूल परिस्थितीतही कठीण लढाया जिंकतो. स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने असाच असाधारण बाणा दाखवला. मेलबर्न पार्कवरील रॉड लेव्हर अरेनावर त्याने अफलातून झुंज दिली. तो तब्बल पाच तास, २४ मिनिटे लढला आणि अखेरीस अजिंक्यवीर ठरला, ३५ वर्षीय राफा ऐतिहासिक विजेता झाला. पुरुष टेनिसमध्ये सर्वाधिक २१ ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या आवडत्या मातीच्या कोर्टवर फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर तो २० ग्रँडस्लॅमवर अडकला होता. पण अखेरीस कडव्या प्रतिकारानंतर रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याचा पाच सेटमध्ये पाडाव करत नदालने समकालीन स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच यांना मागे टाकले. 

कोविड-१९ लसीकरणप्रकरणी जोकोविचने ऑस्ट्रेलियन सरकारचे नियम पाळले नाही, परिणामी तो गतवर्षीचे विजेतेपद राखण्यासाठी मेलबर्नला खेळू शकला नाही. नदाल ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी कोविडबाधित झाला होता. त्यापूर्वी डाव्या पायाच्या दुखापतीमुळे गतवर्षी ऑगस्टनंतर व्यावसायिक टेनिसपासून दूर होता. डिसेंबरमध्येच त्याने पुनरागमन केले होते. वाढत्या वयासोबत त्याच्या खेळातील परिपक्वता, कणखर मानसिकता वरचढ ठरली आणि त्याला ऐतिहासिक, विक्रमी यश साजरे करता आले, जे त्याच्यासाठी खूपच भावनिक ठरले.

जिगरबाज पुनरागमन

डॅनिल मेदवेदेव हा नव्या दमाचा खेळाडू. नदालपेक्षा दहा वर्षांनी तरुण. गतवर्षी जोकोविचला हरवून त्याने अमेरिकन ओपन किताब पटकावला होता. यावेळी तो सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम लढतीत खेळला. गतवर्षी त्याला जोकोविच भारी ठरला होता. या वर्षी नदालविरुद्धच्या अंतिम लढतीत २५ वर्षीय रशियन खेळाडूने पहिले दोन सेट जिंकून दणक्यात सुरुवात केली. मात्र जिगरबाज राफा सहजासहजी हार मानणारा नव्हता. यापूर्वी २०१२मधील अंतिम लढतीत तो जोकोविचविरुद्ध तब्बल पाच तास ५३ मिनिटे झुंजला होता, तरीही उपविजेता ठरला. मात्र यावेळी या स्पॅनिश खेळाडूने राखेतून जबरदस्त भरारी घेतली. तिसऱ्या सेटमधील सहाव्या गेममध्ये नदाल ०-३० असा पिछाडीवर असताना करंडक जवळपास रशियन खेळाडूच्या हातात आला होता, पण राफाने अविश्वसनीय मुसंडी मारली. ३-३ अशी बरोबरी साधली आणि नंतर माघारी वळून पाहिलेच नाही. अंतिम लढतीत उपस्थित बहुसंख्य टेनिसप्रेमींचा नदालच लाडका होता. त्यामुळे त्याला अधिकच स्फुरण चढले. मेदवेदवचा खेळ घसरत गेला. दृढनिश्चियी नदाल रशियन खेळाडूला पुरून उरला.

तेरा वर्षांची प्रतीक्षा
राफेल नदाल फ्रेंच ओपनचा बादशाह. पॅरिसला तो विक्रमी १३ वेळा जिंकला आहे. तो अमेरिकन ओपनमध्ये चार वेळचा विजेता असून विंबल्डनच्या हिरवळीवर दोन वेळा बाजी मारली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये २००९ साली रॉजर फेडररला नमवून नदाल विजेता ठरला होता. नंतर २०१२, २०१४, २०१७, २०१९मध्ये त्याला प्रतिस्पर्ध्यांना विजेतेपदाचा आनंद साजरा करताना पाहावे लागले. अखेरीस तेरा वर्षांची प्रतीक्षा राफाने संपुष्टात आणली. चारही ग्रँडस्लॅम दोन वेळा जिंकणारा तो रॉय एमरसन, रॉड लेव्हर व जोकोविच यांच्यानंतरचा चौथा पुरुष टेनिसपटू ठरला.

संबंधित बातम्या