भारतीय युवकांचा विश्वपराक्रम!

किशोर पेटकर
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

विशेष

वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटपटू सर व्हिवियन रिचर्डस् यांच्या नावे असलेल्या अँटिगातील नॉर्थ साऊंड येथील स्टेडियमवर भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने विश्वपराक्रम साकारला. या वयोगटातील विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा युवक संघ पाचव्यांदा जगज्जेता झाला. 

दोन दशकांच्या कालावधीत महंमद कैफ ते यश धुल या नेतृत्वकुशल कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने युवा गटातील क्रिकेटमधील प्रगती अधोरेखित केली. कदाचित यावेळी हॅटट्रिक झाली असती. दोन वर्षांपूर्वी अखिलाडूवृत्तीमुळे गाजलेल्या अंतिम लढतीत बांगलादेशने धक्का दिल्यामुळे प्रियम गर्गच्या नेतृत्वाखालील संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, यावेळी इंग्लंडला हरविताना भारताने बहारदार खेळ केला. प्रतिस्पर्ध्यांना १८९ धावांत रोखल्यानंतर, भारतीय संघालाही मध्यंतरी धक्के बसले. परंतु, संघाने हाराकिरी केली नाही, कच खाल्ली नाही. युवा क्रिकेटपटू परिस्थितीनुरूप लढण्याइतपत सक्षम असल्याचे निशांत सिंधू याने नाबाद अर्धशतक झळकावत सिद्ध केले. निशांत सतरा वर्षांचा आहे, तरीही तो कसलेल्या फलंदाजाप्रमाणे खेळला. अंतिम लढतीत अर्धशतक केलेला शेख रशीद हासुद्धा सतरा वर्षांचा आहे. अगोदरच्या सामन्यांत सोळा वर्षीय अंगक्रिश रघुवंशी यानेही आपल्यापेक्षा तीन वर्षांनी मोठ्या असलेल्या वयोगटात जिगरबाज खेळ केला. एकंदरीत, भारतीय क्रिकेटची प्रतिभा खोलवर रुतलेली आहे. त्यामुळेच हा खेळ देशात अधिकाधिक लोकप्रिय आणि यशस्वी गणला जातो. आणखी एका विश्वकरंडकामुळे भारतीय क्रिकेटपटूंना कोविड संकटकाळात आश्वासक दिशा गवसली.

अपराजित घोडदौड

विंडीजमधील १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारताने शानदार अष्टपैलूत्व प्रदर्शित केले. संघाने कॅरेबियन बेटांवर जाण्यापूर्वी धुलच्या नेतृत्वाखाली दुबईत श्रीलंकेला हरवून आशिया करंडक जिंकला होता. तोच जोश आणि धडाका विंडीजमध्ये पाहायला मिळाला. विश्वविजयी वाटचालीत भारताने एकही सामना गमावला नाही. साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेला नमविल्यानंतर कमजोर आयर्लंड व युगांडाचा फडशा पाडला. नंतर गतवेळच्या पराभवाचा वचपा काढताना बांगलादेशला नमविले. ऑस्ट्रेलियास उपांत्य फेरीत हरविले, तेव्हाच धुल आणि त्याचे सहकारी विश्वकरंडकास नक्कीच गवसणी घालतील हा विश्वास वाटू लागला. इंग्लंडला चार विकेट्सने नमवून युवा क्रिकेटपटूंनी अपेक्षापूर्ती केली. संघातील सर्व सतरा सदस्यांना प्रत्येकी चाळीस लाख रुपये बक्षीस जाहीर करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने युवा खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणित केला.

आश्वासक गुणवत्ता

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या (१९४८, लंडन) भारतीय हॉकी संघातील खेळाडू तरलोचनसिंग बावा यांचा नातू राज अंगद बावा अंतिम लढतीत भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने भन्नाट वेगवान मारा करताना अवघ्या ३१ धावांत ५ गडी टिपले. त्याला समर्थ साथ देत डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमारने ३४ धावांत ४ विकेट्स मिळविल्या. राज आणि रवी यांच्याकडे भारतीय क्रिकेट आश्वासक नजरेने पाहत आहे. स्पर्धेत रवीने १०, तर राजने ९ गडी बाद केले. महत्त्वाची बाब म्हणजे, राजची फलंदाजीतील उपजत गुणवत्ता वाखाणण्याजोगी ठरली. दुबळ्या युगांडाविरुद्ध नाबाद १६२ धावांची खेळी केली, तर अंतिम लढतीत त्याच्या ३५ धावा तेवढ्याच महत्त्वपूर्ण ठरल्या. राज भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगला आपला आदर्श मानतो. युवीचे प्रशिक्षक सुखविंदरसिंग बावा हे राजचे वडील आणि प्रशिक्षक. त्यांच्यात तालमीत तयार झालेल्या युवा अष्टपैलूकडे भारताचा भावी क्रिकेटपटू या नजरेने आत्तापासून पाहिले जातेय. राजला अजून भरपूर मजल मारायची आहे, मात्र आपले नाणे खणखणीत असल्याचे त्याने सिद्ध केले. दुखापतीमुळे त्याच्या वडिलांची क्रिकेट कारकीर्द बहरली नाही आणि ते तरुण वयातच प्रशिक्षक झाले. मुलगा आता वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी परिश्रम घेतोय. डावखुरा फिरकी गोलंदाज विकी ओत्सवाल यानेही लक्ष वेधून घेतले. १२ गडी बाद करताना तो फिरकी गोलंदाजीत भारताचा आधारस्तंभ ठरला. त्याने दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाविरुद्ध भन्नाट मारा केला. उपकर्णधार रशीद यानेही प्रगल्भतेची झलक पेश केली. राजवर्धन हंगर्गेकर या वेगवान गोलंदाजाचे ही भवितव्य उज्ज्वल आहे. आशिया करंडक, तसेच विश्वकरंडकात नव्या चेंडूने त्याने दणक्यात गोलंदाजी केली.

कणखर मानसिकता 

भारतीय क्रिकेटपटूंनी १९ वर्षांखालील विश्वकरंडक पाचव्यांदा जिंकताना कणखर मानसिकता प्रदर्शित केली. त्यांचा सकारात्मक आणि झुंजार दृष्टिकोन खूपच कौतुकास्पद ठरला. साखळी फेरीतील पहिला सामना खेळल्यानंतर काही खेळाडूंना कोरोना विषाणूने ग्रासले. आयर्लंड व युगांडाविरुद्ध मैदानावर अकरा सदस्यीय संघ उभा करण्याची समस्या उद्‍भवली. बाधित युवा खेळाडू सातासमुद्रापार दूर राहूनही धोकादायक आजारामुळे डगमगले नाहीत. कर्णधार यश धुल याने कोविडला हरवत जबरदस्त इच्छाशक्ती प्रदर्शित केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य लढतीत त्याने दणकेबाज ११० धावांची खेळी करत चँपियन मनोवृत्ती सादर केली. दिल्लीचा हा क्रिकेटपटू विराट कोहलीला आदर्श मानतो. नेतृत्व आणि फलंदाजीत विराटच्या पावलांवर जाण्याचा त्याचा प्रयत्न सदोदित असतो. 

भविष्यात सावधानता हवी

भारताच्या युवा क्रिकेटपटूंना आता यशाचा मंत्र गवसला आहे. मात्र यापुढे यशाने हुरळून हवेत न उडता, पाय जमिनीवर ठेवूनच वाटचाल करावी लागेल. प्रसिद्धी क्षणभंगूर असते. सफलतेसाठी अथक मेहनत, समर्पित भावना, उत्कटता अत्यावश्यक ठरेल. परिश्रमाला तोड नाही. लहान वयात यशस्वी ठरलेले क्रिकेटपटू पुढे मोठे नाव कमावू शकले नाहीत, याची कितीतरी उदाहरणे आहेत. १९ वर्षांखालील विश्वकरंडक जिंकणारे सारेच भविष्यात सुपरस्टार झालेले नाहीत, ही बाबही ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. काही क्रिकेटपटूंची नावेही आता आठवत नाहीत. आयपीएलचा झगमगाट लहान वयात या क्रिकेटपटूंना अनुभवण्यास मिळेल, पण त्या मोहमयी वातावरणात सावधपणे वावरणे त्यांच्या हिताचे असेल. वाहावत जाण्याचा धोकाच जास्त आहे.

दिग्गजांच्या पंगतीत

१९ वर्षांखालील विश्वकरंडक जिंकून यश धुल, त्याचे सहकारी आता दिग्गजांच्या पंगतीत आले आहेत. या वयोगटातील विश्वकरंडकाने यापूर्वी भारताला नावाजलेले क्रिकेटपटू दिले आहेत. २०००मध्ये भारताने सर्वप्रथम या वयोगटातील विश्वकरंडक जिंकला. तेव्हा कर्णधार महंमद कैफ होता. कैफ, तसेच स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेला युवराज सिंग नंतर सुपरस्टार ठरले. २००८ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील विश्वकरंडक जिंकला. त्या यशानंतर विराटचा वारू सुसाट सुटला. विक्रमांना पादाक्रांत करणारा विराट यशोशिखरावर तेजाने तळपत आहे. विराटचा सहकारी रवींद्र जडेजाही मॅचविनर आहे. २०१२ साली उन्मुक्त चंद याच्या नेतृत्वाखाली भारताने तिसऱ्यांदा विश्वकरंडक जिंकला, पण दिल्लीच्या फलंदाजाची सीनियर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकीर्द बहरू शकली नाही. त्यावेळच्या संघातील हनुमा विहारी याला उशिराच कसोटी संघाचे दार उघडले गेले. २०१८ साली विश्वविजयी संघाचे पृथ्वी शॉ याने नेतृत्व केले. त्याने, तसेच शुभमन गिल यांनी वरिष्ठ भारतीय संघापर्यंत खेळण्याइतपत मजल मारली. याशिवाय शिखर धवन (२००४) व चेतेश्वर पुजारा (२००६) या १९ वर्षांखालील विश्वकरंडक गाजवलेल्या खेळाडूंनीही आपली वेगळी ओळख भारतीय क्रिकेटमध्ये स्थापित केलेली आहे. २०२०मधील स्पर्धेत चमकलेला यशस्वी जैसवाल मात्र संधीच्या शोधात आहे.

भक्कम मार्गदर्शन

माजी कर्णधार राहुल द्रविड मार्गदर्शक या नात्याने भारतीय क्रिकेटला सकारात्मक दिशा दाखवत आहेत. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) भारतीय क्रिकेटच्या विकासात अभूतपूर्व योगदान आहे. द्रविड यांचा मैदानावरील सहकारी व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आता एनसीएचे प्रमुख आहेत. विश्वकरंडक मोहिमेच्या संपूर्ण कालावधीत ते संघासमवेत विंडीजमध्ये राहिले, खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले. वेस्ट इंडीजमध्ये पाचव्यांदा जगज्जेतपद मिळविलेल्या संघाला माजी कसोटीपटू हृषीकेश कानिटकर यांचे मार्गदर्शन लाभले. परिपक्व, शांत, संयमी कानिटकर यांनी अल्पावधीतच छाप पाडली आहे. गोवा, तमिळनाडू इत्यादी रणजी संघांना मार्गदर्शन केल्यानंतर महाराष्ट्राच्या या माजी क्रिकेटपटूने एनसीएत जम बसविला असून त्याची चांगली फळे चाखायला मिळत आहेत. सपोर्ट स्टाफमधील साईराज बहुतुले यांच्यापाशीही गाढा अनुभव आहे. साहजिकच युवा क्रिकेटपटूंचे मनोबल कायमचे उंचावलेले राहिले. ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष श्रीधरन शरथ आणि अन्य सदस्यांना संघ बांधणीसाठी तसा कमीच वेळ मिळाला, तरीही त्यांनी देशातील युवा गुणवत्ता शोधताना दूरदृष्टी दाखविली. भारताने विश्वकरंडक जिंकल्यानंतर खुद्द लक्ष्मण यांनीच निवड समितीलाही श्रेय दिले. 

वयोगट स्पर्धा महत्त्वाच्या

कोविड-१९ आरोग्य सुरक्षेच्या कारणास्तव २०२०-२१मध्ये देशात वयोगटातील एकही स्पर्धा होऊ शकली नाही. २०२१-२२ मोसमाच्या सुरुवातीस १९ वर्षांखालील स्पर्धा झाली. विनू मांकड करंडक एकदिवसीय स्पर्धा पार पडली, चार दिवसीय सामन्यांच्या कुचबिहार करंडक स्पर्धेतील बाद फेरीतील सामने बाकी असले, तरी साखळी फेरीतील सामने झाले. मात्र १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक स्पर्धा यावेळीही होण्याची शक्यता खूपच अंधूक आहे. भारतीय क्रिकेटचा विचार करता, देशात क्रिकेट फोफावण्यामध्ये वयोगट क्रिकेटचे फार मोठे योगदान आहे. क्रिकेटचा पिरॅमिड १६ वर्षे वयोगटापासून सुरू होतो. आज भलेही आयपीएलमुळे क्रिकेटपटू प्रकाशमान होत आहेत, पण त्यांच्या गुणवत्तेचा पाया वयोगट पातळीवरच भक्कम झालेला असतो हे सत्य आहे.

संबंधित बातम्या