सेनेगलची स्वप्नपूर्ती

किशोर पेटकर
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

क्रीडांगण

‘आफ्रिका कप ऑफ नेशन्स’ ही फुटबॉलमधील एक प्रमुख स्पर्धा. दर दोन वर्षांनी आफ्रिकेतील २४ देशांची फुटबॉलमधील गुणवत्ता प्रदर्शित होते. कोविड-१९मुळे गतवर्षी होऊ न शकलेली स्पर्धा या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत कॅमेरूनमध्ये झाली. सेनेगलने ही स्पर्धा प्रथमच जिंकल्याने केवळ खेळाडू व प्रशिक्षकांचीच नव्हे, तर फुटबॉलवेड्या सेनेगलवासीयांचीही स्वप्नपूर्ती झाली. २००२ व २०१९मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या वर्षी पेनल्टी शूटआऊटवर पश्चिम आफ्रिकेतील या देशाने सात वेळच्या विजेत्या इजिप्तला पराजित केले. 

सेनेगलमधील बहुतेक व्यावसायिक फुटबॉलपटू युरोपात खेळतात, इंग्लंडमधील प्रमुख क्लबना या देशातील फुटबॉलपटूंचे भारी आकर्षण. क्लब पातळीवर या देशातील खेळाडू चमकले, पण सेनेगलला आफ्रिका करंडक कधीच जिंकता आला नव्हता, ती सल यावेळेस दूर झाली. २००२ साली विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारलेला सेनेगलचा संघ २०१८मधील विश्वकरंडकात साखळी फेरीत गारद झाला होता. यावेळी मात्र व्यावसायिक मैदानावर नावाजलेल्या खेळाडूंनी देशासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देत उत्कट खेळ केला, त्यामुळे त्यांना आफ्रिकेत विजेतेपदाचा झेंडा पहिल्यांदाच फडकवता आला.

सेडिओ मे (Sadio Mané) ठरला भारी

सेनेगलच्या संघातील २९ वर्षीय आघाडीपटू सेडिओ मे इंग्लंडमधील लिव्हरपूल क्लबतर्फे खेळतो. लिव्हरपूलने २०१८-१९मध्ये युरोपियन चँपियन्स लीग, तर २०१९-२०मध्ये प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली. दोन्ही वेळेस मेने उल्लेखनीय कामगिरी केली. इजिप्त संघातील प्रमुख खेळाडू महंमद सालाह हा मे याचा लिव्हरपूल संघातील सहकारी. खंडीय पातळीवर सालाह याला मे भारी ठरला. साखळी फेरीत खेळताना मेची प्रतिस्पर्धी खेळाडूशी टक्कर झाली. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला रुग्णालयातही पाठवावे लागले होते. मात्र नंतर तो पूर्ण जोशाने खेळला. याच स्पर्धेत त्याने २९वा गोल नोंदवून सेनेगलतर्फे सर्वाधिक गोल करणाऱ्या हेन्री कामारा याच्या विक्रमाशी बरोबरी साधली. 

तीन वर्षांपूर्वी आफ्रिका करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत अल्जेरियाने सेनेगलला हरविले होते, त्यामुळे सेडिओ मे तेव्हा जल्लोष करू शकला नव्हता. यंदा यजमान कॅमेरूनला उपांत्य फेरीत पेनल्टीवर पराभूत केलेल्या इजिप्तला सेनेगलचा निर्धार मोडून काढता आला नाही. इंग्लंडमधील चेल्सी क्लबतर्फे खेळणारा गोलरक्षक एदुआर्द मेंडी पेनल्टी शूटआऊटमध्ये अफलातून ठरला. मे याचे विजेतेपदाचे स्वप्न साकार झाले, पण सालाह याला अजून आफ्रिका करंडक जिंकता आलेला नाही. तो संघात असताना २०१७नंतर पुन्हा एकदा इजिप्तला उपविजेतेपदच मिळाले.

प्रशिक्षकाची जिद्द जिंकली

सेनेगलचे राष्ट्रीय प्रशिक्षक अलियू सिसे हे माजी व्यावसायिक फुटबॉलपटू. सेनेगलचे प्रशिक्षक या नात्याने या ४५ वर्षीय मार्गदर्शकास आफ्रिका करंडकाने वारंवार हुलकावणी दिली होती. अखेरीस त्यांची जिद्द जिंकली. अलियू सिसे सेनेगलचे कर्णधार असताना २००२ साली सेनेगल अंतिम लढतीत कॅमेरूनविरुद्ध हरला, तेव्हा त्यांना पेनल्टी फटका अचूक मारता आला नव्हता. नंतर २०१९ साली प्रशिक्षक या नात्याने त्यांच्या संघाला अंतिम लढतीत अल्जेरियाने हरविले. २०१५ साली सेनेगलच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतलेले सिसे आफ्रिकेतील एका राष्ट्रीय संघाला सर्वांत जास्त काळ मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक आहेत.

संबंधित बातम्या