लेगस्पिनचा कल्पक जादूगार!

किशोर पेटकर
सोमवार, 14 मार्च 2022

क्रीडांगण

वॉर्नी... ऑस्ट्रेलियाचा जगविख्यात फिरकी गोलंदाज! तब्बल सातशे कसोटी गडी बाद करणाऱ्या शेन वॉर्न याचे अकाली निधन चटका लावणारे ठरले. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन एक तप कधीच उलटले होते, तरीही त्याची वलयांकित ओळख कायम राहिली. वयाच्या ५२व्या वर्षी त्याने अचानकपणे जगाचा निरोप घेतला आणि सारे क्रिकेटविश्व हळहळले. तो लेगस्पिनचा कल्पक जादूगार होता. 
शेन वॉर्नचे प्रचंड प्रमाणात वळणारे चेंडू प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी अकल्पनीय ठरत. त्याने अॅशेसमधील वैयक्तिक पदार्पणात टाकलेला चेंडू शतकातील सर्वोत्तम गणला गेला. जून १९९३मध्ये मँचेस्टरच्या कसोटीत इंग्लंडचा अनुभवी फलंदाज माईक गॅटिंगला टाकलेला चेंडू असामान्य, अजरामर ठरला. लेगस्टंपबाहेरील टप्पा असलेल्या चेंडूने झपकन वळत यष्टीचा कधी वेध घेतला आणि बेल उडाली हे गॅटिंगला उमगलेच नाही, काही क्षण तो स्तब्ध झाला. कितीतरी फलंदाज असतील ज्यांना वॉर्नची जादुई फिरकी कळलीच नाही. त्याचे मैदानावरील कर्तृत्व अफाट आणि अचाट, म्हणूनच शतकातील सर्वोत्तम पाचजण निवडताना डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स, सर व्हिव रिचर्ड्स आणि जॅक हॉब्ज या क्रिकेट मैदानावरील महान व्यक्तिमत्वांसह विस्डेनने वॉर्नला मानाचा मुजरा केला.

असामान्य गुणवत्ता
जानेवारी १९९२मध्ये फिरकी गोलंदाजी सहज खेळणाऱ्या भारताविरुद्ध २२ वर्षीय शेन वॉर्नने सिडनी येथे कसोटी पदार्पण केले. द्विशतकवीर रवी शास्त्री व नाबाद शतकवीर सचिन तेंडुलकर यांनी वॉर्नला लक्ष्य गेले. या नवख्या फिरकीपटूला एका विकेटसाठी ४५ षटकांत १५० धावांचा मोबदला द्यावा लागला खरा, पण नंतर अस्सल ऑसी वृत्ती भिनलेल्या या असामान्य गुणवत्तेच्या लेगस्पिनरने जोरदार उसळी घेतली. तब्बल दीडशतक त्याने क्रिकेटमध्ये वळणदार फिरकी गोलंदाजीने अधिराज्य गाजवले. फलंदाजांना ओघवत्या आणि वैविध्यपूर्ण, तेवढ्याच अचूक फिरकीवर नाचविले. अस्तंगत होत चाललेल्या लेगस्पिन शैलीस ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली; १४५ कसोटीत ७०८, तर १९४ एकदिवसीय लढतीत २९३ मिळून एकूण १००१ आंतरराष्ट्रीय बळी घेतले. 

त्याची फिरकी फलंदाजांना प्रश्नांकित आणि संमोहित करे. वॉर्न मुळातच आक्रमक वृत्तीचा. फसव्या चेंडूवर गडी बाद केल्यानंतर त्याचा उन्माद खास असायचा. त्याच्यात साजेसे नेतृत्वगुण होते, पण तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होऊ शकला नाही, मात्र भारतातील आयपीएलच्या पहिल्याच वर्षी त्याने २००८मध्ये राजस्थान रॉयल्सला विजेतेपद जिंकून देताना नेतेपदाची चुणूक दाखविली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९९९मध्ये ऑस्ट्रेलियाने जगज्जेतेपद मिळविले, त्यावेळी आंग्ल भूमीवर वॉर्नची फिरकी मॅचविनर ठरली.

मेलबर्नचा रॉकस्टार...
मेलबर्न शहर वॉर्नची कर्मभूमी. या ठिकाणच्या भव्यदिव्य स्टेडियमवर त्याने कारकिर्दीत पहिल्यांदा डावात पाच बळी घेतले, हॅटट्रिक साधली. तसेच ७००वी विकेटही घेतली. क्रिकेट मैदानाबाहेर वॉर्नच्या जीवनशैलीस वादाची किनार लाभली. त्याला भरपूर मैत्रिणी होत्या, त्यामुळेही तो चर्चेत राहिला. तो बिनधास्त सिगरेट फुंकायचा. त्याला कोणाची पर्वा नसायची. जीवन मस्तीत जगला. बेटिंगप्रकरणी माहिती पुरविणे किंवा बंदी असलेल्या द्रव्यपदार्थाचे सेवन यामुळे त्याचे क्रिकेटमधून निलंबनही झाले. रात्री उशिरापर्यंत पार्ट्या झोडण्यातही तो मागे राहायचा नाही, मात्र क्रिकेट मैदानावर येताना मेहनत आणि समर्पित वृत्तीस त्याने अजिबात नजरअंदाज केले नाही. शेन वॉर्न या महान क्रिकेटपटूचे व्यक्तिमत्त्व म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या.

संबंधित बातम्या