रामदिन यांची गूढ फिरकी

किशोर पेटकर
सोमवार, 21 मार्च 2022

क्रीडांगण

वेस्ट इंडीजचे महान फिरकी गोलंदाज सोनी रामदिन यांचे काही दिवसांपूर्वी वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. त्यांची फिरकी गूढ होती. त्यांचे चेंडू दोन्ही बाजूंनी वळत. ऑफस्पिन गोलंदाज ही त्यांची ओळख, पण ऑफब्रेक आणि लेगब्रेकचे बेमालूम मिश्रण करून त्यांनी फलंदाजांना नामोहरम केले. रामदिन आणि डावखुरे फिरकी गोलंदाज एल्फ व्हॅलेंटाईन यांनी विंडीज क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजीला मानाचे स्थान मिळवून दिले. आग ओकणारे तेजतर्रार गोलंदाज ही विंडीज क्रिकेटची ओळख, पण रामदिन व व्हॅलेंटाईन यांनी फिरकी गोलंदाजीही क्रिकेटमध्ये निर्णायक ठरते हे सिद्ध करून दाखविले. रामदिन यांच्या कसोटी कारकिर्दीचा अस्त होत असताना विंडीज क्रिकेटमध्ये आणखी एक महान फिरकी गोलंदाज लान्स गिब्ज यांचा उदय झाला. रामदिन हेच गिब्ज यांचे आदर्श होते. ४३ कसोटींत १५८ आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७५८ बळी ही रामदिन यांची गोलंदाजीतील आकडेवारी आहे.

इंग्लिश फलंदाज गांगरले
सन १९५०मध्ये इंग्लंड दौऱ्यावर निघालेल्या वेस्ट इंडीज संघात सोनी रामदिन यांची निवड झाली. ८ जून १९५० रोजी त्यांनी मँचेस्टरला इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यापूर्वी कॅरेबियन भूमीत ते फक्त दोन प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले होते. त्यांच्या फिरकीची कमाल पाहून वेस्ट इंडीज क्रिकेट निवड समिती प्रभावित झाली आणि रामदिन यांना इंग्लंडला जाणाऱ्या विमानात जागा मिळाली. पहिल्याच कसोटीत दोन्ही डावात मिळून चार गडी बाद केलेल्या रामदिन यांनी नंतर आंग्ल फलंदाजांना गादर केले. लॉर्ड्‍सवरील दुसऱ्या कसोटीत रामदिन यांनी सामन्यात ११ गडी बाद करून वेस्ट इंडीजला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यांनी पहिल्या डावात ५-६६ व दुसऱ्या डावात ६-८६ अशी कामगिरी केली, त्या जोरावर वेस्ट इंडीजने ३२६ धावांनी मिळविला आणि नंतर मालिका ३-१ फरकाने जिंकण्याचा पराक्रमही केला. पहिल्याच मालिकेतील चार कसोटींत रामदिन यांनी २६ गडी टिपले. कारकिर्दीतील सर्वाधिक बळी त्यांनी इंग्लंडविरुद्ध मिळविले. इंग्लंडविरुद्ध ते १८ सामने खेळले आणि ८० गडी बाद केले. किवींच्या भूमीतही त्यांच्या चेंडूने फिरकी घेतली. न्यूझीलंडमध्ये त्यांनी सहा कसोटींत ३२ फलंदाज बाद केले. एकंदरीत त्यांनी कारकिर्दीतील ५८ विकेट मायभूमीतील खेळपट्ट्यांवर मिळविल्या, तर १०० गडी परदेशी भूमीवर टिपले.

भारतीय वंशाचे पहिले
वेस्ट इंडीजतर्फे कसोटी क्रिकेट खेळणारे सोनी रामदिन हे भारतीय वंशाचे पहिले क्रिकेटपटू. १९५० ते १९६० हा कालावधी कॅरेबियन क्रिकेटमध्ये रामदिन यांनी वलयांकित केला. त्यांचे पूर्वज भारतातून वेस्ट इंडीजमध्ये आले होते. त्रिनिदादमध्ये ते आले आणि कॅरिबियन झाले. शाळेत असताना रामदिन यांच्या नावाचा ‘बॉय’ हा उल्लेख होता. क्रिकेट खेळायला मिळतेय या कारणास्तव ते कॅनेडियन मिशन स्कूलमध्ये जात असत, तेथेच त्यांना सोनी हे टोपणनाव मिळाले व कायमचे चिकटले. इंग्लंड दौऱ्यावर जाताना पारपत्रावर नियमानुसार आद्याक्षरे हवीत या कारणास्तव रामदिन यांच्या नावात के.टी. ही आद्याक्षरे आली असा उल्लेख सापडतो. कसोटीतून निवृत्त झाल्यानंतर ते इंग्लंडमध्ये रमले, लँकेशायर, लिंकनशायरतर्फे काही काळ क्रिकेट खेळले.

संबंधित बातम्या