हैदराबादचे आयएसएल यश

किशोर पेटकर
सोमवार, 28 मार्च 2022

क्रीडांगण

भारतीय फुटबॉलमध्ये हैदराबाद शहराला मानाचे स्थान आहे. गेली काही वर्षे हे शहर फुटबॉलमध्ये काहीसे पिछाडीवर गेले, परंतु आता पुन्हा यशस्वी वाटेवर परतले आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत हैदराबाद एफसीने प्रथमच विजेतेपद पटकाविले. हा करंडक जिंकताना त्यांनी केरळा ब्लास्टर्सला १-१ गोलबरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटवर हरविले. केरळचा संघ पुन्हा कमनशिबी ठरला. तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठूनही त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

हैदराबादला यावेळी दुहेरी यशाची संधी होती. साखळी फेरीत त्यांनी शानदार खेळ केला, परंतु एक फेरी बाकी असताना जमशेदपूर एफसीकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांना साखळी फेरीत अव्वल ठरून लीग विनर्स शिल्ड जिंकण्याची करामत साधता आली नाही. जमशेदपूर संघ शिल्डचा मानकरी ठरला, परंतु उपांत्य फेरीत केरळा ब्लास्टर्सकडून हार पत्करल्यामुळे जमशेदपूर संघ करंडकासाठी दावा करू शकला नाही. गतमोसमात मुंबई सिटीने शिल्ड आणि करंडकाचा मान मिळविला होता, तसा पराक्रम यावेळी साध्य झाला नाही, तरीही हैदराबाद, तसेच जमशेदपूर संघाने स्पर्धेत कौतुकास्पद खेळ करून वाहव्वा मिळविली.

तीन वर्षांची वाटचाल
आयएसएल ही देशातील प्रमुख फुटबॉल स्पर्धा आहे. स्पर्धेचा यंदा आठवा मोसम होता. कोविड-१९मुळे गतमोसमाप्रमाणे गोव्यातच अंतिम लढत वगळता सारे सामने रिकाम्या स्टेडियमवर झाले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत हैदराबाद संघ तीन वर्षांपूर्वी दाखल झाला. पुणे सिटी एफसीने माघार घेतल्यानंतर, २०१९मध्ये हैदराबादमधील संघाला स्पर्धेत प्रवेश मिळाला. २०१९-२०मध्ये पहिलाच मोसम त्यांच्यासाठी खूपच निराशाजनक ठरला. इंग्लंडच्या फिल ब्राऊन यांचे मार्गदर्शन प्रभावी ठरले नाही, दहा संघांत हैदराबादला शेवटचा क्रमांक मिळाला. जून २०२०मध्ये स्पेनच्या आल्बर्ट रोका यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली, मात्र दोन महिन्यांतच त्यांनी बार्सिलोनात परतण्याचा निर्णय घेतला आणि स्पेनचेच मान्युएल (मानोलो) मार्केझ यांची प्रशिक्षकपदी वर्णी लागली. या ५३ वर्षीय अनुभवी मार्गदर्शकाने हैदराबादला सफलतेची दिशा दाखविली. मानोलो यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादला २०२०-२१ मोसमात उपांत्य फेरी थोडक्यात हुकली, त्यांना पाचवा क्रमांक मिळाला. यावेळी त्यांनी गटसाखळी दुसऱ्या क्रमांकासह उपांत्य फेरी गाठली. एटीके मोहन बागानला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि नंतर पिछाडीवरून जबरदस्त मुसंडी मारत करंडकासही गवसणी घातली.

युवा-अनुभवींचा संगम
हैदराबादच्या आयएसएल करंडक विजेतेपदाच्या वाटचालीत नवख्या आणि अनुभवी खेळाडूंचा संगम मार्गदर्शक मार्केझ यांनी साधला. परिपक्व नियोजनेला कल्पकतेची जोड दिली. प्रशिक्षकाने देशातील युवा गुणवत्तेवर विश्वास प्रदर्शित करताना संघाचे धोरण यशस्वीपणे राबविले. अनुभवी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला पुनरागमनाची संधी दिली. अंतिम लढतीत या गोलरक्षकाने तीन पेनल्टी फटके अडवून प्रशिक्षकाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला. मार्केझ यांनी दर्जेदार परदेशी खेळाडू संघात आणले. गतमोसमात मुंबई सिटीकडून खेळलेल्या नायजेरियाच्या ३७ वर्षीय बार्थोलोम्यू ओगबेचे याने सर्वाधिक १८ गोल नोंदवून उपयुक्तता सिद्ध केली. २४ वर्षीय स्पॅनिश आघाडीपटू हावियर सिव्हेरियो याने भारतातील पहिल्याच मोसमात उल्लेखनीय सात गोल केले. ब्राझीलच्या ३३ वर्षीय जुवाव व्हिक्टर याने कर्णधारपदास न्याय देताना पाच गोलही केले.
 

संबंधित बातम्या