बार्टीची अनपेक्षित निवृत्ती

किशोर पेटकर
सोमवार, 4 एप्रिल 2022

क्रीडांगण

ऑस्ट्रेलियाची अव्वल महिला टेनिसपटू अॅश्‍ले (अॅश) बार्टी हिने अनपेक्षित निवृत्ती जाहीर करून साऱ्यांनाच धक्का दिला. कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यावर ती होती आणि वयही जास्त नव्हते, अवघे २५. आता थांबायलाच हवे हा विचार पक्का करून तिने आंतरराष्ट्रीय टेनिसचा निरोप घेतला. यावर्षी जानेवारीत बार्टीने मेलबर्नला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम यश साजरे केले होते. तेव्हा अंतिम लढतीत अमेरिकेच्या डॅनियल कॉलिन्सला नमविणारी ऑसी खेळाडू दोन महिन्यांत निवृत्तीची घोषणा करेल, याचा कोणालाच अंदाज नव्हता. मार्च महिन्याच्या सुरुवातीस अॅशने इंडियन वेल्स व मायामी ओपनमधून माघार घेतली. माघार घेताना तिने शरीरावरील ताण आणि तंदुरुस्तीचे कारण दिले होते. एकंदरीत तिने आंतरराष्ट्रीय टेनिसमधील निवृत्तीचा निर्णय पूर्ण विचारांती आणि खंबीरपणे घेतल्याचे स्पष्ट आहे.

जिगरबाज अष्टैपूल क्रीडापटू
अॅश्‍ले बार्टीला सारे जग यशस्वी महिला टेनिसपटू या नात्याने ओखळत असले, तरी तिने काही काळ क्रिकेट आणि गोल्फमध्येही कौशल्य प्रदर्शित केले. ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅश लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी २०१४मध्ये तिने टेनिसचे रॅकेट खाली ठेवले आणि बॅट-बॉल हाती घेतले.

ब्रिस्बेनच्या संघातर्फे टी-२० क्रिकेट खेळल्यानंतर २०१६मधील पूर्वार्धात तिने पुन्हा व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन केले, यावेळी तिचे एकेरीतील जागतिक मानांकन ६२३ क्रमांकापर्यंत घसरले होते. पण अॅशने महिला टेनिस कोर्टवर मुसंडी मारली. २०१९मध्ये तिने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकताना फ्रेंच ओपनमध्ये मातीच्या कोर्टवर बाजी मारली. त्यानंतर महिला टेनिस क्रमवारीत पहिल्या क्रमांकापर्यंत जबरदस्त भरारी घेत सर्वांना थक्क केले. कोविड महासाथीच्या सुरुवातीच्या काळात ती पुन्हा टेनिसपासून दूर गेली, काही काळ गोल्फही खेळली. तब्बल अकरा महिन्यानंतर २०२१च्या सुरुवातीला ती पुन्हा आवडत्या टेनिस कोर्टवर परतली. त्यावर्षी विंबल्डन आणि यंदा ऑस्ट्रेलियन ओपन अशा दोन प्रमुख स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला.

विंबल्डन जिंकून स्वप्नपूर्ती
वयाच्या चौदाव्या वर्षी २०१०मध्ये अॅश बार्टीने व्यावसायिक महिला टेनिसमध्ये पदार्पण केले. वर्षभरानंतर तिने विंबल्डन टेनिस स्पर्धेत ज्युनियर मुलींत विजेतेपदाचा करंडक पटकावला. त्यानंतर दहा वर्षांनी २०२१मध्ये महिला एकेरीत धडाका राखत तिने कॅरोलिना प्लिस्कोवाला हरवून विंबल्डन जिंकण्याची स्वप्नपूर्ती केली. तब्बल ४१ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन महिला विंबल्डनच्या हिरवळीवर विजेती ठरली. यावर्षी पहिले ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिळवले. या स्पर्धेत अजिंक्य ठरत तिने यजमान देशाचा महिला एकेरीतील ४४ वर्षांचा वनवास संपुष्टात आणला. कारकिर्दीत अॅश बार्टीने १२१ आठवडे अव्वल स्थान भूषविले, त्यापैकी ११४ आठवडे सलग होते. अमेरिकन ओपनचा अपवाद वगळता एकेरीत तिने इतर तिन्ही ग्रँडस्लॅम जिंकण्याची किमया साधली. ती टेनिसमधील दुहेरीतही निपुण ठरली. २०१८मध्ये तिने अमेरिकन ओपनमध्ये महिला दुहेरीचा किताब पटकाविला होता. गतवर्षी टोकियोत मिश्र दुहेरीचे कांस्यपदक जिंकून ऑलिंपिक पदकही मिळवले. एकेरीत तीन ग्रँडस्लॅम आणि १५ डब्ल्यूटीए विजेतीपदे मिळविणाऱ्या अॅश्‍ले बार्टीची कारकीर्द संस्मरणीय ठरली.

संबंधित बातम्या