ऑस्ट्रेलियन महिलांची ‘सप्तपदी’

किशोर पेटकर
सोमवार, 11 एप्रिल 2022

क्रीडांगण

महिला क्रिकेटमधील निर्विवाद वर्चस्व अधोरेखित करताना ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वकरंडक सातव्यांदा जिंकला. संपूर्ण स्पर्धेत हा संघ अपराजित राहिला. मेघ लॅनिंग हिच्या नेतृत्वाखालील संघाने सलग नऊ सामने जिंकण्याची किमया साधली. ख्राईस्टचर्च येथे झालेल्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५७ धावांचे आव्हान पार करता न आल्याने प्रतिस्पर्धी इंग्लंडला सलग दुसऱ्यांदा विश्वकरंडक जिंकता आला नाही. पाच वर्षांपूर्वी, मायभूमीत इंग्लंडने भारताला हरवून जगज्जेतेपद मिळविले होते. तेव्हा ऑस्ट्रेलियन महिलांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले होते. भारतीय महिला त्यांना भारी ठरल्या. यावेळेस मिताली राज हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. त्यांना उपांत्य फेरीही गाठता आली नाही. ऑस्ट्रेलियन महिलांनी दिमाखदार खेळ करताना अष्टपैलूत्व सिद्ध केले. तुलनेत इंग्लंडच्या महिला अडखळतच अंतिम फेरीत दाखल झाल्या होत्या. नॅटली सिव्हरने नाबाद १४८ धावा केल्या नसत्या, तर ऑस्ट्रेलियाला ७१पेक्षा जास्त धावांनी विजय नोंदविता आला असता. अंतिम लढतीत १७० धावा केलेल्या अॅलिसा हिलीला  सलामीची सहकारी रेचेल हेन्स (६८) व बेथ मूनी (६२) यांची साथ मिळाली. त्यामुळे महिला क्रिकेटच्या अंतिम लढतीत प्रथमच धावसंख्या साडेतीनशेच्या पार गेली. 

अॅलिसा हिलीचा पराक्रम
ऑस्ट्रेलियाची सलामीची फलंदाज-यष्टिरक्षक अॅलिसा हिली संघाच्या जगज्जेतेपदाची शिल्पकार ठरली. या ३२ वर्षीय खेळाडूने वेस्ट इंडीजविरुद्ध उपांत्य लढतीत १२९ धावा केल्या, नंतर अंतिम लढतीत केलेली १३८ चेंडूंतील १७० धावांची प्रेक्षणीय खेळी विक्रमी ठरली. पुरुष आणि महिला क्रिकेटमधील विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम अॅलिसाने नोंदविला. यापूर्वी २००७मध्ये विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टने १४९ धावा केल्या होत्या. अॅलिसाने स्पर्धेत सर्वाधिक ५०९ धावा केल्या. अंतिम सामन्याची मानकरी आणि स्पर्धेची मानकरी हे दोन्ही किताब तिला मिळाले. अॅलिसाच्या आक्रमक फलंदाजीने महिला क्रिकेटला आगळीच झळाळी मिळाली आहे. फेब्रुवारी २०१०मध्ये तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑक्टोबर २०१९मध्ये तिने श्रीलंकेविरुद्ध टी-२० लढतीत अतिशय स्फोटक फलंदाजी करताना अवघ्या ६१ चेंडूंत नाबाद १४८ धावा करण्याचा पराक्रम केला. दोन वर्षांपूर्वी मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाला टी-२० विश्वकरंडक जिंकून देताना अॅलिसाने भारताविरुद्ध ३९ चेंडूंत ७५ धावांचा तुफानी फटकेबाजी केली. 

तिचे कुटुंबच क्रिकेटमध्ये रमले आहे. काका इयान हिली ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेटमधील माजी दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज. तिचा पती मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाचा प्रमुख डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. काका आणि पतीसारखाच पराक्रम अॅलिसा महिलांच्या क्रिकेट मैदानावर बजावताना दिसतेय.

ऑस्ट्रेलियाचा धडाका
न्यूझीलंडमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडकात ऑस्ट्रेलियन महिलांनी जगज्जेत्यांच्या थाटातच खेळ केला. १९७८ ते २०२२ या कालावधीत सात वेळा विश्वकरंडकावर नाव कोरले आहे. दोन वेळा त्यांना उपविजेतेपद मिळाले. टी-२० क्रिकेटमधील विश्वकरंडकात २०१६चा अपवाद वगळता पाच वेळा विजेतेपदास गवसणी घातली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियन महिलांनी एकदिवसीय आणि टी-२० जगज्जेतेपदाचा जल्लोष करत अव्वल स्थानाची शोभा वाढविली आहे. झटपट क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियन महिलांचा धडाका संस्मरणीय आहे.

संबंधित बातम्या