इटलीचे विश्वकरंडक अपयश

किशोर पेटकर
सोमवार, 18 एप्रिल 2022

 क्रीडांगण

सलग दुसऱ्यांदा प्रतिष्ठेच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत इटलीचा संघ खेळताना दिसणार नाही. विश्वकरंडकाच्या युरोपियन पात्रता फेरीत त्यांना अपयश आले. फिफाच्या जागतिक क्रमवारीत पन्नासच्या पुढे असलेल्या नॉर्थ मॅसेडोनिया संघाने इटलीला प्ले-ऑफ उपांत्य फेरीत हरविले आणि साऱ्या फुटबॉल जगतास धक्का दिला. पालेर्मो येथे घरच्या मैदानावर इटलीवरही नामुष्की ओढावली. नॉर्थ मॅसेडोनियाने त्यांना एका गोलने पराजित केले. रॉबर्टो मॅन्सिनी यांच्या मार्गदर्शनाखालील इटलीच्या संघाला, तसेच इटालियन फुटबॉल चाहत्यांसाठी हा निकाल अनपेक्षितच ठरला. वर्षभरापूर्वी युरो करंडक जिंकलेल्या संघाला विश्वकरंडकाच्या मुख्य फेरीसाठी पात्रता मिळू नये ही नाचक्कीच ठरली. २०१८मधील विश्वकरंडक स्पर्धेतही हा चार वेळचा विजेता संघ नव्हता. यावेळी त्यांना युरोपियन पात्रता फेरीत 'क' गटात स्वित्झर्लंडनंतर दुसरा क्रमांक मिळाला, त्यामुळे प्ले-ऑफ फेरीत खेळावे लागले. नॉर्थ मॅसेडोनिया हा तसा फुटबॉलमधील नवखा संघ मानला जातो. पूर्वाश्रमीच्या युगोस्लाव्हियातून त्यांना १९९१मध्ये स्वातंत्र्य मिळाले, नंतर १९९८पासून नॉर्थ मॅसेडोनिया विश्वकरंडक पात्रता फेरीत खेळत आहे. २०२०मधील युरो करंडक मुख्य फेरीस हा संघ प्रथमच पात्र ठरला होता. प्ले-ऑफ अंतिम लढतीत पोर्तुगालकडून हार पत्करल्यामुळे त्यांचे २०२२मधील विश्वकरंडक स्पर्धेच्या मुख्य फेरीत दाखल होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. इटलीने २००६मध्ये शेवटचा विश्वकरंडक जिंकला होता, त्यानंतर मात्र जागतिक पातळीवर मोठ्या स्पर्धेत त्यांनी घसरणच अनुभवली. २०१० व २०१४मध्ये साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले. आता सलग दुसऱ्यांदा पात्र न ठरण्याची पाळी आली.

इटलीतील फुटबॉलमध्ये चढउतार

इटलीचा फुटबॉल संघ २०१८मध्ये विश्वकरंडक स्पर्धेची मुख्य फेरी गाठू शकला नाही. त्यानंतर तेथील फुटबॉलने मोठे बदल अनुभवले. मे २०१८मध्ये मॅन्सिनी यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इटलीच्या राष्ट्रीय संघाने चढता आलेख अनुभवला. गतवर्षी ११ जुलैला लंडनमधील वेम्बली स्टेडियमवर यजमान इंग्लंडला पेनल्टी शूटआऊटवर हरवून इटलीने युरो करंडकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. ऑक्टोबर २०१८ ते ऑक्टोबर २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत सलग ३७ सामने अपराजित राहण्याचा पराक्रम साधताना इटलीने ब्राझील व स्पेनलाही मागे टाकले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये यूईएफए नेशन्स लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेनकडून हार पत्करल्यामुळे इटलीची अपराजित आगेकूच खंडित झाली. नंतर त्यांनी बेल्जियमला हरवून या स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले. नोव्हेंबर २०२१मध्ये विश्वकरंडक पात्रता फेरीतील महत्त्वपूर्ण लढतीत नॉर्दन आयर्लंडने गोलशून्य बरोबरीत रोखल्यापासून इटलीच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा आलेख खालावत गेला. 

तीन संघांची प्रतीक्षा

कतारमध्ये यावर्षी २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. ३२पैकी २९ पात्र संघ ठरले आहेत. आता तीन संघांची प्रतीक्षा आहे. येत्या जूनमध्ये बाकी तिन्ही संघ निश्चित होतील. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे स्कॉटलंड व युक्रेन यांच्यातील उपांत्य सामना लांबणीवर पडला. या लढतीनंतर वेल्स संघाचा प्रतिस्पर्धी निश्चित होईल. अन्य एका पात्रता लढतीत कोस्टारिका व न्यूझीलंड यांच्यात चुरस असेल, तर संयुक्त अरब अमिराती व ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेत्याशी पेरूचा संघ खेळेल.

संबंधित बातम्या