जगज्जेती निखत झरीन

किशोर पेटकर
सोमवार, 30 मे 2022

क्रीडांगण

बॉक्सिंग मुलगेच का खेळतात, मुली का नाही, असे निरागसपणे आपल्या वडिलांना विचारत निखत झरीनने हातात बॉक्सिंगचे ग्लोव्ह चढविले. तेव्हा तिला वडिलांनी सांगितले होते, या खेळात मानसिक मनोबल हवे, सामर्थ्य आणि गतिशीलता महत्त्वपूर्ण ठरते, तसेच समोरच्यास ठोसा लगावण्यासाठी धीटपणा आणि ताकद यांची गरज भासते. निखत आत्मविश्वासाने म्हणाली, ‘मै खेलूंगी...’ आणि तेथूनच तिची जगज्जेतेपदाची वाटचाल सुरू झाली. तेलंगणातील निझामाबाद येथील महंमद जमील हे क्रिकेट व फुटबॉल खेळायचे. लहानग्या निखतला घेऊन ते मैदानावर गेले. धावण्याचा सराव सुरू झाला, मात्र निखत बॉक्सिंगच्या प्रेमात पडली. 

प्रतिस्पर्ध्यांवर जबरदस्त ठोसे लगावत २५ वर्षीय कणखर, चिवट मुलगी जागतिक विजेती झाली. तुर्कस्तानातील इस्तंबुल येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत निखतने ५२ किलो वजनगटात जगज्जेतेपदाचा किताब पटकावला. असा पराक्रम करणारी ती पाचवी भारतीय महिला ठरली. दिग्गज आणि महान एम. सी. मेरी कोमने तब्बल सहा वेळा विश्वजेतेपद मिळविले आहे. सरिता देवी, आर. एल. जेनी, के. सी. लेखा यांनी २००६मध्ये जागतिक स्पर्धेत बाजी मारली होती. मेरी कोमने शेवटचे जगज्जेतेपद २०१८मध्ये मिळविले होते. आता निखतने ही जबाबदारी पेलली आहे.

चढ-उताराचा प्रवास
जगज्जेती झालेल्या निखत झरीनचा प्रवास तसा सोपा नाही. खाचखळगे, चढ-उताराच्या मार्गावरून तिला प्रवास करावा लागला. ती डगमगली नाही, उलट अधिक त्वेषाने प्रतिस्पर्धी बॉक्सरवर तुटून पडली. २०११मध्ये पंधराव्या वर्षी तिने तुर्कस्तानधीलच अंताल्या येथे मुलींच्या ज्युनियर गटात जागतिक स्पर्धा जिंकली. २०१२मध्ये महिला बॉक्सिंगचा ऑलिंपिकमध्ये समावेश झाला. मेरी कोमने लंडन ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकले आणि भारतीय महिला बॉक्सिंगमध्ये क्रांती घडली. निखतही मेरी कोमला आदर्श मानून धीटाईने बॉक्सिंग करू लागली. मात्र २०१७ साल तिच्यासाठी दुर्दैवी ठरले. खांद्याच्या दुखापतीमुळे सुमारे वर्षभर बॉक्सिंग रिंगपासून तिला दूर राहावे लागले. त्यामुळेच २०१८मध्ये तिला राष्ट्रकुल क्रीडा, आशियाई क्रीडा, तसेच जागतिक बॉक्सिंग स्पर्धेला मुकावे लागले. २०१९मध्ये निखतने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत ब्राँझपदक जिंकत आपण सज्ज असल्याचे सिद्ध केले, पण ते वर्ष तिच्यासाठी खूपच वादग्रस्त ठरले. टोकियो ऑलिंपिक पात्रतेसाठी निवड चाचणी घ्यावी ही तिची मागणी होती. मेरी कोम आणि निखत यांचा वजनगट एकच होता, त्यामुळे बॉक्सिंग महासंघाची गोची झाली. जिद्दी निखत मागे हटली नाही. तिने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचेही द्वार ठोठावले. अखेरीस महासंघाला मेरी कोम व निखत यांच्यात लढत घ्यावी लागली. प्रकरण बॉक्सिंग रिंगबाहेरही खूप गाजले. टीकाही झाली. कडवडपणाही आला. निवड चाचणी लढत मेरी कोमने लीलया जिंकली. निखतला माघार घ्यावी लागली, पण ती डगमगली नाही. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तिने अथक परिश्रम घेतले. आता ती जगज्जेती झाल्यानंतर खुद्द मेरी कोमनेच निखतचे जाहीर कौतुक करत तिला शुभेच्छाही दिल्या.

पॅरिस ऑलिंपिकचे लक्ष्य
आणखी दोन वर्षांनी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकसाठी पात्रता हेच निखतचे लक्ष्य आहे. ऑलिंपिकमध्ये तिचा सध्याचा ५२ किलो वजनगट नाही. त्यामुळे ५० किंवा ५४ किलो वजनगटात खेळावे लागेल. जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ती नव्या वजनगटात सहभागी होईल. ५० किलो वजनगटास तिची पसंती आहे. पॅरिस ऑलिंपिकसाठी निखतला 
संघर्ष करावा लागेल.

संबंधित बातम्या