प्रेरक आणि हुशार ‘कॅप्टन’

किशोर पेटकर
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

स्मरण
 

अजित वाडेकर गेले... देशाच्या यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी ही कटू बातमी ऐकायला मिळाली. मृत्यूसमयी ते ७७ वर्षे व १३६ दिवसांचे होते. वाडेकर यांची कारकीर्द मोठी पराक्रमी आणि ऐतिहासिक. कॅरेबियन भूमीत, तसेच इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघ कसोटी मालिका जिंकू शकतो हे कर्णधार या नात्याने त्यांनी सिद्ध केले. अजित वाडेकर हे व्यक्तिमत्त्व कमालीचे प्रेरक  आणि  कल्पक. ते गणितात हुशार होते, त्यामुळे अभियंता बनावे असे त्यांच्या वडिलांना वाटायचे, पण बनले क्रिकेटपटू. अगोदर कर्णधार,  नंतर प्रशिक्षक बनल्यानंतर क्रिकेट मैदानावरील ‘कोडी’ सोडविताना त्यांनी आपल्या गणिती मेंदूचा तल्लखपणे वापर केला. भारताच्या यशस्वी कर्णधारांत ते गणले जातात, या यादीत त्यांचे नाव अग्रस्थानीच आहे. ते कर्णधार असताना परदेशी भूमीवर दिलीप सरदेसाई, सुनील गावसकर या नवोदितांची फलंदाजी बहरली. भारतीय फिरकी गोलंदाजीस अफलातून धार चढली आणि ‘क्‍लोज इन’ क्षेत्ररक्षकांचा दरारा वाढला. वाडेकर अपघातानेच क्रिकेटपटू बनले. शालेय जीवनात त्यांनी क्रिकेट मैदाने गाजविल्याचे ऐकिवात नाही. महाविद्यालयीन पातळीवर ते संघात बारावा गडी होते. एखादा नियमित खेळाडू गैरहजर राहिला, तर वाडेकर  हे नाव संघात येत असे. कारण - त्यांची फेक जबरदस्त होती. झाडांची फळं ते दगड मारून अचूकपणे पाडत. या वैशिष्ट्यामुळे वाडेकरना महाविद्यालयीन संघात ‘राखीव’ जागा मिळाली. ते डावखुरे. नंतर त्यांनी क्रिकेट गांभीर्याने घेतले. संघात संधी मिळाल्यानंतर त्यांनी मैदाने दणाणून सोडली. या डावखुऱ्या फलंदाजाने क्रिकेट जगतास दखल घेण्यास भाग पाडले. १९५८ मध्ये त्यांनी मुंबईच्या रणजी संघात जागा पटकाविले. ते डावखुरी मध्यमगती गोलंदाजीही टाकायचे, पण फलंदाज म्हणूनच जास्त लक्षात राहिले. रणजी क्रिकेटमधील त्यांची सुरवात जेमतेम होती, नंतर कामगिरीचा आलेख चढता राहिला. १९६६ मध्ये राजस्थानविरुद्धच्या रणजी सामन्यात त्यांनी त्रिशतक काढले आणि आक्रमक शैलीच्या या फलंदाजास भारतीय क्रिकेट संघाचा दरवाजा उघडला गेला. १३ डिसेंबर १९६६ रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअमवर त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जुलै १९७४ मध्ये शेवटची कसोटी खेळेपर्यंत या डावखुऱ्या क्रिकेटपटूने स्वतःची वेगळी ओळख भारतीय क्रिकेटमध्ये प्रस्थापित केली. कर्णधारपदाची जबाबदारी त्यांच्याकडे अनपेक्षितपणेच आली. भारताचे माजी कसोटीपटू विजय मर्चंट यांनी वाडेकर यांच्यातील तल्लख कर्णधार हेरला होता. मन्सूर अली खान पतौडी अपयशी ठरल्यानंतर १९७१ मध्ये निवड समितीने नव्या कर्णधाराचा शोध सुरू केला. चंदू बोर्डे यांच्यासाठीही निवड समिती अनुकूल नव्हती. अखेरीस पाच वर्षांचा अनुभव असलेल्या वाडेकर यांचे नाव पुढे आले. यावरून निवड समितीत दोन गट पडले, वादावादी झाली. मतदान घ्यायचे ठरले आणि मर्चंट यांच्या ‘कास्टिंग वोट’मुळे वाडेकर कर्णधार बनले.

यशस्वी कर्णधार
वाडेकर हे भारतीय क्रिकेटमधील यशस्वी कर्णधार बनले. ते निराशावादी नव्हते. नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात आणि प्रोत्साहन देण्याची वृत्ती त्यांच्याकडे होती. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गुणवान क्रिकेटपटूंना संधी मिळाली, ते सफल ठरले. वाडेकर यांचा स्वभावच साऱ्यांशी मिसळून राहण्याचा. वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १९७०-७१ मोसमात कॅरेबियन बेटांवर जाऊन बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला पाणी पाजले होते. तेव्हा संघात प्रतिथयश खेळाडू नव्हते, मात्र त्या संघापाशी कमालीची जिगर होती आणि आत्मविश्‍वासाने भरलेला कर्णधार होता. वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९७१ मध्ये कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला १-० असे पराजित केले होते. ‘द ओव्हल’वर चार विकेट राखून मिळविलेला विजय ऐतिहासिक ठरला. इंग्लंडविरुद्धची ही कामगिरी ‘अपघाता’ने नव्हती हे भारतीय संघाने वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सिद्ध केली. १९७२-७३ मोसमातील दौऱ्यात भारताने पुन्हा इंग्लंडला मालिकेत २-१ फरकाने पराजित केले. इंग्लंडविरुद्ध सलग दोन कसोटी मालिका जिंकणारे, तसेच विंडीजमध्ये यश मिळविणारे ते पहिलेच भारतीय कर्णधार ठरले. ही झाली आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी. राष्ट्रीय स्तरावरही त्यांच्यातील कल्पक कर्णधार दिसला. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने चार वेळा रणजी करंडक जिंकला. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, मुंबईच्या संघातून ते खेळाडू-कर्णधार या नात्याने रणजी करंडक स्पर्धेच्या अकरा अंतिम लढती खेळले व प्रत्येकवेळी त्यांचाच संघ जिंकला. रणजी स्पर्धेत त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने एकही लढत गमावली नाही. तीस पैकी १६ सामन्यांत मुंबईच्या गळ्यात विजयाची माळ पडली, तर १४ सामने अनिर्णित राहिले. १९६८ मध्ये भारताने न्यूझीलंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकली, तेव्हाही ते संघाचे सदस्य होते. वाडेकर यांचा ‘पायगुण’ संघासाठी लाभदायक होता असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारत १६ सामन्यांत खेळला. त्यापैकी चार सामने जिंकले, चार पराभव पत्करावे लागले, तर आठ लढती अनिर्णित राहिल्या. परदेशात भारताला विजय मिळवून देणारे ‘कॅप्टन वाडेकर’ असामान्यच होते. त्यामुळे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी वाडेकर यांना कायमचे कर्णधार मानले. ‘माझा कर्णधार हरपला’ अशी भावूक प्रतिक्रिया गावसकर यांनी वाडेकर यांच्या निधनानंतर दिली.

तिहेरी भूमिकेत
वाडेकर यांनी वयाच्या ३३व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. खरं म्हणजे हे वय निवृत्तीचे नव्हेच, पण १९७४च्या इंग्लंड दौऱ्यातील नामुष्कीजनक पराभवानंतर त्यांचा स्वाभिमान दुखावला. लॉर्डसवर भारताचा डावात अवघ्या ४२ धावांत खुर्दा उडाला. हे अपयश भारतीय क्रिकेटप्रेमींना पचविता आले नाही. कर्णधार या नात्याने खराब कामगिरीसाठी वाडेकर यांना जबाबदार धरण्यात आले. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानावर अतिउत्साहींनी दगडफेकही केली. या निर्भत्सनेमुळे व्यथित झालेल्या वाडेकर यांनी १९७४ मध्ये कर्णधारपद त्यागले व क्रिकेट मैदानावरून दूर जाण्याचे ठरविले. त्यानंतर ते बॅंकिग सेवेत रमले. मात्र क्रिकेटपासून कायमचे दुरावले नाहीत. तब्बल १८ वर्षांनंतर त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये नव्या भूमिकेत पुनरागमन केले. नव्वदच्या दशकात भारतीय संघ दुबळा बनला होता. महंमद अझहरुद्दीनकडे नवोदितांच्या संघाचे नेतृत्व होते. कर्णधार या नात्याने वाडेकर यांनी आगळा ठसा उमटविलाच होता, त्यापासून बोध घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वाडेकर यांना १९९२ मध्ये संघाच्या प्रशिक्षक-व्यवस्थापकपदी नियुक्त केले. वाडेकर यांनी नियुक्तीला न्याय देत भारतीय क्रिकेट संघात वडिलांची भूमिका निभावली. अझहर, सचिन तेंडुलकरपासून साऱ्यांसाठीच ते आदरार्थी आणि सन्माननीय बनले. वेळप्रसंगी ते कडक शिस्तीतही वागले. भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडला वाडेकर यांनी प्रशिक्षकाच्या भूमिकेत इंगा दाखविला. फिरकी गोलंदाजांच्या भन्नाट कामगिरीमुळे भारतीयांनी मालिका ३-० फरकाने जिंकली होती. वाडेकर व अझहर यांची प्रशिक्षक-कर्णधाराची जोडी चांगलीच जमली. भारत १४ कसोटी सामन्यांत अपराजित राहिला. भारताने हीरो कपही जिंकला. मात्र १९९६ मध्ये वाडेकर यांना राजीनामास्त्राचा आधार घ्यावा लागला. त्या वर्षीच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत घरच्या मैदानावर अझहरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अपेक्षापूर्ती करू शकला नाही. उपांत्य फेरीत श्रीलंकेचा संघ वरचढ ठरला. वाडेकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर १९९८-९९ या कालावधीत त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये आणखी एक ‘कमबॅक’ करताना निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पेलली. कर्णधार -प्रशिक्षक-निवड समिती अध्यक्ष अशा तीन भूमिकेत दिसलेले वाडेकर हे लाला अमरनाथ व चंदू बोर्डे यांच्यानंतरचे तिसरे भारतीय क्रिकेटपटू ठरले. 

फिरकीवर भरवसा
अजित वाडेकर यांचा फिरकी गोलंदाजांवर जास्त भरवसा होता. कर्णधार या नात्याने त्यांनी यश मिळविले, त्यात संघातील फिरकी गोलंदाजांनी मोलाचा वाटा उचलला. संघातील फिरकी गोलंदाजांचा उत्कृष्टपणे वापर कसा करून घ्यायचा हे वाडेकर यांनी शिकविले. त्यांच्या नेतृत्वाखाली भागवत चंद्रशेखर, बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना, तसेच एस. व्यंकटराघवन यांच्या फिरकीला कमालीची धार चढली. प्रतिस्पर्धी फलंदाजांना फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात अडकविताना वाडेकर यांनी ‘क्‍लोज इन’ क्षेत्ररक्षणही परिणामकारक ठरविले. ते स्वतः स्लिपमधील दक्ष आणि चपळ क्षेत्ररक्षक होते. लेग स्लीप जागेवरही ते लीलया झेल टिपायचे. एकनाथ सोलकर यांनी फॉरवर्ड शॉर्टलेगला अजरामर कामगिरी बजावली. अबिद अली बॅकवर्ड शॉर्टलेगला झेल पकडण्यात वाकबगार होते. फिरकी गोलंदाजांना जवळच्या क्षेत्ररक्षकांकडून मोलाची साथ मिळायला लागली आणि भारतीय संघ कसोटी सामने जिंकू लागला. प्रशिक्षक बनल्यानंतर त्यांनी फिरकी गोलंदाजांवर विश्‍वास दाखविण्याचा कानमंत्र कर्णधार अझहरुद्दीनला दिला. वाडेकर प्रशिक्षक असताना नव्वदीच्या दशकात अनिल कुंबळे, व्यंकटपथी राजू व राजेश चौहान या फिरकी त्रिकुटाने घरच्या खेळपट्ट्यांवर जबरदस्त कामगिरी बजावली. भारतीय संघ ‘अपने गली का शेर’ बनला. फिरकी गोलंदाज आणि ‘क्‍लोज इन’ क्षेत्ररक्षक यांचे अतूट नाते वाडेकर यांनी यशस्वी ठरविले.

अर्धशतके जास्त!
वाडेकर यांनी कसोटी कारकिर्दीत फक्त एक शतक नोंदविले. ३७ कसोटींत २११३ धावा नोंदविताना १४ वेळा अर्धशतकाची वेस ओलांडली, मात्र शतकाअगोदर बाद होत. त्यामुळे त्यांच्या शतकाची संख्या एकवरून पुढे सरकलीच नाही. या डावखुऱ्या शैलीदार फलंदाजाने एकमात्र कसोटी शतक परदेशी भूमीवर नोंदविले. १९६७-६८ मोसमात न्यूझीलंडविरुद्ध बेसिन रिझर्व्ह मैदानावर त्यांनी १४३ धावांची शैलीदार शतकी खेळी केली होती. त्याच मोसमात ते ऑस्ट्रेलियात ९९वर बाद झाले होते. जुनेजाणते नेहमीच वाडेकर यांच्या फलंदाजीचा गोडवा गात. त्यांनी प्रत्यक्ष मैदानावर वाडेकर यांनी फलंदाजी अनुभवली होती. वाडेकर यांच्या 
हूक फटक्‍यात कमालीची सहजता होती. त्यांच्या फटक्‍यात आगळीच आकर्षकता दिसायची, पाहतच राहावी अशी नयनरम्य फलंदाजी. कसोटी संघात असताना फलंदाजीत तिसरा क्रमांक वाडेकर यांच्या हक्काचा होता.

विनोदी बुद्धीचे...
वाडेकर हे गंभीर व्यक्तिमत्त्वाचे, तेवढेच विनोदीही होते. वयाने मोठे असले, तरी त्यांनी प्रशिक्षक असताना सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी या विशीतील ‘मुंबईकरां’शी चांगले जुळवून घेतले होते. संघातही ते लोकप्रिय होते. खेळाडूंसाठी आधारवडच होते. पायचीत निर्णयावर ते नेहमीच विनोदी टिप्पणी करायचे, म्हणायचे, ‘‘मेरे तो नाममे ही एलबीडब्ल्यू है!’’ त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मण बी. वाडेकर होते. या खुसखुशीत व्यक्तिमत्त्वामुळे ‘ऑफफिल्ड’ असताना ते खेळाडूंचे चांगले मित्रही होते. 

सचिनला वाट गवसली...
भारताचा विश्‍वविक्रमवीर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके केली आहेत. झटपट क्रिकेटमधील पहिले शतक त्याने सलामीवीर बनल्यानंतरच नोंदविले आणि याकामी वाडेकर यांना सारे श्रेय जाते. खुद्द तेंडुलकरनेच ही बाब मान्य केलीय. प्रशिक्षक असताना १९९४ मधील न्यूझीलंड दौऱ्यात वाडेकर यांनी सचिनला सलामीला फलंदाजीस जाण्याचा सल्ला दिला. आव्हान स्वीकारण्यास नेहमीच सज्ज राहणाऱ्या सचिनने वाडेकर सरांची सूचना ग्राह्य मानून डावाची सुरवात केली. त्यानंतरचा सारा इतिहास सर्वश्रुत आहे. मधल्या फळीतील सचिन झटपट क्रिकेटमध्ये ‘ओपनिंग’ला कमालीचा यशस्वी ठरला. विक्रमामागून विक्रम रचत गेला.

अजित वाडेकर यांच्याविषयी...
     जन्मतारीख ः १ एप्रिल १९४१ (मुंबई)
     मृत्यू ः १५ ऑगस्ट २०१८
     शैली ः डावखुरे फलंदाज, डावखुरे मध्यमगती व फिरकी गोलंदाज
     पहिली कसोटी ः १३ ते १८ डिसेंबर १९६६ (विरुद्ध वेस्ट इंडिज, मुंबईत)
     शेवटची कसोटी ः ४ ते ८ जुलै १९७४ (विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम येथे)
     एकदिवसीय पदार्पण ः १३ जुलै १९७४ (विरुद्ध इंग्लंड, लीड्‌स येथे)
     शेवटचा एकदिवसीय सामना ः १५ जुलै १९७४ (विरुद्ध इंग्लंड, द ओव्हल)
     प्रथम श्रेणी कारकीर्द ः १९५८-५९ ते १९७४-७५

कारकीर्द 
     कसोटी क्रिकेट ः ३७ सामने, २११३ धावा, १ शतक, १४ अर्धशतके, ४६ झेल
     एकदिवसीय क्रिकेट ः २ सामने, ७३ धावा, १ अर्धशतक, १ झेल
     प्रथम श्रेणी क्रिकेट ः २३७ सामने, १५,३८० धावा, ३६ शतके, ८४ अर्धशतके, २७१ झेल, २१ बळी

प्रमुख जबाबदारी
     भारतीय संघाचे कर्णधारपद ः १९७०-७१ ते १९७४
     भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक-व्यवस्थापक ः सप्टेंबर १९९२ ते मार्च १९९६
     निवड समितीचे अध्यक्ष ः ऑक्‍टोबर १९९८ ते सप्टेंबर १९९९

मानसन्मान
     अर्जुन पुरस्कार ः १९६७
     पद्मश्री ः १९७२
     सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार ः २०११

फोटो फीचर

संबंधित बातम्या