‘पूर्वांचल’च्या पर्वतरांगा...

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 10 जानेवारी 2022


भूरत्ना वसुंधरा

आपला देश अनेक पर्वत आणि पर्वतरांगांनी समृद्ध देश आहे. तरीही काही पर्वत मात्र अजूनही आपल्याला पुरेसे परिचित नाहीत. ईशान्य भारतातील पूर्वांचलच्या टेकड्या ह्या त्यापैकीच.

उत्तरेकडील ब्रह्मपुत्रा नदीपात्राच्या व नमच्या बरवा या ३,४३२ मीटर उंच शिखराच्या पूर्वेस व दक्षिणेस काही अंतरापर्यंत पर्वतरांगा व टेकड्यांचा प्रदेश आहे. भारताच्या अगदी ईशान्य भागात या रांगा दिबांग नदीखोऱ्याच्या पुढे दक्षिणेकडे वळलेल्या दिसतात. पुढे त्या भारत-म्यानमार सरहद्दीवरून दक्षिणेकडे गेलेल्या दिसून येतात. या सर्व पर्वतरांगा व टेकड्या वेगवेगळ्या प्रादेशिक व स्थानिक नावांनी ओळखल्या जातात. या पर्वतरांगा मुख्य हिमालय पर्वतात समाविष्ट होत नसल्या, तरी त्या हिमालयाच्याच आणि त्याच्याशी निगडित पर्वतरांगा मानल्या जातात.

प्राकृतिक दृष्ट्या भारताचा ईशान्येकडील प्रदेश पूर्णपणे पर्वतीय नाही. त्यामध्ये कमी उंचीच्या टेकड्या, पठारे तसेच मैदानेही आहेत. तृतीयक (Tertiary) या २६ लाख ते ६.६ कोटी वर्षांच्या कालखंडातील वलीकरण (Folding) प्रक्रियेबरोबरच या पर्वतीय प्रदेशाचे उत्थापन (Uplifting) झालेले आहे. ईशान्येकडील पर्वतीय प्रदेश पूर्वांचल, मेघालय पठार आणि आसामचे खोरे अशा तीन प्राकृतिक उपविभागांत विभागला जातो. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम आणि मेघालय या राज्यांत वेगवेगळ्या रांगा व टेकड्या आढळतात. 

उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे मिशमी, पातकई, नागा, मणिपूर, मिझो किंवा लुशाई या नावांनी या टेकड्या ओळखल्या जातात. या संपूर्ण भागाला पूर्वांचल (पूर्वेकडील पर्वत) असे म्हटले जाते. या टेकड्या घनदाट जंगलांनी वेढलेल्या आहेत. या प्रदेशात झूम ही भटक्या प्रकारची (Shifting agriculture) शेती केली जाते. 

मेघालय पठार हा आज जरी ईशान्येकडील पर्वतरांगांचाच एक भाग मानला जात असला, तरी भूशास्त्रीय दृष्ट्या हा द्वीपकल्पीय भारताचा एक विस्तारित भाग असावा असे मानले जाते. पुरातन काळात याच्या पूर्वेला एक मोठा खोलगट भाग होता, तो नद्यांच्या संचयनकार्यामुळे भरून आला. मध्यजीव महाकल्पात २५ ते ६.६ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात आणि तृतीयक महाकल्पाच्या सुरुवातीच्या काळात सागरी अतिक्रमणामुळे या पुरातन भूमीच्या काही भागाचे निमज्जन (Submergence) झाले. त्यानंतर या भागात सागरतळ हळूहळू उंचावत जाऊन मेघालय पठाराची निर्मिती झाली. इथल्या नद्यांच्या प्रवाहमार्गात अनेक धबधबे निर्माण झालेले आहेत. तसेच नद्यांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. या पठारी भागावरच गारो, खासी व जैंतिया या टेकड्या पसरल्या आहेत. खासी टेकडीत असलेले चेरापुंजी पठार हे भारतातील संरचनात्मक मंचाचे (Structural terrace) एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण असून येथील चेरापुंजी व मॉसिनराम या ठिकाणी जगातील सर्वाधिक पर्जन्याची नोंद झाली आहे. या विशिष्ट प्राकृतिक रचनेमुळे मेघालयाची पर्वतीय भूमी सतत मेघाच्छादित राहते.  

पूर्वेकडील पटकाई, नागा, मिजो आणि मणिपूरच्या इतर टेकड्या मिळून ईशान्य भारताचा ९४,८०० चौ.किमी प्रदेश व्यापतात. या भागातील लोकसंख्या चार दशलक्ष इतकी आहे. पूर्वांचल पर्वत श्रेणीतील सर्व टेकड्यांत वालुकाश्म (Sandstone) खडक आढळतो. डफला, अबोर, मिश्मी, पटकई बूम, नागा, मणिपूर, गारो, खासी, जयंतिया व मिजो या सर्व टेकड्या पूर्वांचलाचाच भाग असल्याचे मानले जाते.

डफला टेकड्या (३,७३३ मी.) तेजपूर व उत्तर लखीमपूरच्या उत्तरेला असून त्यांच्या पश्चिमेला सेप्पा  टेकड्या (७२३ मी.) आणि पूर्वेला अबोर टेकड्या (३,७७८ मी.) आहेत. अबोर टेकड्या अरुणाचल प्रदेशात असून त्यांच्या सीमेवर मिश्मी (३,३२६ मी.) आणि मिरी टेकड्या आहेत. ब्रह्मपुत्रेची उपनदी  दिबांग याच भागातून वाहते. हिमालयाच्या दक्षिणेला असलेल्या मिश्मी टेकड्यांची पूर्व आणि उत्तर सीमा चीनच्या सीमेला लागून आहे. पटकई बूम टेकड्या (१,९०८ मी.) म्यानमारच्या सीमेलगत असून हिमालयाच्या निर्मितीवेळीच मध्यजीव महाकल्पात भूपृष्ठाच्या प्रक्षोभक हालचालींमुळे त्यांचीही निर्मिती झाली. हिमालयाप्रमाणेच या टेकड्यातही उंच उभे कडे, खोल घळया आणि उंच शिखरे पाहायला मिळतात.  

नागा  टेकड्यासुद्धा (२,३६६ मी.) म्यानमारच्या सीमेला लागून असून त्यांचा विस्तार नागालँड राज्यातही आहे. मणिपूर राज्यात मणिपूर टेकड्या (१,४२९ मी.) असून त्यांच्या पश्चिमेला आसाम दक्षिणेला मिझोराम, पूर्वेला म्यानमार आणि उत्तरेला नागालँड असे प्रदेश आहेत. मिजो टेकड्या (१,००२ मी.) आग्नेय मिझोराममध्ये असून त्यांना ‘लुशायी टेकड्या’ असेही म्हटले जाते. म्यानमारमधील ‘आराकान योमा’ पर्वताच्या उत्तर भागाशी त्या संबंधित आहेत. लुशाई टेकड्यांच्या दक्षिणेला असलेल्या सैहा प्रांताच्या पश्चिमेला बेइनो किंवा कोलोडाईन नदीपात्रात किल्याच्या बुरुजासारख्या दिसणाऱ्या खडकांच्या नैसर्गिक रचना तयार झाल्या आहेत. ८ ते १० मीटर उंचीच्या या  रचना नदीच्या दोन्ही तीरावर दिसतात. बोइनो कॅसल या नावाने त्या प्रसिद्ध आहेत. 

त्रिपुरा टेकड्या त्रिपुरा राज्यात असून या टेकड्या उत्तर दक्षिण दिशेत एकमेकाला समांतर जाणाऱ्या पर्वत श्रेण्या आहेत. दक्षिणेकडे त्यांची उंची कमी होत जाते आणि अखेरीस त्या गंगा ब्रह्मपुत्रेच्या सपाट त्रिभुज प्रदेशाजवळ मैदानी भागात साब्रूमपाशी (२३ मी.) पाशी जाऊन संपतात. 

मेघालय राज्यातील गारो टेकड्या (१,०८० मी.) या जगातील सर्वाधिक आर्द्र प्रदेशांपैकी एक आहेत. ‘नोक्रेक’ (१४१६ मी.) हे या टेकड्यांतले सर्वाधिक उंच शिखर आहे. याच राज्यातील खासी टेकड्यांना (१,६७३ मी.) त्यांचे ‘खासी’ हे नाव तिथे वास्तव्य करून राहणाऱ्या जमातींच्या नावावरून पडले आहे. या टेकड्यांतील ‘मौसिनराम’ (१,४२८ मी.) हे जगातले सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे आणि शिलॉँग जवळचे ‘लूम शिलॉँग’ हे सर्वात उंच शिखर (१,९१७ मी.) आहे. भारतात आढळणाऱ्या  चुनखडकातील गुहा प्रामुख्याने खासी भागातच आहेत. भल्या मोठ्या वृक्षांची दुय्यम मुळे (Secondary roots) इथे नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याकडे सरळ वाढत गेल्यामुळे त्यांचे नदीमार्गाच्याही थोडे वर नैसर्गिक पूल तयार झाले आहेत! यांना झाडांच्या मुळांचे पूल (Root Bridge) असे म्हटले जाते. ‘खासी’ टेकड्यांच्या पूर्वेला ‘जयंतिया’ (१,३४३ मी.) या टेकड्या आहेत. 

मेघालयातील गारो, खासी आणि जैंतिया येथील टेकड्यांमध्ये चुनखडकातील अनेक गुहा (Limestone caves) आढळून येतात. सगळ्यात जास्त लांबीच्या म्हणून त्यातल्या काही जगप्रसिद्ध आहेत. या गुहा चुनखडकात असल्यामुळे चुन्याच्या खाणींसाठी उत्खनन करणाऱ्यांकडून आज त्यांना खूप मोठा धोका निर्माण झाला आहे.

 

संबंधित बातम्या