किनाबालू पर्वत

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 17 जानेवारी 2022

भूरत्ना वसुंधरा

काही वर्षांपूर्वी मलेशियातील कोटा किनाबालू इथे भूरूपशास्त्रातील (Geomorphology) परिषदेला जाण्याचा योग आला होता. त्यावेळी पूर्वीच्या बोर्निओमध्ये आणि आत्ता मलेशियात समाविष्ट असलेला ‘किनाबालू’ पर्वत जवळून पाहण्याची संधी मिळाली. हा पर्वत कोटा किनाबालू या बोर्निओ बेटाच्या उत्तर भागातील मलेशियाच्या साबाह राज्याच्या राजधानीपासून शंभर किमी अंतरावर आहे. 

किनाबालू हा बोर्निओ आणि मलेशियातील सर्वात उंच पर्वत असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची ४०९५ मी. आहे. पृथ्वीवरील ‘बेट’ (Island) या भूरूपावर असलेल्या उंच पर्वतांपैकी न्यू गिनी बेटावरील ४,८८४ मी. उंच ‘पुनकॅक जया’ आणि हवाई बेटावरील ४,२०७ मी उंच ‘मोना कि’ या शिखरांनंतरचे हे तिसरे पर्वत शिखर आहे. त्याला ‘ह्यू लो’ या याच पर्वतावर १८५१मध्ये सर्वप्रथम आरोहण करणाऱ्या ब्रिटिश पर्वतारोहीच्या नावावरून ‘लो’ शिखर असेही म्हटले जाते.   

किनाबालू पर्वताला वर्ष २०००पासून जागतिक वारसास्थानाचा दर्जा मिळाला असून १९६४ पासून  किनाबालू नॅशनल पार्क म्हणून हा प्रदेश संरक्षित आहे. ७५४ चौ.किमी क्षेत्र असलेल्या या राष्ट्रीय उद्यानात किनाबालू पर्वत आणि आजूबाजूचा विस्तृत प्रदेश समाविष्ट आहे. स्थानिक भाषेत या पर्वताला ‘गुनुंग किनाबालू’ किंवा ‘नुलू निबालू’ म्हटले जाते. सुरुवातीच्या काळात या शिखराला ‘सेंट पीटर्स माऊंट’ असेही म्हटले जात असे.

आम्ही या पर्वतावर गेलो तेव्हा वाटेत तिथल्या अनेक लोकांशी बोलणे झाले. स्थानिकांना या पर्वताविषयी असलेले प्रेम व आदर त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. या पर्वतावर पाच ते सहा हजार प्रकारच्या वनस्पती, ३२६ प्रकारचे पक्षी आणि १००पेक्षा जास्त प्रजातींचे सस्तन प्राणी वास्तव्य करून राहिले आहेत. हिमालय, ऑस्ट्रेलिया, इंडोमलाया येथील वनस्पतींचे सर्व प्रकार किनाबालू पर्वत ज्या क्रोकर पर्वतरांगेत आहे त्यात आढळतात, अशी माहिती आम्हाला तिथल्या माहिती केंद्रातून आधीच मिळाली होती. त्यामुळे या पर्वतावर जाताना एक वेगळेच ‘पर्वत भूरूप’ बघायला मिळेल याची खात्री होती.

या पर्वतावर छोट्या वस्त्या आणि आजूबाजूचा निसर्ग अजूनही शाबूत आहे. मात्र सध्याच्या हवामान बदलाचा परिणाम आता इथेही जाणवू लागल्याचे स्थानिकांच्या बोलण्यातून जाणवत होते.  

किनाबालू हा एक विस्तृत गिरीपिंड (Massif) आहे. त्याच्या मध्यवर्ती भागात, स्तरीत खडकांत घुसून थंड झालेल्या ग्रॅनाईटपासून (Intrusive Granite) २५ लाख ते ६.६ कोटी वर्षांपूर्वी तयार झालेला हा पर्वत आहे. इथली थंड होण्याची क्रिया केवळ एक कोटी वर्षांपूर्वीची असल्यामुळे या पर्वताला  भूशास्त्रीय परिभाषेत ज्वालामुखीय नसलेला (Non Volcanic) अतिशय तरुण पर्वत असे म्हटले जाते. आजूबाजूचा किनाबालू गिरीपिंड आजही दरवर्षी पाच मिमी वेगाने उत्थापित (Uplift) होत आहे, असेही निरीक्षण आहे. किनाबालू पर्वताच्या भोवती जे काळ्या रंगाच्या ग्रॅनाईटचे तीव्र उताराचे हजारो फूट उंचीचे उभे आणि भयावह कडे (Cliffs) दिसून येतात, ते याचीच साक्ष देतात. 

प्लाईस्टोसीन या भूशास्त्रीय काळात एक लाख वर्षांपूर्वी किनाबालू पर्वतावर बर्फाचे जाड आवरण होते आणि त्यात तयार झालेल्या अनेक हिमनद्या याच्या तीव्र उतारावरून खाली वाहत होत्या. या हिमनद्यांनी या पर्वताची त्यानंतर खूप झीज केली आणि त्यामुळेच याच्या उत्तरेकडील उतारावर १,८०० मी. खोल ‘लो’ घळई निर्माण झाली. हिमनद्यांनी केलेल्या झीजेची सर्व वैशिष्ट्ये आजही या पर्वतात जागोजागी दिसून येतात. डिसेंबर आणि जानेवारीत पर्वताच्या माथ्यावर थोडेफार हिमकण आणि दहिवर (Frost) दिसते. ते पाहून अनेकवेळा हिमवृष्टी झाल्याचा भास होतो. वर्षातील अनेक दिवस  किनाबालू पर्वत शिखरावर ढगांचे आवरण असते. उष्णकटिबंधीय प्रदेशात हे स्थान असल्यामुळे (६.१ अंश उत्तर/११६.५ अंश पूर्व) इथले हवामान आयनिक पर्जन्य वन (Tropical Rain Forest) प्रकारचे आहे. नेहमी उच्च तापमान व भरपूर पाऊस आणि त्यामुळे पर्वत उतारावर आणि आजूबाजूला दाट जंगल हे इथल्या हवामानाचे वैशिष्ट्य आहे. या पर्वताच्या आजूबाजूचा मोठा प्रदेश इथे ५ जून २०१५ रोजी झालेल्या भूकंपामुळे आणि त्यानंतरच्या भूस्खलनाने बाधित झाला होता.  

भूकंपाच्या आधी सहा दिवस या पर्वतावर कॅनडा, जर्मनी, नेदरलँड्स इथून आलेल्या काही पर्यटकांनी तिथे केलेल्या ‘गैरर्वतनामुळे’ पर्वत आत्मा क्रोधीत झाला आणि भूकंप झाला असे स्थानिकांना वाटते.

या पर्वतावर जाण्यासाठी १,८६६ मी. उंचीवरील ‘तिंपोहोन’ किंवा ‘टेनोमपोक (टेंपक)’ प्रवेशद्वारापासून किंवा १,९१७ मी. उंचीवरील ‘मेसीलाऊ नेचर रिसॉर्ट’पासून, असे दोन मार्ग होते. मात्र यातील दुसरा मार्ग भूकंपानंतर बंद झाला आहे. हा पर्वत काझीदान या मूळ निवासी लोकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्यासाठी या पर्वताचे नाव ‘अकिनाबालू’ असे आहे. मूळ निवासींच्या बोलण्यातून याचा अर्थ ‘मृतांचे पूज्य किंवा वंदनीय स्थान’ असा असल्याचे कळले. 

पर्वतावर जाताना सुरुवातीलाच ‘पोरींग’ नावाचा एक उष्ण पाण्याचा झरा दिसतो. त्यातील ६० अंश से. तापमानाचे पाणी अंघोळीसाठी एका कुंडात साठवले जाते. या झऱ्याच्या जवळच आणखी दोन असेच झरे आहेत. त्यातील एक ‘पोरींग’च्या पश्चिमेला, तर दुसरा दक्षिणेकडे असलेल्या ‘मामुट’ नावाच्या नदी किनारी आहे. या झऱ्यांच्या उष्ण पाण्याचे स्रोत याच प्रदेशातील गाळाचे खडक, भरड गाळ आणि ग्रॅनाईट खडकांत आहेत.

उष्ण पाण्याच्या झऱ्याच्या थोडे पुढे गेल्यावर १२० मीटर उंचीचा ‘लांगनन’ आणि कमी उंचीचा ‘किंपुंगीट’ असे धबधबे आढळतात. याच मार्गावर दोन प्रचंड मोठ्या शिळांतील मोकळ्या फटीत एक गुहा निर्माण झाली आहे. तिला ‘बॅट केव्ह’ म्हटले जाते. इथल्या घनदाट वर्षावनातून पर्वत शिखराकडे जाताना पाण्याचे अनेक खळाळ (Torrent) आपली वाट दुर्गम करीत असतात. अनेक ठिकाणी वाट बुळबुळीत असते. धुके आणि पाऊस असेल तर दृश्यमानताही (Visibility) खूपच कमी असते. ट्रेकर्ससाठी किनाबालू पर्वत शिखरावर जाणे ही एक मोठी पर्वणीच! ‘रनौ’ आणि ‘कोटा बालुड’ अशा दोन मार्गांनी ट्रेकिंग करता येते. या पर्वतावरील ट्रेकिंगसाठी कोणत्याही ट्रेकिंग अनुभवापेक्षा शारीरिक क्षमतेची खऱ्या अर्थाने गरज असते एवढे मात्र नक्की!

संबंधित बातम्या