महेंद्र पर्वत...

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 31 जानेवारी 2022


भूरत्ना वसुंधरा

भारताच्या पूर्व किनाऱ्याला समांतर असलेल्या तुटक पर्वत रांगेला महेंद्र पर्वत किंवा सामान्यपणे पूर्व घाट म्हटले जाते. हा पर्वत अनेक छोट्या मोठ्या डोंगररांगानी तयाक झाला असून पश्चिम घाट किंवा सह्याद्रीपेक्षा अनेक बाबतीत वेगळा आहे. त्याला दक्षिणेकडील राज्यांत तुरपू कनुमालू किंवा किझाक्कू थोडारची मलाईगल असेही म्हटले जाते. अनेक बाबतीत हा पर्वत आजही अनेकांना फारसा माहीत नाही.

एकूण १,५०० किमी लांबीची, सरासरी १७५० मीटर रुंदीची आणि सरासरी ६१० मीटर उंचीची महेंद्र पर्वतरांग उत्तर ओडिशातून सुरू होते आणि आंध्र प्रदेशातून तामिळनाडू राज्यापर्यंत जाते. तिचा काही भाग कर्नाटकातूनही जातो. गोदावरी, महानदी, कृष्णा आणि कावेरी या मोठ्या नद्या ही रांग ओलांडून पूर्व किनाऱ्याकडे जातात. पश्‍चिमेला, महेंद्र पर्वत आणि पश्चिम घाट यांच्या मधे दख्खनचे पठार, तर पूर्वेकडील बंगालच्या उपसागराच्या बाजूला कोरोमंडलची किनारपट्टी आहे. या डोंगररांगेने व्यापलेले एकूण क्षेत्रफळ ७५ हजार चौ.किमी. आहे. आंध्र प्रदेशातील जिंदगढा शिखर हे या पर्वतातील सर्वोच्च शिखर असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,६८४ मीटर आहे. 

महेंद्र पर्वताची पश्चिम घाटाशी नेहमीच तुलना केली जाते, कारण या दोन्ही पर्वतरांगांनी द्वीपकल्पिय (Peninsular) भारताच्या दोन किनारी प्रदेशांच्या सीमा निर्धारित केल्या आहेत. पश्चिम घाट किंवा सह्याद्रीएवढी महेंद्रगिरीची उंची नाही, मात्र त्यांच्यापेक्षा भूशास्त्रीय दृष्टीने तो खूपच जुना आहे. सह्याद्रीची उंची ९०० ते १६०० मीटर, तर पूर्व घाटाची ६०० ते ९०० मीटर आहे. सह्याद्री एक कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाला, असे म्हटले जाते. मात्र महेंद्रगिरी किंवा पूर्व घाटाची निर्मिती पृथ्वीवरील प्राचीन महाखंड (Supercontinent) रोडिनियाच्या जडणघडणीशी आणि गोंडवाना महाखंडाच्या निर्मितीशी आत्तापर्यंत जोडली गेली होती. एक अब्ज वर्षांपूर्वी रोडिनिया (Rodinia) नावाचे महाखंड  निर्माण झाले. ते ९० ते ७५ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर अस्तित्वात होते. भारतीय व स्विस भूशास्त्र संशोधकांनी २०१६मध्ये केलेल्या अलीकडच्या संशोधनानुसार ५० ते ६० कोटी वर्षांपूर्वी भारत व अंटार्क्टिकची धडक झाली आणि त्यातून भारताचा आत्ताचा पूर्व घाट तयार झाला असावा.  

पश्चिम घाट (Western Ghat) प्रदेशाला सर्वसामान्यपणे सह्याद्री म्हटले जाते. या पर्वतरांगेला ‘सह्याद्री’ या नावाने मुख्यतः महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यात ओळखले जाते. केरळमध्ये याला ‘सह्यन’ किंवा ‘साहीआन’ म्हणतात. पूर्व घाट म्हणजेच महेंद्रगिरी पर्वतालाही उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थानिक पातळीवर ‘सिरूमलाई’, ‘कारंथांमलै’, ‘कोल्लिमलाई’, ‘मलई महाडेश्वर’ अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. महेंद्रगिरी, नल्लमलाई, पालकोंडा, जावडी आणि सेर्वरायन या इथल्या महत्त्वाच्या टेकड्या आहेत. पूर्व घाटाच्या दक्षिणेकडच्या टोकाला दक्षिण तामिळनाडूतील सिरूमलाई आणि करांथमलाईसारख्या अनेक कमी उंचीच्या टेकड्या असलेल्या डोंगररांगा आहेत. उत्तर तामिळनाडूत कावेरी नदीच्या उत्तरेला कोल्लीमलाई, पचाईमलाई, कलरायन, चेत्तरी, पालमलाई आणि मेत्तूर टेकड्या आहेत. ही सर्व थंड हवेची आणि ओल्या वातावरणाची ठिकाणे कॉफीच्या बागांसाठी आणि पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. 

दक्षिण पूर्व घाट, बिलिगिरीरंगा आणि निलगिरी टेकड्या व दक्षिण पश्चिम घाट ही मार्गिका (Corridor) हा पश्चिम व पूर्व घाट जोडणारा आशियायी हत्तींसाठी प्रसिद्ध जोडमार्ग आहे. पर्वताच्या अतिदुर्गम भागात किलीयुर (येरकुड) आणि ओडिशातील बदिगुड्डा जवळील डुडुमासारखे सुंदर धबधबे व तामिळनाडूतील पुंगनूरसारखी सुंदर सरोवरे आहेत. 

तामिळनाडूतील जावडी टेकड्यांच्या दक्षिणेला ४० किमी अंतरावर कलवरायन टेकड्या आहेत. कलवरायन हे नाव तिथे राहणाऱ्या ‘कलवर’ लोकांवरून पडले आहे. पूर्वेला नैऋत्य मोसमी पाऊस याच टेकडीमुळे पडतो. ही टेकडी शेरवरायन टेकड्या म्हणून पुढे नैऋत्येकडे जाते.  

पूर्व घाटाच्या मधल्या भागात, पलार नदीच्या उत्तरेला एकमेकाला समांतर उत्तर दक्षिण दिशेत जाणाऱ्या दोन डोंगररांगा आहेत. यापैकी वेलीकोंडा ही रांग पूर्वेला आणि पालिकोंडा - लंकामल्ला - नल्लामलाई रांग पश्चिमेला थोड्या जास्त उंचीवर आहे. कृष्णा आणि पेंनार नद्यांच्या दरम्यान या दोन्ही डोंगर रांगा कोरोमंडल किनाऱ्याला ४३० किमी समांतर जातात. यांच्या उत्तरेला पालांडूचे खोरे असून दक्षिणेला त्या तिरुपती टेकड्यापर्यंत जातात. या टेकड्या भूशास्त्रीय दृष्ट्या खूप जुन्या असल्यामुळे त्यांची झीज व विदारण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यांची सरासरी उंची ५२० मीटर असून भैरनि कोंडा (१,१०० मी) आणि गुंडला ब्रह्मेश्वरा (१,०४८ मी) ही या टेकड्यात उंच शिखर आहेत.

विशाखापट्टणच्या उत्तरेला मधुरवाडा हा घुमटाकृती डोंगर भूप्रक्षोभक (Tectonic) हालचालींनी तयार झाला आहे. पूर्व घाटाच्या उत्तरेकडील भागात ९०० ते १२०० मीटर उंचीची मालिया डोंगररांग असून महेंद्रगिरी हे १,५०० मीटर उंच शिखर सर्वाधिक उंचीचे आहे.  अर्मा कोंडा (१६८० मी), गली कोंडा (१६४३ मी) आणि सिंक्रम गुट्टा (१६२० मी) ही उत्तरेकडील माडगुला कोंडा डोंगररांगेतील उंच शिखरे आहेत. ओडिशातील सिमिलीपाल गिरीपिंड (Massif) महेंद्र पर्वताचा ईशान्येकडील शेवटचा विस्तार मानण्यात येतो. महेंद्र पर्वतात, पूर्व किनाऱ्याच्या दिशेने वाहत जाणाऱ्या बाहुदा, ऋषिकुल्य, वामसधारा, नागवली,  चंपावती, वेगवती इत्यादी २१ नद्यांचे उगम आहेत. 

पूर्व घाट ही जैव व भूविविधतेने संपन्न आणि समृद्ध अशी पर्वत शृंखला आहे. पूर्व घाट अनेक पर्यावरणीय प्रदेशांसाठीही प्रसिद्ध आहे. असंख्य प्राणी आणि वनस्पतींनी हा प्रदेश संपन्न  आहे. अनेक वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, पक्षी अभयारण्ये अशी संरक्षित ठिकाणे आणि असंख्य धबधबे, खोल घळया आणि रुंद नदीपात्रे हे महेंद्र पर्वताचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. 

सावरा,जाटपू, कोंडा डोरा, गडबा, खोंड, मान्ने डोरा आणि मुखा डोरा यासारख्या अनेक आदिवासी जमाती वर्षानुवर्षे या पर्वतात वास्तव्य करून आहेत. जंगले आणि शिकार यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या या जमाती त्यांचा सांस्कृतिक वारसा आणि चालिरीती जपण्यासाठी किती आग्रही असतात ते आम्ही ओडिशातील पूर्व घाटात अभ्यास करीत असताना जवळून अनुभवले. त्यांना घाटातील औषधी वनस्पतींचे किती नेमके ज्ञान आहे त्याचीही कल्पना येऊ शकली. अनेक दृष्टींनी महेंद्र पर्वत ही एक विलक्षण  सुंदर अशी भूसंपदा आहे!

संबंधित बातम्या