अन्नामलाई आणि अगस्तीमलाई...

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

भूरत्ना वसुंधरा

अन्नामलाई आणि अगस्तीमलाई गिरिसमूह हे दोन्ही स्वतंत्र गिरिसमूह! हा सर्व सह्याद्रीचा भाग असूनही सह्याद्रीपेक्षा अनेक बाबतीत वेगळा आहे. नुसता निसर्ग आणि झाडे-झुडुपे नाही, तर या दोन पर्वतरांगांतील वस्त्या, तिथली माणसे आणि त्यांचे स्वभावसुद्धा खूप वेगळे आहेत.

सह्याद्रीच्या दक्षिणेकडे असलेल्या अन्नामलाई आणि अगस्तीमलाई पर्वतरांगांतून फिरताना आपण एका वेगळ्याच जगात असल्याचा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे. हा सह्याद्रीचा भाग असूनही सह्याद्रीपेक्षा अनेक बाबतीत वेगळा आहे, हे ज्यांनी सह्याद्री पाहिला आणि अनुभवला आहे त्यांना लगेचच जाणवते. नुसता निसर्ग आणि झाडे-झुडुपे नाही, तर या दोन पर्वतरांगांतील वस्त्या, तिथली माणसे आणि त्यांचे स्वभावसुद्धा खूप वेगळे असल्याचा अनुभव मी माझ्या विद्यार्थ्यांबरोबर इथे अभ्यास करीत असताना घेतला आहे. हा फरक निश्चितपणे इथल्या दुर्गम आणि माणसांच्या कोलाहलापासून दूर असलेल्या सर्वथैव शांत आणि आनंददायी परिसरामुळेच आहे, हे नक्कीच. 

हे दोन्ही पर्वत स्वतंत्र गिरिसमूह आहेत. यापैकी अन्नामलाई या विस्ताराने मोठ्या असलेल्या  गिरिसमूहाला ‘एलिफंट माउंटन’ असेही म्हटले जाते. त्याचा विस्तार पश्चिम तमिळनाडूतील कोईम्बतूर आणि तिरुपूर जिल्हा, मध्य केरळ मधील पलक्कड, थ्रीसूर, एर्नाकुलम आणि इडुक्की जिल्हे या भागात आहे. अनामुडी हे २,६९५ मीटर उंच शिखर या पर्वतरांगेच्या दक्षिण टोकाला आहे आणि ते दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे. उत्तरेकडील निलगिरी पर्वतापासून निलगिरीच्या दक्षिणेकडे असलेली पलक्कड गॅप  अन्नामलाई पर्वताला मुख्य सह्याद्रीपासून वेगळा करते. समुद्रसपाटीपासून १४० मीटर उंचीवरची ही गॅप २४ ते ३० किमी रुंद आहे.

अन्नामलाई पर्वतरांग हा सह्याद्रीचा उपसमूह (Subcluster) आहे. युनेस्कोने सह्याद्रीबरोबरच त्यालाही ‘जागतिक वारसा स्थळा’चा दर्जा दिला आहे. अन्नामलाईच्या नैऋत्येला केरळ राज्य व अग्नेयेला कार्डममच्या टेकड्या आहेत. पश्चिमेला बांबूंनी संपन्न असे पुयंकुट्टी खोरे आणि पूर्वेला पळणी टेकड्या आहेत. या पर्वतात मुख्यतः नीस हा ग्रॅनाईट खडकाच्या रूपांतरणाने तयार झालेला खडक दिसतो. विभंग - खंड हालचालींनी (Fault Block Movements) हा पर्वत तयार झालेला आहे. त्यात एकेक हजार मीटर उंचीच्या पायऱ्या किंवा वेदिका (Terraces) दिसून येतात.

संपूर्ण पर्वत कॉफी आणि चहाच्या मळ्यांनी भरून गेलेले दिसतात. हे मळे डोंगर उताराच्या खालच्या भागात, तर वरच्या भागात सागवानाची लागवड असते. या पर्वतावर बारा प्रकारची वने आढळतात. दोन हजार ते पाच हजार मिमी इतका भरपूर पाऊस इथे दरवर्षी पडतो. त्यामुळे वन्यप्राणी आणि वनस्पती यांनी हा पर्वत अगदी संपन्न आहे. अलीकडेच बेडकांची एक नवीन प्रजाती अन्नामलाईच्या डोंगररांगांत सापडली आहे.

या पर्वतात दिसणारे विविध प्रकारचे पक्षी पाहणे ही तर एक आनंद पर्वणीच असते. केवळ पक्षी निरीक्षणासाठी आमचा ‘मेघमलाई’ या पेरियार जवळच्या भागातला मुक्काम दोन दिवसांनी वाढला होता  आणि त्याची भरपाई करता न आल्यामुळे याच पर्वतातले इतर मुक्काम कमी करावे लागल्याचे दुःख आजही आमच्या मनात आहेच! 

अन्नामलाई व्याघ्र प्रकल्प हत्तींसाठीही जगप्रसिद्ध आहे. याचबरोबर या पर्वतात असलेल्या ‘कनो’सारख्या आदिवासी वस्त्याही इतर पर्वतातील वस्त्यांपेक्षा अनेक बाबतीत आगळ्या वेगळ्या आहेत. या आदिवासी वस्त्यांमध्ये आणि निलगिरी पर्वतातील ‘तोडा’ वस्त्यांमध्ये फिरून त्यांची माहिती घेताना त्यांच्या चालीरीतींमधले फरकही आम्हाला प्रकर्षाने जाणवले.  चालककुडीपुझा, अलियार, आपम्बर, चिन्नार, कादंबरी, निरार, पम्बर आणि इडमलायर अशा अनेक नद्या या पर्वतात उगम पावतात. त्यातील बऱ्याच नद्या केरळमधील एर्नाकुलम आणि इडुक्कीच्या  उष्णकटिबंधीय पर्वतातील खुरट्या जंगलांच्या प्रदेशात (Sholas) उगम पावतात आणि पश्चिमेकडे अरबी समुद्राच्या दिशेने वाहत जातात. अमरावती आणि पाम्बर नद्या मात्र पूर्वेकडे वाहतात. हे सर्व प्रदेश पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील मानले जातात. इडुकी, मुन्नारसारख्या दुर्गम भागातील मुक्त भ्रमणासाठी (Trekking) हा पर्वत अतिशय आवडता आणि आदर्श समजला जातो.  

अन्नामलाईच्याही दक्षिणेला, भारताच्या अगदी दक्षिण टोकाला असलेल्या टेकड्यांना अशांबू किंवा अगस्त्य मलाई असे म्हटले जाते. अतीव सुंदर निसर्गसौंदर्याने नटलेल्या अशा या टेकड्या आहेत. यांना पोट्टीगाइ टेकड्या असेही म्हटले जाते. पश्चिम घाटाचाच भाग असलेल्या ह्या टेकड्या उत्तरेकडील अन्नामलाई पर्वताच्या दक्षिणेला आहेत. त्यांच्या मधल्या प्रदेशाला शेनकोट्टा (सेनगुट्टी) गॅप म्हटले जाते. ही गॅप किंवा मोकळी अरुंद जागा केवळ आठ किमी रुंद असून पश्चिम पूर्व दिशेत साधारणपणे ४५ किमी लांब आहे. याच गॅपमधून अचनकेमिल नदी व तिला समांतर कोन्नी-अचनकेमिल रस्ता जातो.

अगस्त्य टेकड्यांचा हा प्रदेश सगळ्या पश्चिम घाटातील सर्वाधिक संपन्न आणि समृद्ध जैवविविधता प्रदेश आहे. या पर्वतातील पांडीपाथू, कोड्यार आणि महेंद्रगिरीच्या डोंगरात फिरताना याचा अनुभव  आम्ही घेतला आहे.

अगस्तीमलाई म्हणजेच पोट्टीगायी हे १,८६६ मीटर उंचीवरचे ठिकाण अशांबू पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. सेनोझोईक (Cenozoic) या ८ ते १० कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडातील खडकांनी व  प्रस्तरभंग प्रक्रियेतून (Faulting) या टेकड्या तयार झाल्या आहेत. पश्चिम किनाऱ्यावरील तिरुअनंतपुरम किंवा पूर्वेकडील तिरुनेलवेल्लीकडून पाहिले, तर अनेक उंच सखल टेकड्यांच्या पसाऱ्यात एखाद्या शंकू टेकडीसारखा तीव्र उताराचा हा उंच अगस्ती पर्वत आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशावर नजर ठेवून असलेला रखवालदार असावा असा दिसतो!

खरे म्हणजे १,४०० किमी लांबीच्या सह्याद्रीतील अगस्तीमलाई हे कमी उंचीचे शिखर आहे. निलगिरी पर्वतातील दोडाबेट्टा (२,६२३ मी), कर्नाटकातील मूललायनागिरी (१,९१८ मी) आणि अन्नामलाईतील अनामुडी (२,६९४ मी) ही सर्व ठिकाणे अगस्तीमलाईपेक्षा खूप उंच आहेत. असे असले तरी या पर्वताची तिबेटमधील कैलास पर्वतासारखी दिसणारी पार्श्वरेखा त्याच्याबद्दलच्या आकर्षणाचे वलय अनेक पटींनी वाढवते. पर्वत माथ्यावर जिथे चार हजार मिमीपेक्षाही जास्त पाऊस पडतो, तिथे आयनिक (Tropical) सदाहरित जंगले आहेत आणि त्यातील वृक्षांतही खूप वैविध्य आहे. सह्याद्रीत सापडणाऱ्या १,५०० प्रदेशनिष्ठ (Endemic) वनस्पती इथे सापडतात. अन्नामलाईप्रमाणेच हा गिरिसमूहसुद्धा विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती यांनी समृद्ध आहे. कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प आणि वाघांचे अतिदक्षिणेकडील वसतिस्थान (Habitat) म्हणूनही या पर्वताला महत्त्व आहेच. तांबरपर्णी नदीचा उगम अगस्तीमलाईच्या जंगलात होतो. 

आज प्राण्यांची मोठ्या संख्येने होणारी शिकार ही या डोंगराळ प्रदेशाची वाढती समस्या ठरते आहे. याचबरोबर पर्यटन ठिकाणी बांधकामांची वाढती संख्या, त्यासाठी डोंगर उतारांचा वापर, शोला जंगलांची तोड अशा गोष्टींमुळे अन्नामलाईप्रमाणेच हाही पर्वत त्याची वेगळी ओळख गमावून बसतो आहे. 

या पर्वतात असंख्य वनौषधी वनस्पती सापडतात. म्हणूनच वनौषधी उपायासंबंधी (Herbal remedies) लोकांना भरपूर ज्ञान देणाऱ्या अगस्ती ऋषींच्या नावाने हा पर्वत ओळखला जातो. स्थानिकांच्या अत्यंत आस्थेची, श्रद्धेची आणि जिव्हाळ्याची अशी ही विलक्षण पर्वतरांग आपल्याला  काही ठरावीक पर्यटन स्थळांव्यतिरिक्त अजूनही फारशी परिचित नाही हेही तितकेच खरे आहे.

संबंधित बातम्या