आगळा वेगळा ‘भूतान हिमालय’

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

भूरत्ना वसुंधरा

पश्चिम पूर्व दिशेत २,५०० किमी अंतरात पसरलेल्या हिमालयाच्या पूर्व भागातला उंचच उंच पर्वत शिखरांनी आणि खोल दऱ्यांनी तयार झालेला भूतान हा हिमालयाचाच भाग असला, तरी पंजाब हिमालय, काश्मीर हिमालय, नेपाळ आणि आसाम हिमालय यापेक्षा नक्कीच वेगळा आहे हे या प्रदेशात फिरताना प्रकर्षाने जाणवले. 

हिमालयाच्या वेगवेगळ्या भागात माझे अनेक वेळा जाणे झाले होते आणि भूतान देश जिथे आहे तिथला हिमालय अभ्यासण्याची मनात खूप इच्छा होती. हिमालयाच्या या भागात पक्षी निरीक्षणासाठी अनेकजण जात असल्याची मला माहिती होती, पण मला भूशास्त्रीय दृष्टीने तो अभ्यासायचा होता. मी तिथे गेलो तेव्हा कळले, की आमचे भूतानमधील मार्गदर्शक ताशी नामगे यांना पक्षी निरीक्षणाचा चांगला अनुभव आहे. पण मी भूतानमधल्या डोंगरदऱ्या, खडक याबद्दल आणि ही भूरूपे किती जुनी आहेत हे सांगत होतो, तेही ते आवडीने समजून घेत होते.

‘‘माझ्या मार्गदर्शक म्हणून होणाऱ्या पुढच्या सगळ्या ट्रिप्समध्ये मी याही गोष्टी सगळ्या पर्यटकांना सांगणार आहे आणि त्यांना हिमालय निर्मितीच्या काळात घेऊन जाणार आहे,’’ असे त्यांनी सफाईदार इंग्लिशमध्ये व मोडक्या तोडक्या हिंदीत मला सांगितले, तेव्हा माझाही उत्साह एकदम द्विगुणित झाला होता. पश्चिम पूर्व दिशेत २५०० किमी अंतरात पसरलेल्या हिमालयाच्या पूर्व भागातला उंचच उंच पर्वत शिखरांनी आणि खोल दऱ्यांनी तयार झालेला भूतान हा हिमालयाचाच भाग असला, तरी पंजाब हिमालय, काश्मीर हिमालय, नेपाळ आणि आसाम हिमालय यापेक्षा नक्कीच वेगळा आहे हे या प्रदेशात फिरताना प्रकर्षाने जाणवले. 

स्थानिक डेन्झोन्गपा भाषेत या देशाला ‘ड्रक युल’ (Druk Yul) म्हणजे ‘ड्रॅगनचे साम्राज्य’ असे म्हटले जाते. भूतानने पहिल्यापासूनच आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी भारत वगळता इतर देशांशी फारसे संबंध ठेवले नव्हते. सर्व बाजूंनी जमिनीने वेढला गेला असल्यामुळेही त्याचा इतरांशी फारसा संबंध येणे भौगोलिक दृष्ट्याही कठीण होतेच. 

सन १९७४नंतर भूतान सरकारने पर्यटकांना देशात प्रवेश देणे सुरू केले. पर्यटनामुळे होऊ शकणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेऊन त्यांनी मर्यादित प्रमाणावर पर्यटकांना देशात येऊ देण्याचे धोरण ठेवले, त्यामुळेच आज इथला हिमालय अबाधित राहू शकला आहे. हिमालयाचाच भाग असल्यामुळे हिमालयाप्रमाणेच भूतानचा सगळा भूप्रदेश भारतीय आणि युरेशियन भूतबकांच्या पाच ते चार कोटी वर्षांपूर्वी (Tectonic Plates) झालेल्या टकरीनंतर आणि त्यानंतर दोन कोटी वर्षांपूर्वी झालेल्या उत्थापनातून (Uplift) तयार झालेला आहे. पृथ्वीवर १५ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या टिथिस समुद्रातील गाळ संचयनाचे उत्थापन व वलीकरण या प्रमुख भूशास्त्रीय घटना त्यासाठी कारणीभूत होत्या. आम्ही या भागात फिरत होतो तेव्हा आपण दोन कोटी वर्षे जुन्या टिथिस समुद्रातील गाळ पाहत आहोत ही जाणीव खूपच रोमांचकारी होती. ताशी नामगे आणि आमचे वाहनचालक केल्डन दोघेही या माहितीमुळे खूप प्रभावित झाले होते. असे काही वेगळे असू शकेल असे त्यांना वाटणारी अनेक ठिकाणे त्यांनीही नंतर आम्हाला दाखवली. त्यामुळेच आम्ही चेलेलाजवळ एका ठिकाणी टिथिस समुद्राच्या गाळात अडकलेले जीवावशेष पाहू शकलो.

भूतानच्या पश्चिम भागात सागरी अवसाद, समुद्र तळावरील बेसॉल्ट आणि त्यांची विविध रूपांतरित रूपेही पाहायला मिळतात. हे सगळे अवसाद (Sediments) व खडक, टिथिस या चिंचोळ्या समुद्राच्या तळावरचे आहेत. या सर्व गोष्टींमुळे भूतानच्या रौद्र सौंदर्यात विलक्षण भर पडली आहे. इथल्या नद्यांची पात्रे त्यांच्या उगमापासून थोड्या अंतरावर थोडी रुंद होताना दिसतात. भूस्खलन, कोसळणाऱ्या दरडी, घसरणारी माती यामुळे त्यात भरपूर गाळ साठतो. 

पश्चिम भूतानमधल्या पारो, थिम्पू, पुनाखा या भागातील पर्वत शिखरांवर हिमनद्या दिसत नाहीत, मात्र डोंगर माथ्यावर अनेक ठिकाणी हिमोढ (Moraine) गाळ दिसून येतो. पारो आणि थिम्पू प्रांतांच्या उत्तर सीमेवर मोठमोठी हिमाच्छादित शिखरे दिसतात. पारो विमानतळावरून हवा  स्वच्छ असली तर जुमोल्हारी हे ७,३१४ मीटर उंचीचे हिमाच्छादित शिखर सहज दिसू शकते. पारो, थिम्पू आणि पुनाखा हा प्रांत भूतानचे सांस्कृतिक केंद्र म्हणता येईल. याच भागात बरीचशी बौद्ध मंदिरे व अतिशय आकर्षक अशा गढ्या (Fortresses) आहेत. भूतानच्या सगळ्याच प्रदेशात उत्तर दक्षिण दिशेत वाहणाऱ्या नद्यांच्या खोल दऱ्या, त्यांची अरुंद पात्रे आणि पूर्व पश्चिम दिशेत पसरलेल्या अनेक छोट्या मोठ्या डोंगररांगांच्या आश्रयाने विलक्षण सुंदर अशा लहान लहान वस्त्या पसरलेल्या दिसतात. या वस्त्या, जागोजागी दिसणारी बौद्ध मंदिरे, किल्ले, गढ्या आणि भाताची लहान लहान खाचरे यांनी इथल्या डोंगराळ परिसराला सौंदर्याचे देवदुर्लभ असे वेगळेच परिमाण बहाल केले आहे. नद्या, डोंगर उतार, पुंजक्या पुंजक्यात पसरलेली घरे आणि सगळीकडची अतीव स्वच्छता हे तर भूतानचे प्रमुख लक्षण. इथल्या नद्यांचे पाणी इतके स्वच्छ, की खोल नदीचा तळही सहज दिसावा! कुठेही प्लास्टिकच्या पिशव्या, कागदांचे तुकडे किंवा इतर कसलाही कचरा नाही. प्रदूषण नाही. स्वच्छ, शुद्ध हवा आणि घनदाट झाडी, जंगले, यांनी ओतप्रोत भरून गेलेला इथला परिसर पाहून कुणाचेही मन आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल एवढी ताकद इथल्या निसर्गात नक्कीच आहे. जागतिक सर्वेक्षणात भूतान या देशाचा सौख्य निर्देशांक (Happiness Index) सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. 

समुद्र सपाटीपासून २,३२० मीटर उंचीवर असलेल्या थिम्पू या भूतानच्या राजधानीच्या ठिकाणाजवळ २,६६० मीटर उंचीच्या टेकडीवरचा ५७ मीटर उंचीचा बुद्धाचा पुतळा, चेरी मॉनेस्ट्री, थिम्पू - पुनाखा रस्त्यावरील ३,१४० मीटर उंचीवरचा डोच्छु ला पास, छिमी लाखांग डोंगरावरील फर्टिलिटी टेम्पल, थिम्पू - पारो रस्त्यावरील टामयोग इथल्या नदीवर असलेला सातव्या शतकातला प्राचीन लोखंडी पूल, पारोकडून ‘हा’ या नदी खोऱ्याकडे जाताना ३,९८८ मीटर उंचीवरचा चेलेला पास, त्याभोवतीची सूचीपर्णी पाईन व ऱ्होडोडेनड्रोनची दाट जंगले आणि अर्थातच भूतानमधील जगप्रसिद्ध ताकशांग या ३,१५० मीटर उंच पर्वतावरील ‘टायगर्स नेस्ट’ या आठव्या शतकाच्या मध्यात, गुरू पद्मसंभव या भारतीयाने बांधलेले पवित्र मंदिर ही सगळी ठिकाणे पाहिल्यावर भूतानमधल्या आगळ्या वेगळ्या हिमालयाची आणि तिथल्या रौद्र सौंदर्याची नेमकी कल्पना येते यात शंका नाही!

संबंधित बातम्या