दिमाखदार निलगिरी...

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 7 मार्च 2022

भूरत्ना वसुंधरा

निलगिरी हा दक्षिण भारतातील एक प्रमुख डोंगरसमूह. हा पर्वतप्रदेश तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या सीमा जिथे एकत्र आल्या आहेत, तिथे सुमारे २‚५९० चौ.किमी. क्षेत्रात पसरलेला आहे.  हा सगळाच प्रदेश डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे. सह्याद्रीत सर्वाधिक उंचीवर हा प्रदेश आहे. या पर्वतशृंखलेत २४ शिखरे अशी आहेत, जी दोन हजार मीटरपेक्षाही जास्त उंचीची आहेत. १११७पासून हा पर्वत ‘निलगिरी’ म्हणूनच ओळखला जातोय. 

काही वर्षांपूर्वी आम्ही निलगिरीतील उटी दोडाबेट्टा आणि सायलेंट व्हॅलीतील कुंती नदीपात्रात हिंडून तिथल्या संपन्न निसर्गाचा अगदी जवळून अभ्यास केला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी मात्र पुन्हा जेव्हा तिथे गेलो, तेव्हा या प्रदेशाचा सुरू असलेला ऱ्हास बघून आपण या समृद्ध पर्वतीय पर्यावरणाविषयी किती उदासीन होत चाललो आहोत, ते अगदी जवळून बघता आले.

इथल्या समृद्ध निसर्गाचे सौंदर्य द्विगुणित होते ते या पर्वतात राहणाऱ्या ‘कोटा’, ‘तोडा’ किंवा ‘टोडा’, ‘बडगा’, ‘कुरुंबास’ आणि ‘नायक’ या आदिवासी जमातींमुळे. त्यांच्या स्वतःच्या अशा विशिष्ट संस्कृती, भाषा आणि कौशल्ये या वैशिष्ट्यांमुळे त्यांनी निलगिरीच्या डोंगररांगांना वेगळेच सौंदर्य मिळवून दिले आहे.

टोडा ही निलगिरीतील एक मुख्य आदिवासी वांशिक (Ethenic) जमात. त्यांच्या वस्तीतही आम्ही दिवसभर थांबलो होतो. ही जमात दोन हजार वर्षांपूर्वीपासून या पर्वतावर वास्तव्य करून आहे. टोडा एक स्वतंत्र बोली बोलतात. त्यात कन्नड व तमीळ भाषांतील अनेक शब्द आहेत, त्यामुळे त्या भाषांशी तिचे जास्त साधर्म्य दिसते. 

‘मुंड’ नावाच्या छोट्या छोट्या वस्त्या करून ही जमात राहते. प्रत्येक वस्तीत ‘डोगल्स’ नावाची अर्ध वर्तुळाकृती आणि बसक्या सखल दाराची खिडक्या नसलेली दगडधोंड्यांची घरे असतात. आमच्याबरोबर असलेल्या एका तमिळ भाषिकामुळे तिथल्या लोकांशी आमचा खूप चांगला संवाद होऊ शकला. अशी घरे ते का बांधतात याचे त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्या निसर्गाविषयीच्या आस्थेबद्दल बरेच काही सांगून जाते. ‘हा डोंगराळ प्रदेश आहे म्हणूनच आम्ही आहोत. डोंगर ही आमची माता आहे. ह्या डोंगरातून त्याला त्रास न होता जेवढे मिळेल तेवढेच आम्ही घेतो. त्याला यातना होतील असे काही करण्याचा विचारही आमच्या मनाला शिवत नाही,’ आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांकडे आपुलकीने बघत एक तोडा सांगत होता.

निलगिरीतल्या सर्वच आदिवासी जमातींना इथल्या विविध वनस्पती आणि प्राण्यांबरोबरच नदी नाल्यांची व लहानमोठ्या टेकड्यांची जी नेमकी माहिती आहे, ती ऐकून तर थक्क व्हायला होते. आम्हाला त्यांनी जंगलातील काही गुहांत दगडांवर असलेली काही प्राण्यांची चित्रे दाखवली होती. मला अशा शैल चित्रांबद्दल (Rock art) फारसे काही माहीत नसल्यामुळे मी त्यांना काही सांगू शकलो नव्हतो.

जंगली म्हशींचे पालन करणे हाच त्यांचा अर्थार्जनाचा मुख्य व्यवसाय. आपल्यापेक्षा खूप वेगळ्या  जगात या जमातीचे लोक राहतात. मात्र त्यांच्या राहणीमानातही आता थोडे बदल होऊ लागले आहेत. त्यांची घरेही आता आधुनिक होऊ लागली आहेत. अलीकडे त्यांची लोकसंख्या हळूहळू घटतेही आहे. केंद्र सरकार ही जमात नष्ट होऊ नये, यासाठी प्रयत्नशील असून त्यांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये जतन करण्याचा प्रयत्न करीत आहे. 

भारतीय द्वीपकल्पात दख्खनच्या पठाराची निर्मिती होत असताना त्याच्या दक्षिण भागात भूकवचाच्या प्रक्षोभक (Tectonic) हालचाली सुरू होत्या. त्यांचा परिणाम होऊन अनेक भेगा पडून पठाराचे तुकडे झाले आणि काही ठिकाणी उभ्या दिशेत स्थानबदल व उत्थापन झाले. निलगिरी हा त्यातलाच एक तुकडा आहे. निलगिरीच्या त्रिकोणाकृती सीमावर्ती भागात आणि त्यावरील नद्यांच्या मार्गावर या प्रक्रियेचा मोठा परिणाम झाला. यातून निलगिरी पर्वताच्या मध्यवर्ती भागांत १,८०० मीटर उंच प्रदेश तसेच दोडाबेट्टा हा २,६३६ मीटर उंच प्रदेश निर्माण झाला. आज निलगिरी पर्वतप्रदेश म्हणजे केवळ जुन्या पठारांचा अवशिष्ट भाग म्हणून शिल्लक आहे.     

याच्या उत्तरेला सरासरी १‚००० ते १‚२१० मीटर उंचीचे म्हैसूरचे पठार आहे. आजूबाजूला अनेक शिखरे दिसून येतात. पर्वताच्या चारही बाजूचे डोंगरउतार कड्यासारखे तीव्र उतार आहेत. दक्षिणेला कोईमतूरचे ६१० मीटर उंचीचे पठार आहे. निलगिरीचे ‌कोईमतूरकडील (दक्षिण) उतारही तीव्र असून ते चहाच्या मळ्यांनी व्यापलेले आहेत.

निलगिरी पर्वताला पैकारा व मोयार या नद्यांच्या खोऱ्यांनी दख्खन पठारापासून आणि कोईमतूर पठारापासून वेगळे केले आहे. या नद्यांच्या शीर्षप्रवाहांचे पश्चिमवाहिनी नद्यांनी अपहरण केले आहे. ‌‌‌ याच्या दक्षिणेकडे पालघाट खिंड असून त्याच्याही दक्षिणेला अन्नामलाई पर्वत व पळणी टेकड्या आहेत. 

भरपूर पाऊस आणि सुपीक जमीन यांमुळे निलगिरीचा अर्ध्याहून अधिक पर्वतमय प्रदेश गर्द वनश्रीने व दाट जंगलांनी युक्त आहे. दऱ्याखोऱ्यांतून ‘शोला’ नावाची जंगले आहेत. उधगमंडलम (आधीचे ऊटी) व कुन्नूर तालुक्यांत जंगले जास्त आहेत. वाघ, बिबटे, काळवीट, सांबर, हत्ती हे प्राणी इथे प्रामुख्याने आढळतात. ‌‌‌

थंड हवा व रमणीय परिसर यांमुळे निलगिरीतील उधगमंडलम हे आपल्या सर्वांना जास्त परिचयाचे आहे. १८७६मध्ये या भागात कॉफीची लागवड केली गेली. १९०३–०४मध्ये चहाची लागवड झाली. आता निलगिरीच्या उतारांवर बहुसंख्येने चहा–कॉफीचे मळे आहेत.  निलगिरी पर्वताचा प्रदेश हा एक जिवावरण आरक्षित प्रदेश आहे आणि त्यात सायलेंट व्हॅली, मुक्कुर्थी, मुदुमलाई, बंदिपूर ही राष्ट्रीय उद्याने आहेत. याच्या जवळच नागरहोले, वायनाड आणि सत्यमंगलम् ही जंगलेही आहेत. उधगमंडलम–वेलिंग्टन ते कोईमतूर असा तीन रुळी, ‘ब्लू माउंटन रेल्वे’ नावाचा एक विलक्षण सुंदर लोहमार्ग आणि सडकमार्गही इथे आहे. ही ‘ब्लू माउंटन एक्स्प्रेस’ ब्रिटिशांनी १९०८मध्ये सुरू केली. तिला ‘टॉय ट्रेन’ असेही म्हटले जाते.

निलगिरी पर्वताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्वताच्या पायथ्याकडून शिखराच्या दिशेने जात असताना इथल्या हवेत सतत बदल होत जातात. आपल्याला ते सहजपणे जाणवतात. याला सूक्ष्म हवामान (Microclimate) म्हणतात. पश्चिम घाटात वनस्पती आणि प्राणी यांच्या संदर्भात आणि सूक्ष्म हवामानासंदर्भात केली गेलेली अनेक शास्त्रीय संशोधने याच पर्वतावर केली गेली. या दृष्टीने निलगिरी हा सर्वाधिक सर्वेक्षण आणि संशोधन झालेला आशियातील पर्वत आहे असे म्हटले जाते.

संबंधित बातम्या