किलिमांजारो

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 14 मार्च 2022

भूरत्ना वसुंधरा

पृथ्वीवर अनेक ज्वालामुखीय पर्वत आहेत, मात्र आफ्रिकेतील ‘किलिमांजारो’ या ज्वालामुखीय पर्वताचे इतर सर्व पर्वतात असलेले वेगळेपण ठसठशीतपणे नजरेत भरते. खऱ्या अर्थाने पृथ्वीवरचे हे एक विलक्षण ‘भूरत्न’ आहे.

आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील टांझानियामध्ये केनियाच्या सीमेजवळच, मोम्बासाच्या पश्चिमेला सुमारे २५० किमी अंतरावर आफ्रिका खंडातील ‘माउंट किलिमांजारो’ हा साधारणपणे वायव्य आग्नेय दिशेत पसरलेला सर्वोच्च ज्वालामुखी पर्वत आहे. याची लांबी सुमारे ११० किमी व रुंदी ६५ किमी आहे. हा एक ‘निद्रिस्त’ (Dormant), म्हणजे ज्यात ज्वालामुखीय उद्रेक काही काळासाठी थांबलेला आहे असा ज्वालामुखी पर्वत आहे.

भूशास्त्रीय काळात तीन वेळा तीन वेगवेगळ्या मुखांतून ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्याची निर्मिती झाली. तीन निद्रिस्त ज्वालामुखी असलेला हा जगातील सर्वात उंच, स्वतंत्रपणे उभा असलेला (Freestanding), गिरिपिंड (Massif) आहे. म्हणजे तो कुठल्याही पर्वतरांगेचा भाग नाही.   यातील ‘किबो’ हे सर्वांत उंच ज्वालामुखीय शिखर समुद्रसपाटीपासून ५,८५२ मीटर उंच आहे. 

विषुववृत्ताच्या दक्षिणेला केवळ ३०० किमी अंतरावर असूनही हे शिखर सतत हिमाच्छादित असते. किलिमांजारो पर्वताच्या विशिष्ट स्थानामुळे त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र हवामान तयार झाले आहे. डिसेंबर आणि मेमध्ये इथे नेहमीच हिमवृष्टी होते. मार्च, एप्रिल आणि नोव्हेंबरमध्ये भरपूर पाऊस पडतो.

लुडविग क्राफ व जोहान्स रेबमान या युरोपियन धर्मप्रसारकांनी १८४८मध्ये हा पर्वत पहिल्यांदा पाहिल्याचा उल्लेख मिळतो. जर्मन भूशास्त्रज्ञ डॉ. हान्स मायर व ऑस्ट्रियन गिर्यारोहक लुडविग पर्टशेलर यांनी ऑक्टोबर १८८९मध्ये किबो शिखरावर पहिल्यांदा पाऊल ठेवले. १९१२मध्ये जर्मन गिर्यारोहक एडवर्ड हान्स ओहेलर व फ्रीट्झ क्लूट यांनी मावेन्झी शिखर सर केले, तर अद्वैत भरतिया या नऊ वर्षांच्या भारतीय मुलाने ३१ जुलै २०१९ रोजी किलिमांजारोवर यशस्वी चढाई केली. असे म्हटले जाते, की एव्हरेस्टच्या तुलनेत किलिमांजारोवरील चढाईत जास्त गिर्यारोहकांना प्राण गमवावे लागले आहेत. 

पर्वताच्या माथ्यावर ज्वालामुखीच्या तोंडापाशी ८८७ मीटर रुंदीचा एक खोलगट खड्डा (Volcanic crater) पडलेला दिसून येतो. पूर्वीच्या मोठ्या वर्तुळाकृती विवरांच्या खुणा आजही दिसतात, ज्यात बाहेरचे मोठे विवर २.६ किमी व आतले १.८ किमी परिघाचे असल्याचे दिसते. सर्वात आतले लहान विवर ८ मीटर खोल व २४० मीटर रुंद आहे. त्यात सुमारे ६० मीटर जाडीचा बर्फाचा थर असतो. याला जोडूनच १२ किमी पूर्वेकडे ‘मावेन्झी’ हे ५,०१८ मीटर उंचीचे दुसरे, तर पश्चिमेकडे १७ किमी अंतरावर ‘शिरा’ हे ३,८६४ मीटर उंचीचे तिसरे ज्वालामुखी शिखर आहे. मावेन्झी हे उघडे बोडके व ज्वालामुखीच्या राख असलेले विवर आहे. 

किलिमांजारो हा स्वाहिली शब्द असून ‘किलिमा’ (पर्वत) आणि ‘जारो’ (शुभ्र) या शब्दांवरून हे नाव आले असावे असे म्हटले जाते. ‘आमचा पर्वत’ असाही स्थानिक ‘किचागा’ भाषेतील याचा अर्थ आहे. ‘ग्रेट माऊंटन’ या अर्थानेही तो ओळखला जातो. या पर्वताच्या उतारांवर सापडलेल्या दगडी वाट्या आणि उखळींवरून इसवी सनाच्या आधी एक हजार वर्षे इथे कशा प्रकारची संस्कृती असावी याचा अंदाज येऊ शकतो. 

किलिमांजारोच्या पायथ्याशी असलेली व उतारावरील सुपीक जमीन, भरपूर पर्जन्यवृष्टी यांमुळे याच्या सुमारे १,२२० ते १,८३० मीटर उंचीच्या भागात केळी, मका, कॉफी इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यावरील सुमारे ३,०४८ मीटरपर्यंतच्या प्रदेशात उष्ण व समशितोष्ण कटिबंधीय जंगले आढळतात. त्यात १,२००पेक्षा जास्त वनस्पती प्रकार असून कठीण लाकडाच्या जंगलांचे प्रमाण जास्त आहे. त्याच्या वरच्या भागात सुमारे ३,३६० मीटर उंचीपर्यंत गवताळ प्रदेश आढळतो. त्यानंतर मात्र दलदलीचा व बर्फाच्छादित प्रदेश दिसून येतो. पर्वतपायथ्याची व उतारावरील घनदाट जंगले वन्य पशुपक्षांसाठी आरक्षित केलेली आहेत.          

पर्वतावरील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी १९७३मध्ये किलिमांजारो राष्ट्रीय उद्यान म्हणून हा भाग घोषित करण्यात आला असून १९८७मध्ये त्याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. 

येथील गिर्यारोहणासाठी सहा मार्गांचा वापर होतो, परंतु बरेच गिर्यारोहक पर्वताच्या दक्षिणेकडील पायथ्याशी असलेल्या मोशी (टांझानिया) या प्रमुख व्यापारी केंद्रातून जाणाऱ्या मार्गाचा वापर करतात. सर्वांत उंचीवरील खेळ म्हणून या पर्वतावरील सपाट भागात क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यांसारख्या अनेक खेळांचे विक्रम गिर्यारोहकांकडून प्रस्थापित करण्यात आलेले आहेत. या उद्यानाला भेट देण्यासाठी दरवर्षी देश-विदेशांतून अनेक पर्यटक येतात.

आफ्रिकेतील भूशास्त्रीय दृष्ट्या अस्थिर खच दरीपासून केवळ ८० किमी पूर्वेला किलिमांजारो पर्वताचे स्थान आहे. त्यामुळेही हा पर्वत ज्वालामुखी प्रवण झाला आहे. साधारण साडेसात लाख वर्षांपूर्वी ह्या खचदरी प्रदेशात लाव्हाचा प्रचंड मोठा उद्रेक झाला व शिरा ज्वालामुखी तयार झाला. त्यातून किलिमांजारो गिरिपिंडाची निर्मिती झाली. शिरा ज्वालामुखी पाच लाख वर्षांपूर्वी मृत (Extinct) झाला आणि त्याचे शंकू आकाराचे शिखर धसले. त्यानंतरच्या पन्नास हजार वर्षांत झालेल्या लाव्हाच्या उद्रेकाने मावेन्झी आणि किबो ही शिखरे  निर्माण झाली. किबो शिखर प्रदेशांत ३ लाख ६० हजार वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला होता. त्यानंतर मात्र २०० वर्षांपूर्वी पुन्हा एक उद्रेक झाला, ज्यामुळे एक छोटा राखेचा खड्डा तयार झाला. 

त्यानंतर किबो ज्वालामुखीचा अनेक वेळा उद्रेक झाला, त्याचे शिखर उंचावले आणि आज दिसणारा गडद काळ्या रंगाचा लाव्हा खडक तयार झाला. विवराच्या बाहेरच्या कडेवर (Rim) ‘उहुरू’ हे सर्वोच्च शिखर तयार झाले. ह्या पर्वतावरची तीनही शिखरे लाव्हा आणि ज्वालामुखीय राख यांनी तयार झाली आहेत. मावेन्झी शिखराची खूप मोठ्या प्रमाणावर झीज झाली असली, तरी त्याचा ज्वालामुखीसारखा शंकू आकार आजही लक्षात येतो आहे. या शिखराच्या उजवीकडे किलिमांजारोच्या इतर भागाप्रमाणेच मृदू खडक आणि राखेत तयार झालेल्या अतिशय खोल घळया दिसून येतात.

पूर्वी ह्या पर्वतावर बर्फाचे १०० मीटर जाड आवरण होते. अनेक हिमनद्या या पर्वतावरून खाली वाहत येत होत्या. आज परिस्थिती वेगळी आहे. अनेक हिमनद्या लुप्त झाल्या आहेत आणि हिम आवरणही  खूपच कमी शिल्लक आहे. वैश्विक तापमान वाढ आणि हवामान बदल यामुळे शिल्लक हिमनद्या व हिम वर्ष २०३०पर्यंत या पर्वतावरून नष्ट झाले असेल, असे भाकीत यापूर्वीच करण्यात आले आहे!

संबंधित बातम्या