अतिप्राचीन अरवली पर्वतरांग

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 28 मार्च 2022

भूरत्ना वसुंधरा

गुजरातपासून दिल्लीपर्यंत पसरलेला अतिप्राचीन अरवली पर्वत भारताचा एक अत्यंत महत्त्वाचा असा पर्वत आहे. ‘अरवली’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ ‘पर्वतशिखरांची रांग’ असा आहे. सहाशे किमीपेक्षा जास्त लांबी असलेल्या या पर्वतरांगेचा अभ्यास करणे सोडाच, पण या पर्वतातून नुसते फिरणेही अतिशय जिकिरीचे आहे, असा अभ्यासकांचा अनुभव आहे. मी जेव्हा अबू पर्वत, उदयपूर,  जयपूर, चित्तोडगढ अशी काही निवडक ठिकाणे फिरलो तेव्हा मलाही याचा अनुभव आला होता.

भारतातील पर्वतांपैकी अरवली पर्वतरांग ४०० कोटी वर्षे जुनी आहे. अरवली खऱ्या अर्थाने विवर्तनी (Tectonic) पर्वतशृंखला आहे. ही ६९२ किमी लांबीची नैऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेली जुनी वली पर्वतरांग आहे. भारतीय भूतबक युरेशियन तबकापासून अलग झाले तेव्हापासून अरवली अस्तित्वात आहे. अरवली ही जगातील सर्वात जुन्या भू-अभिनतीत (Geosynclines) तयार झालेली पर्वतरांग  असून तिची शिखरे १,२०० ते १,५०० मीटर उंचीवर आहेत.      

अठरा लाख वर्षांपूर्वी भारतात अस्तित्वात असलेल्या हिमयुगाच्यावेळी (Ice age) अरवली पर्वतावर  हिमनद्या असाव्यात, असे सुचविणारा हिमानी भरड गाळ (Glacial Boulder clay) आजही अनेक ठिकाणी अरवलीत आढळून येतो.                 

अरवली पर्वतात अनेक जंगले आहेत; ही बहुतेक जंगले शुष्क प्रकारातील आहेत. येथे वन्य जैववैविध्य असून वन्यजीवांची संख्याही लक्षणीय आहे. रणथंबोर, सरिस्का ही काही प्रसिद्ध अभयारण्ये अरवली पर्वतात आहेत. राजस्थानातील काही प्रसिद्ध शहरे (उदा. उदयपूर, चित्तोडगढ, जयपूर, सवाई माधोपुरा) अरवली पर्वताच्या सान्निध्यात येतात.       

निर्मितीनंतरसुद्धा वारंवार होणारे लाव्हाचे उद्रेक, वाढलेल्या समुद्र पातळीमुळे होणारे निमज्जन (Submergence), पृष्ठभागाचे उत्थापन (Uplifting) व पाऊस वाऱ्याने झालेली झीज आणि विदारण अशा अनेकविध भूहालचालींचा या पर्वताने आजपर्यंत सामना केला आहे.

गुजरातमधील चंपानेर आणि पालनपूर इथे असलेल्या कमी उंचीच्या टेकड्यांपासून या पर्वतरांगेची सुरुवात होते. पर्वताच्या नैऋत्येकडच्या भागात १,७२२ मीटर उंचीचे माउंट अबूवरचे गुरू शिखर आहे. दिल्लीजवळ गेल्यावर अरवलीचा बराचसा भाग गाळाच्या आणि मातीच्या (Alluvium) आवरणाखाली झाकून गेला आहे. याच गाळातून काही टेकड्या अधूनमधून डोके वर काढताना दिसतात.   

या पर्वतरांगेची ईशान्येकडची उंची ४०० ते ६०० मीटर आहे आणि दिल्ली शहर याच भागात वसले आहे. त्यापुढेही पर्वतरांगेचे टोक हरिद्वारपर्यंत जाते. दिल्ली-हरिद्वार हा अरवलीचा भाग गंगा आणि सिंधू या दोन नद्यांमधला जलविभाजक (Water divide) आहे. लुनी, साखी, बनास, साबरमती आणि साहिबी या नद्यांचे उगम याच पर्वतात आहेत.      

डुंगरपूर, उदयपूर, नाथद्वारा, भिलवाडा आणि अजमेर इथल्या अरवलीच्या सर्व टेकड्यांवर ग्रॅनाईट, संगमरवर, क्वार्टझाइट आणि नीस हे खडक प्रामुख्याने आढळतात. गेल्या काही वर्षांतील खनन कर्म (Mining) व्यवसायामुळे यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.   

माउंट अबू हे राजस्थानातील सिरोही जिल्ह्यातील अरवली पर्वतश्रेणीतील १,६७६ मीटर उंचीवरचे एक उंच शिखर आहे. हे ठिकाण गुजरात राज्याच्या पालनपूरपासून ५८ किमी दूर आहे. येथे पर्वताचे २२ किमी लांब आणि ९ किमी रुंद असे खडकाळ पठार आहे. ते समुद्रसपाटीपासून १,७२२ मीटर उंच आहे. नद्या, तलाव, धबधबे आणि सदाहरित जंगले यांनी संपन्न असलेल्या माउंट अबूला ‘वाळवंटातले नंदनवन’ असेही म्हणतात. अबू पर्वताचे प्राचीन नाव ‘अर्बुदांचल’ असे आहे. पुराणकाळात त्याला ‘अर्बुदारण्य’ म्हटले जात असे. माउंट अबू हा मूलतः एक पातालीय खडक (Batholith) आहे. याचा अर्थ असा की तो पृथ्वीच्या कवचाखाली खूप खोलीवर लाव्हा रस थंड होऊन तयार झालेला ग्रॅनाईट खडक आहे. 

अरवली पर्वत श्रेणीच्या पश्चिमेकडील बाजूला ७८ ते ७५ कोटी वर्षांपूर्वी जो दीर्घकालीन लाव्हा उद्रेक झाला, त्याचा हा परिणाम होता. दोन कोटी वर्षांपूर्वी अरवली पर्वताच्या या भागात अनेक भूपृष्ठ हालचाली झाल्या  आणि भूकवचाला अनेक भेगा पडल्या. त्यामुळेच हा पृथ्वीच्या अंतरंगातील खडक भूपृष्ठावर आला.   

जुलै २०२१मध्ये उत्तर अरवलीच्या काही भागांत फरिदाबादजवळ दहा ते चाळीस हजार ते वर्षांपूर्वीच्या अश्मयुगातील शैलचित्रे सापडली आहेत.                

या पर्वतावरील खडकांत विदारणाचे (Weathering) अनेक आकर्षक प्रकार आढळून येतात. अशा प्रकारे विदारीत झालेले अनेक खडक अबू पर्वतावर विखुरलेले दिसून येतात. मी माझ्या संशोधक विद्यार्थ्यांबरोबर अबू पर्वतावर जेव्हा जेव्हा गेलो, तेव्हा तिथल्या दिलवारा मंदिर किंवा नकी सरोवर या ठिकाणांपेक्षा या पर्वतावरील खडक आणि त्याची ही विविध रूपे बघण्यात जास्त समरसून गेलो होतो. अरवली पर्वताचा भारताच्या हवामानावर खूप मोठा परिणाम झाला आहे. थरचे वाळवंट आणि पूर्व राजस्थान यांच्या मधला तो एक प्रभावी नैसर्गिक अडथळा आहे. त्याच्यामुळेच वाळवंटाकडून पूर्व राजस्थानकडे येणारी वाळू अडवली जाते. उदयपूरचे हवामान वर्षभर आल्हाददायक यामुळेच आहे, असे तिथल्या स्थानिकांनी अतिशय अभिमानाने सांगितल्याचे आजही आठवते.

अगदी प्राचीन काळापासून विचार केला, तर भारताच्या हवामानावर होणारा हा परिणाम किती दूरगामी होता याची कल्पना येऊ शकते. आज जिथे जोधपूरचा मेहरानगड आहे, तिथे ७५ कोटी वर्षांपूर्वी लाव्हाचा प्रलयंकारी उद्रेक झाला होता. त्यावेळी सगळी पृथ्वी जाड हिमावरणाखाली झाकून गेली होती. जोधपूरच्या या लाव्हा उद्रेकामुळे पृथ्वीची या हिमावरणातून मुक्तता होणे सुरू झाले. आजही अरवलीचा वायव्य भारतातील हवामानावर निश्चित असा परिणाम असल्याचे दिसून येते. मॉन्सूनमध्ये या पर्वतामुळे वर्षामेघ पूर्वेकडे सिमला आणि नैनितालकडे वळवले जातात आणि त्यामुळे हिमालयातील नद्यांतून भरपूर पाणी वाहू लागते. थंडीच्या दिवसांत मध्य आशियातून येणाऱ्या थंड पश्चिमी वाऱ्यांपासून उत्तर भारतातील मोठ्या प्रदेशाचे रक्षण होते. मात्र अरवलीच्या पर्जन्यछायेतील पश्चिम राजस्थानात कमी पावसामुळे वाळवंट तयार झाले आहे. याचबरोबर खडकातील भेगा, फटी, सच्छिद्र वालुकाश्म यांतून पाणी भूमिगत होते आणि विस्तृत भूजल साठे निर्माण होतात. आज या प्राचीन पर्वतरांगेचा माणसाच्या हस्तक्षेपामुळे झपाट्याने ऱ्हास होऊ लागला आहे. अनेक स्थानिक आणि स्वदेशी वनस्पती इथून पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत.

एके काळच्या या सर्वाधिक संपन्न पर्वतशृंखलेच्या पर्यावरणाचे रक्षण आज झपाट्याने आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याचे या पर्वतात फिरताना पदोपदी जाणवत राहते!

संबंधित बातम्या