अलौकिक सुंदरतेचा मेरुमणी ‘गिरनार’

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 4 एप्रिल 2022

भूरत्ना वसुंधरा

गिरनार हा गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागात १,०५१ मीटर उंचीचा जगप्रसिद्ध सर्वात उंच पर्वत आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख ‘रेवताचल’ पर्वत म्हणून करण्यात आला आहे, तर स्कंद पुराणात ‘रैवत’, ‘रेवताचल’, ‘कुमुद’, ‘उज्जयंत’ अशी गिरनारची नावे आढळतात. गुजरातच्या सोमनाथ जिल्ह्यात असलेला हा पर्वत सौराष्ट्राच्या बेसॉल्ट खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शीर्ष दिशेने होणाऱ्या झिजेमुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून अलग झाला आहे. 

गिरनारचे  मूळ नाव ‘गिरीनारायण’, पण त्याचा अपभ्रंश होऊन त्याला ‘गिरनार’ असे म्हटले जाते. याच्या अनेक शिखरांपैकी ‘अंबामाता’, ‘गोरखनाथ’, ‘नेमिनाथ’, ‘गुरुदत्तात्रेय’ व ‘कालिका’ ही शिखरे विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे आहेत. हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरू गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. दत्तस्थानापर्यंत सुमारे दहा हजार पायऱ्यांची चढ-उतार करावी लागते. या परिसरात असंख्य छोटे मोठे पर्वत, शिखरे आणि सुळके यांचा समूह आहे. गिरनार समूहातील मध्यवर्ती उंच भागात चार वेगवेगळ्या दिशांनी खाली येणारे चार प्रमुख जलप्रवाह उगम पावतात. गिरनार पर्वताचा परिसर निसर्गरम्य, विलोभनीय वन्यप्राणी जगत आणि विविध औषधी वनस्पतींनी संपन्न आहे. पुरातन काळापासून या पर्वताला  परिक्रमा घालण्याचा परिपाठ सुरू आहे. यात गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा घातली जाते. 

गिरनारच्या परिसरात अनेक शिलालेख आढळून येतात. जुनागडच्या पूर्वेला एका टेकडीच्या पायथ्याशी ब्राह्मी आणि पाली भाषेत लिहिलेला सम्राट अशोकाचा शिलालेख आहे, ज्यात चंद्रगुप्त मौर्य यांनी जीर्णोद्धार केलेल्या आणि गिरनारच्या मधल्या भागात असलेल्या सुदर्शन तलावाच्या निर्मितीचा उल्लेख आढळतो. हा शिलालेख संस्कृत काव्य शैलीतील उत्कृष्ट शिलालेख मनाला जातो. इ. स. १५०मध्ये तयार केलेला हा शिलालेख, गिरनार पर्वताचे चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोकाच्या  इ. स. पूर्व चौथ्या आणि तिसऱ्या शतकातील महत्त्व अधोरेखित करतो. प्राचीन भारतात या शिलालेखाच्या आधी ५०० वर्षांपूर्वी जलसिंचन व जल व्यवस्थापन किती उत्तम होते याचीही यावरून कल्पना येते.

दोन मीटर उंच आणि चार मीटर उंच अशा या शिलालेखात एकूण २० ओळी असून सुरुवातीच्या १६ ओळी मुद्दाम नष्ट केल्या गेल्या असाव्यात आणि नैसर्गिकरीत्याही थोड्या बाधित झाल्या असाव्यात असे लक्षात येते. पुढच्या चार ओळी त्यामानाने बऱ्या स्थितीत आहेत. पहिल्या पुसट झालेल्या ओळीतून चंद्रगुप्ताच्या इ.स. पूर्व ३२१ ते २९७ या काळात जवळच्या सुदर्शन तलावातून केलेल्या जलसिंचनाविषयी माहिती आहे. शेवटच्या १२ ओळींत रुद्रदमन या त्यावेळच्या राजाची स्तुती केली गेली आहे. त्यामुळे याला रुद्रदमन शिलालेख असेही म्हटले जाते.

गिरनारचे वय, रचना आणि खडक याबद्दल अजूनही भूशास्त्रज्ञांत एकवाक्यता नाही. ज्वालामुखीच्या नळीतून उद्रेक झाल्यावर त्या नळीत लाव्हा घट्ट होऊन तयार झालेला तो पर्वतीय भाग (Volcanic plug) आहे. ६.६ कोटी वर्षांपूर्वी दख्खनच्या पठारावर जो लाव्हाचा उद्रेक झाला, त्यात तयार झालेले बेसॉल्ट खडक या पर्वतात सर्वत्र आढळतात. काही शास्त्रज्ञांच्या मते तो काठेवाड उत्थापनानंतर लाव्हाच्या थरांत घुसलेला (Intruded) उपपातालीय (Lacolith) प्रकारचा खडक आहे. त्यामुळे तो तुलनेने थोडा अलीकडचा आहे. दख्खन उद्रेकाच्यावेळी जी निरनिराळी अल्क धर्मीय लाव्हाची वेगवेगळी उद्रेकाची ठिकाणे तयार झाली, त्यातलेच गिरनार हे एक स्थान आहे. काहींच्या मते गिरनार पर्वत हा एक मृत ज्वालामुखी (Extinct volcano) आहे.

निर्मितीच्यावेळी गिरनार पर्वताचे आजचे स्थान दक्षिणेला ३,२५० किमी अंतरावर आजच्या दिएगो गार्सिआजवळ होते. भारतीय भूतबक जसे ईशान्येकडे सरकले तसा हा पर्वत आजच्या स्थानी येऊन स्थिरावला. त्यावेळी त्याचा विस्तार आजच्यापेक्षाही जास्त असावा. तो एक प्रकारचा ज्वालामुखीय घुमट (Dome) आहे असेही म्हटले जाते. त्याच्या पश्चिमेला माथ्यापासून साडेचार किमीवर जुनागड शहर आहे. इथे उत्खननात जी पुरातत्त्वशास्त्रीय (Archaeological) हत्यारे सापडली, त्यावरून ७० ते ९५ हजार वर्षांपूर्वी या भागात आदिमानवाची वसतिस्थाने असावीत असा अंदाज बांधता येतो. 

गिरनार पर्वत आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाची रचना बघून त्याला वज्र चक्राची उपमा दिली जाते. एका वर्तुळाकृती दिसणाऱ्या खोलगट भागात गिरनार पर्वताचे स्थान असून भोवती असलेल्या डोंगरात चार प्रमुख दिशांना असलेल्या वाटा ओलांडून तिथपर्यंत जाता येते. मध्यवर्ती भाग ही उंच डोंगररांग असून त्यावरच इथली सर्वोच्च शिखरे आहेत. ही रांग पूर्व पश्चिम पसरली आहे आणि तिच्या दोन्ही टोकांना ती दोन दोन उपशाखांत विभागली जाते. मध्यवर्ती डोंगररांगेच्या भोवती पाच किलोमीटर अंतरावर आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य अशा चारही दिशांना चापाकृती (Arcute) टेकड्या आहेत आणि त्यांनी मधल्या उंच भागाभोवती एक कडे (Ring) केले आहे. अशी विलक्षण नैसर्गिक रचना इथे आढळते. या सगळ्या भागाला गिरनार समूह (Complex) असे म्हटले जाते.

हा गिरनार समूह डोंगराळ आणि अतितीव्र डोंगर उतारांनी अगदी भरून गेला आहे. गिरनार पर्वताच्या चारही बाजूंनी असलेले कडे तीव्र उताराच्या जणू भिंतीच आहेत. त्याचा दक्षिणेकडच्या कडा ५५० मीटर उंचीचा उभा उतार आहे! मध्यवर्ती गोरखनाथ शिखराच्या पूर्व पश्चिम दिशेत अंबाजी (उंची १,०१० मीटर), ओघडनाथ, दत्तात्रेय, अनसूया आणि कालिका ही शिखरे दिसतात. गोरखनाथ (१,११६ मीटर) शिखराच्या भोवती चार किमीच्या परिसरात इंद्रेश्वर, जांबुडी, लिंबडी धार आणि दातार अशा लहान लहान टेकड्यांचा वेढाच असल्याचे दिसून येते. या समूहाच्या पायथ्याशी भरपूर झाडे, नद्यांचे खोल मार्ग, घळया आणि  इतस्ततः पसरलेले ग्रॅनाइट खडक आढळतात. दक्षिणेकडे दातार टेकड्या, बोर देवी, डुंगर थाना यांनी घेरलेल्या २५५ मीटर उंचीवरच्या खोलगट भागात अशा घळया दिसून येतात. 

ऑक्टोबर २०२०पासून इथे रोप वेची सुविधा उपलब्ध झाली आहे. २,३२० मीटर लांबीचा हा रोप वे ८५० मीटर उंचीवरच्या अंबिका मंदिरापर्यंत जातो. यामुळे हे विलक्षण सुंदर भूरत्न अनेकांच्या आता आवाक्यात आले आहे!

संबंधित बातम्या