चॉकलेट हिल्स : लोभस टेकडी समूह

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 11 एप्रिल 2022

भूरत्ना वसुंधरा

फिलिपीन्सच्या बोहोल प्रांतांत ‘चॉकलेट हिल्स’ नावाचा जगावेगळा अतीव सुंदर असा टेकड्यांचा समूह आहे. ह्या सगळ्या चुनखडकांनी तयार झालेल्या टेकड्यांवर हिरवे गवत आहे आणि कोरड्या ऋतूत ते तपकिरी रंगाचे दिसते म्हणून त्यांना चॉकलेट हिल्स म्हटले जाते. चॉकलेट हिल्स हे पृथ्वीवरचे एक आकर्षक आणि असामान्य असे निसर्ग लेणे आहे. 

फिलिपीन्स प्रजासत्ताक हा पश्चिम प्रशांत महासागरातील एक फार मोठा द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह इतका सुंदर आहे की खऱ्या अर्थाने ‘भूरत्ना वसुंधरा’ हे पृथ्वीचे वर्णन त्यामुळेच यथायोग्य ठरते. फिलिपीन्समध्ये ७,१०७ बेटांचा समावेश आहे. अनेक सक्रिय भूकंप केंद्रे आहेत, इथले भूकंप कमी तीव्रतेचे असतात. माउंट पिनाटूबो, बुलुसन, इरिगो, स्मिथ, रुगांग आणि ताला ज्वालामुखीसारखे अनेक सक्रिय ज्वालामुखीही या द्वीपसमूहावर आढळतात. 

फिलिपीन्सच्या बोहोल प्रांतांत ‘चॉकलेट हिल्स’ नावाचा जगावेगळा अतीव सुंदर असा टेकड्यांचा समूह आहे. बोहोल हे फिलिपीन्स द्वीपसमूहातील दहावे  मोठे बेट असून ते फिलिपीन्सच्या साधारणपणे मध्यवर्ती भागात आहे. त्याच्या भोवती जी ७२ छोटेखानी बेटे पसरली आहेत, त्यांनी बोहोलचे सौंदर्य द्विगुणित केले आहे. चॉकलेट हिल्स हे पृथ्वीवरचे एक आकर्षक आणि असामान्य असे निसर्ग लेणे आहे. लोबोक नदीच्या आजूबाजूला समुद्रसपाटीपासून साधारण १५० ते २०० मीटर उंचीच्या या प्रदेशात समूहातील टेकड्या पसरल्या आहेत.  

या समूहात ५० चौ.किमी प्रदेशात १,२६० टेकड्या आहेत. त्यांची संख्या १,७७६ इतकी असावी अशी शक्यता आहे. गमतीचा भाग म्हणजे त्यांची नेमकी गणना अजूनही झालेली नाही! ह्या सगळ्या चुनखडकांनी तयार झालेल्या टेकड्यांवर हिरवे गवत आहे आणि ते कोरड्या ऋतूत तपकिरी रंगाचे दिसते म्हणून त्यांना चॉकलेट हिल्स म्हटले जाते.

फिलिपीन्स देशाने या टेकड्यांना देशाचे तिसऱ्या क्रमांकाचे भूशास्त्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. त्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत समावेश व्हावा म्हणून प्रस्तावही मांडला आहे. १९८८मध्ये या टेकड्यांना राष्ट्रीय भौगोलिक स्मारकाचा दर्जा देण्यात आला. बोहोल प्रांताच्या ध्वजावर आणि शिक्क्यावरही ह्या टेकड्यांना स्थान देण्यात आले आहे.

अर्धगोलाकृती, शंकू आकाराच्या उंचवट्यांच्या गवताच्या गंजीसारख्या (Haycock) टेकड्यांचा सौम्य चढ उतार असलेला हा सगळा प्रदेश आहे. टेकड्यांचे उंचवटे ३० ते ५० मीटर उंचीचे आहेत, सर्वाधिक उंचीचा उंचवटा १२० मीटर उंच आहे. बोहोल प्रांतातील कॅरमेन, बातूआन आणि सगबायन शहरांमध्ये त्या पसरलेल्या आहेत. मात्र, अजूनही या टेकड्या अर्धगोलाकृती कशामुळे होतात हे समजलेले नाही.

टेकड्यांच्या मधे असलेल्या सपाट जमिनीवर भात व इतर नगदी पिके घेतली जातात. आज या टेकड्यांवर चुनखडकातील खाणकाम सुरू झाल्यामुळे टेकड्यांचा झपाट्याने ऱ्हास होऊ लागला आहे. जगात अशा टेकड्या फार कमी आहेत, आणि ज्या आहेत त्या चॉकलेट हिल्ससारख्या नाहीत. या टेकड्यांची अंतर्गत रचना बघितल्यावर त्या चुनखडकाच्या अनेक थरांनी त्या तयार झाल्या आहेत, असे लक्षात येते.

पंचवीस लाख वर्षांपूर्वीपर्यंत फिलिपीन्सचा हा प्रदेश समुद्राच्या पाण्याखाली होता. त्यानंतर झालेल्या भूतबकांच्या (Tectonic plates) हालचालींमुळे समुद्रतळ खचला व समुद्रापातळी खाली गेली आणि हा चुनखडकाचा प्रदेश वर आला. त्यावर प्रवाळ आणि शंख शिंपल्यांचे प्रचंड मोठे संचयन झाले होते. या टेकड्या २५ ते ५३ लाख वर्षे जुन्या प्लायोसिन काळाच्या अखेरीच्या आणि प्लायीस्टोसीनच्या सुरुवातीच्या काळातील सागरी चुनखडकाने तयार झाल्या आहेत. यात प्रवाळ, एकपेशीय वनस्पती आणि मृदू शरीर व कवचधारी जीव (Mollusc) यांचे भरपूर जीवावशेष सापडतात.

चुनखडक समुद्रतळावरून वर आल्यानंतर आणि भूकवचाच्या प्रक्षोभक हालचालीमुळे त्याला भेगा पडल्यानंतर नद्या व वाहते पाणी यामुळे त्याची झीज झाली. त्यानंतर पाऊस, भूजल यामुळे चुनखडक विरघळून या टेकड्या तयार झाल्या. यामुळेच या टेकड्यांत अनेक गुहा आणि पाण्याचे झरे आढळतात. एका मतानुसार, समुद्रात झालेल्या प्राचीन ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जे खडक वर फेकले गेले त्यातून या टेकड्यांची निर्मिती झाली असावी. समुद्रतळावर  असलेल्या प्रवाळ खडकांच्या उत्थापनानंतर किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर प्रवाळ खडक वर फेकले गेल्यामुळे या टेकड्या तयार झाल्या, असेही एक मत आहे. मात्र ज्वालामुखीचा उद्रेक सुचविणारे कोणतेही पुरावे आजुबाजूला सापडत नाहीत, त्यामुळे ही कल्पना मान्य होऊ शकली नाही.

या टेकड्यांच्या निर्मितीबद्दल इतरही अनेक वदंता असून असेही म्हटले जाते की त्या मनुष्यनिर्मित आहेत आणि त्याखाली खूप सोने दडलेले आहे! सध्या या टेकड्यांवर गवत, जंगली फुलझाडे आणि नेच्यांचे (Fern) आवरण आहे. टेकड्यांच्या दरम्यान असलेल्या सपाट जमिनीवर जी स्थानिक झाडे वाढतात ती कापून तेथे पिके घेतली जात आहेत.

आजपर्यंत यातील केवळ दोनच टेकड्यांचा पर्यटनासाठी विकास केला गेला आहे. १५ ऑक्टोबर २०१३ रोजी इथे झालेल्या ७.२ रिश्टर ताकदीच्या भूकंपाने मोठे नुकसान केले. अनेक टेकड्यांमध्ये भूस्खलनाच्या घटनाही घडल्या. मोठी जीवितहानी झाली. ऑक्टोबर हा फिलिपिन्समध्ये मॉन्सून आणि टायफून वादळांचा असतो. दरवर्षी या काळात दोन ते तीन हजार मिमी पाऊस पडतो. यामुळेही नुकसान होते.

स्लोव्हेनिया, क्रोएशिया, उत्तर पोर्टो रिको, क्युबा या चुनखडी प्रदेशांतील शंकू आकाराच्या चुनखडी टेकड्यांप्रमाणेच चॉकलेट हिल्स आहेत. उष्ण कटीबंधीय प्रदेशातील म्यानमार, व्हिएतनाम आणि लाओसमध्येही या रचना आढळतात. चुनखडीच्या या टेकड्या जशा अर्धगोलाकृती असतात तशाच त्या उंच मनोऱ्यासारख्याही असतात. यांच्या मधे नेहमी खोलगट भाग आणि अरुंद, तीव्र काठाच्या चुनखडक दऱ्या किंवा अरुंद मार्ग असतातच.

इंडोनेशियातील जावा बेटावर गुनुन्ग सेऊ या ठिकाणी अशाच टेकड्या आहेत. त्या ५० मीटर उंच आणि शेकडो मीटर रुंद आहेत. प्रत्येक दोन टेकड्यांच्या दरम्यान विलयन विवरांकडे  (Sink holes) जाणाऱ्या तुटक तुटक दऱ्या, तारकाकृती सखल प्रदेश (Dolines) आढळून येतात. जावाच्या या भागात सापडलेले पुरातत्त्व शास्त्रीय पुरावे इथे प्राचीन मानवी वस्त्या असाव्यात याला पुष्टी देतात. तेरा हजार चौ.किमीच्या प्रदेशात इथे चाळीस हजार शंकू टेकड्या असून त्यात १२० गुहा आहेत. केवळ याच गुहांत सेसरमिड प्रजातीचे (Family) प्रदेशनिष्ठ खेकडे सापडतात. याच भागात लुवेंग जारान नावाची सर्वाधिक लांबीची म्हणजे २५ किमी लांब गुहा आणि लुवेंग गिपोह नावाची सर्वात जास्त खोलीची म्हणजे २०० मीटर खोल गुहा आहे. इतक्या लांब आणि खोल गुहा चॉकलेट हिल्सवर सापडत नसल्या, तरी त्यांची संख्या आणि आकार यामुळे तो एक अनोखा आविष्कार म्हणून जगप्रसिद्ध झाला आहे हे नक्कीच!

संबंधित बातम्या