एयर्स रॉक...

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 18 एप्रिल 2022

भूरत्ना वसुंधरा

ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दन प्रॉव्हिन्समध्ये समुद्रसपाटीपासून ८६३ मीटर उंचीवर ३४३ मीटर उंचीचा, उलुरू किंवा एयर्स (Ayers) रॉक नावाचा विलक्षण सुंदर  आणि देखणा असा द्वीपगिरी (Inselberg) आहे. जगात अनेक ठिकाणी दिसणाऱ्या द्वीपगिरी या भूरूपाचे ते प्रातिनिधिक उदाहरण आहे.

आजूबाजूच्या विस्तीर्ण सपाट प्रदेशात अचानक अवतीर्ण झालेला एकांड्या शिलेदारासारखा दिसणारा तीव्र उतार असलेला एकजिनसी डोंगर स्वरूपी खडक म्हणजे ‘द्वीपगिरी’. मेक्सिको, इटली, ब्राझील, सहारा, टांझानिया, भारत अशा विविध ठिकाणी असे द्वीपगिरी दिसून येतात. त्यांचे घुमटाकृती, सुळक्यासारखे, सपाट पठारांसारखे असे अनेक आकार आढळून येतात. प्रदेशातला मृदू खडक अपक्षरण (Erosion) क्रियेने झिजून गेल्यावर जो अतिशय कठीण खडक शिल्लक राहतो तो म्हणजे हा द्वीपगिरी. ते सर्व प्रकारच्या खडकांत तयार होतात. 

जगातील अनेक द्वीपगिरींवर जे मोठे खड्डे आहेत त्यात प्राणी, पक्षी, सरपटणारे जीव आणि वनस्पती यांची निवासस्थानेही आहेत. द्वीपगिरीमुळे अडलेल्या मातीच्या जाड थरात खूप दाट झाडी वाढल्याचीही उदाहरणे आहेत. टांझानिया, उत्तर ब्राझील, नामीबिया, अंगोला, फिनलँड आणि स्वीडनमध्ये अनेक द्वीपगिरींनी व्यापलेले विस्तीर्ण प्रदेशही (Inselberg fields) आहेत.

आपल्याकडे म्हैसूरजवळ असलेला १७ मीटर उंचीचा गोमटेश्वरांचा पुतळा ज्या खडकावर आहे, तो समुद्रसपाटीपासून ८० ते ८५ मीटर उंचीवर असलेला ८८० मीटर उंच द्वीपगिरी आहे. तो ग्रॅनाईट खडक आहे. हा पूर्ण चढून जात असताना मला द्वीपगिरी या विलक्षण भुरूपाचे, पाय ठरू न देणारे उतार, त्यावरील खडकांचे पापुद्रे, भेगा, फटी अशा अनेक वैशिष्ट्यांचा जवळून अभ्यास करता आला. असाच अभ्यास श्रीलंकेतील डांबूला जवळचा सिगिरिया द्वीपगिरी चढताना केला होता, पण तो द्वीपगिरी चढण्यासाठी जास्त कठीण असल्यामुळे त्या चढाईचा अनुभव चांगलाच लक्षात राहिला आहे!

हंपीला तर अनेक द्वीपगिरींनी भरून गेलेला मोठा भूभागच आहे. तिथे द्वीपगिरीचे अनेक प्रकार, त्यांची जडणघडण, निर्मिती प्रक्रिया दर्शविणारे पुरावे जवळून अनुभवता आले. त्यासाठी अर्थातच दोन दिवस या खडकांच्या पसाऱ्यातून न कंटाळता, न थकता मनसोक्त फिरावे लागले. हंपीचे द्वीपगिरी अनेक मोठ्या शिलाखंडांनी (Boulders) तयार झालेले आहेत, म्हणूनच त्यांना ‘शिलाखंड द्वीपगिरी’ असे म्हटले जाते. या द्वीपगिरींचे अनेक प्रकार हंपीच्या परिसरात सर्वत्र पसरलेले दिसतात. हे द्वीपगिरी कुठल्याही ज्वालामुखीय क्रियांनी किंवा पृथ्वी कवचाच्या उत्थापनातून (Uplifting) तयार झालेले नाहीत, तर ते एका अतिप्राचीन अशा एकसंध आणि अतिविशाल खडकाच्या (Monolith) विदारणातून तयार झाले आहेत.   

हंपीचे द्वीपगिरी जगातील इतर द्वीपगिरींप्रमाणेच अनाच्छादन (Denudation) क्रियेनंतर शिल्लक राहिलेले डोंगरांचे शिल्लक भाग आहेत. त्यांची उंची साधारणपणे दीडशे ते अडीचशे मीटर असल्याचे दिसून येते. या उघड्या पडलेल्या अवशिष्ट टेकड्यांवर (Residual hills) एक मीटर ते १० मीटर व्यासाच्या आकाराचे अनेक लहानमोठ्या आकाराचे मूळ खडकाचे विदारण झालेले ग्रॅनाईटचे तुकडे किंवा गाभादगड (Corestones) पसरलेले आढळतात. हे तुकडे या प्रदेशात खोलवर घडून गेलेल्या विदारण प्रक्रियेचे पुरावेच आहेत. पृथ्वीवर फार दुर्मीळ असे उघडे पडलेले जे शिलाच्छादित प्रदेश आहेत, त्यातलाच हा एक प्रदेश आहे.

***

ऑस्ट्रेलियातील उलुरू किंवा एयर्स रॉक हा द्वीपगिरी प्रामुख्याने स्तरीत खडकांत तयार झाला असून तो ५५ ते ५३ कोटी वर्षे जुना आहे. या द्वीपगिरीची जागतिक वारसा स्थळ म्हणूनही नोंद झाली आहे. ‘आनांगु’ या प्रदेशात राहणाऱ्या आदिवासी लोकांचे ते श्रद्धास्थान आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक झरे, पाणवठे, गुहा आणि प्राचीन रंगीत चित्रे आढळून येतात. १९ जुलै १८७३ रोजी विल्यम गूस या सर्व्हेअरने हा खडक पाहिला आणि त्याने दक्षिण  ऑस्ट्रेलियाचे त्यावेळचे मुख्य सचिव सर हेन्री एयर्स यांच्या सन्मानार्थ ‘एयर्स रॉक’ असे नाव दिले.

या द्वीपगिरीचा मोठा भाग भूमिगत असून पृष्ठभावर दिसणाऱ्या खडकाचा परीघ ९. ४ किमी आहे. तो विविध रंगी गाळाच्या स्तरीत खडक आणि पिडाष्मापासून (Conglomerate) तयार झाला आहे. त्यामुळे दिवसाच्या आणि वर्षाच्याही वेगवेगळ्या वेळी खडकावरून सदैव बदलणारे रंग आणि पहाटे व सूर्यास्तानंतर दिसणारा लालसर रंग हे याचे महत्त्वाचे आकर्षण आहे. 

एयर्स रॉक हा द्वीपगिरी एकजिनसी आहे आणि त्यावर संधी (Joints) किंवा स्तरतल (Bedding planes) दिसत नाहीत. यामुळेच याच्या उतारावर  दगडांचे ढीग किंवा तुटलेल्या खडकांचे तुकडे (Scree) आणि पायथ्याशी माती तयार झालेली दिसत नाही. हा द्वीपगिरी त्याच्या मूळ स्वरूपात फारसा बदल न होता आजही अबाधित आहे याचेही कारण हेच आहे.

झाडे, खुरट्या वनस्पती, गवत आणि विविध प्रकारची फुलझाडे, त्याचप्रमाणे २१ प्रकारच्या सस्तन जिवांच्या प्रजाती यांनी हा प्रदेश संपन्न आहे. या खडकाच्या निर्मितीबाबत अनेक दंतकथा आणि मिथके आजही अस्तित्वात आहेत. या द्वीपगिरीवरून खडकांचे तुकडे नेले, तर ते नेणारी व्यक्ती शापग्रस्त होते आणि तिला अनेक संकटांचा सामना करावा लागतो, असा इथल्या आदिवासींचा विश्वास आहे. जेव्हा भरपूर पाऊस पडतो तेव्हा अनेक धबधबे द्वीपगिरीवरून खाली कोसळतात. या भागात २८५ मिमी सरासरी पाऊस पडतो. डिसेंबर-जानेवारीत उन्हाळा असतो आणि तापमान ३८ अंश सेल्सिअस असते. या द्वीपगिरीच्या परिसरात दहा हजार वर्षांआधी मनुष्यवस्ती असल्याचे पुरातत्त्वशास्त्रीय पुरावे सापडले आहेत.         

सन १८७३पर्यंत उलुरू किंवा एयर्स रॉकची मालकी ‘आनांगु’ आदिवासींकडे होती. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडे गेली. आनांगु आदिवासींच्या संस्कृतीमध्ये या खडकाला मोठे महत्त्व आहे. ‘हे आमचे घर आहे. कृपया या खडकावर चढू नये,’ असाफलक सरकारने खडकाच्या पायथ्याशी लावावा यासाठी ते सतत प्रयत्न करीत होते. खडकाच्या आजूबाजूचे वातावरण इतके  असह्य आणि कठोर (Harsh) आहे की इथे माणूसच काय हा खडकही फार काळ टिकून राहणार नाही असे त्यांचे म्हणणे होते! १९५०नंतर अनेक वर्षे आनांगु लोकांच्या मर्जीविरुद्ध हा द्वीपगिरी पर्यटक चढून जात होते. त्यामुळे खडकाचे मोठे नुकसानही झाले होते. अखेरीस पर्यावरण रक्षण आणि स्थानिकांच्या विरोधाचे कारण देऊन २६ ऑक्टोबर २०१९पासून या खडकावर चढण्यास बंदी घालण्यात आली आहे. आता तरी हे भूरत्न अबाधित राहील असे म्हणू या!

संबंधित बातम्या