पाण्याखालचे पर्वत विश्व

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 9 मे 2022

भूरत्ना वसुंधरा
 

समुद्रतळावर मोठ्या संख्येने असलेले पर्वत विविध आकाराचे, विस्ताराचे आणि प्रकारांचे असतात. प्रत्येकाची जन्मकथाही वेगवेगळी असते. त्यांचे एक प्रचंड मोठे विश्वच समुद्रतळावर पसरलेले आहे. १९८०नंतर याबद्दलची नेमकी माहिती आपल्याला मिळू लागली आहे.

समुद्रतळावर सागरी मैदान (Abyssal Plain) या भागावर हजारो मीटर उंचीचे त्रिकोणी आकाराचे जे उंचवटे आहेत त्यांना पाण्याखालचे पर्वत म्हणतात. पर्वताचे हे वेगळेच रूप असून त्यातले बरेचसे पर्वत हे मृत ज्वालामुखी आहेत! ते समुद्रपृष्ठाच्या वर आले तर हवाई किंवा अल्युशिअन बेटांसारखे दिसतील. 

हवाई बेटावरील ‘मोना की’ (Mauna Kea) हा ४,२०७ मीटर उंचीचा अशाच प्रकारचा, समुद्राबाहेर डोकावणारा पर्वत आहे. मात्र इतर पर्वत अनेक मीटर खाली समुद्रातळावरच असतात.

पृथ्वीवरचे ज्वालामुखीय उद्रेक प्रामुख्याने समुद्रतळावर होतात आणि यामुळे तिथे पर्वत निर्माण होतात. त्यामुळे हे पर्वत खऱ्या अर्थाने ज्वालामुखीजन्य आहेत.  पाण्याखालच्या पर्वतांच्या वितरणावरून समुद्रात प्राचीन काळात कुठे कुठे उद्रेक झाले असावेत, याची नेमकी कल्पना येऊ शकते. समुद्रतळाच्या अभ्यासावरून असेही लक्षात येते, की पाण्याखालच्या या पर्वतांचे वितरण अनियमित आहे आणि बऱ्याच समुद्रांत या पर्वतांचे समूह (Clusters) तयार झाले आहेत. त्यांच्या काही पर्वत रांगाही तयार झाल्या आहेत. जवळजवळच्या पर्वतांचे पायथ्याचे भाग एकमेकांत मिसळून या पर्वत शृंखला निर्माण होतात, मात्र यांचे माथे वेगवेगळे दिसून येतात. समुद्रतळावर मोठ्या संख्येने असलेले हे पर्वत विविध आकाराचे, विस्ताराचे आणि प्रकारचे असतात. प्रत्येकाची जन्मकथाही वेगवेगळी असते. त्यांचे एक प्रचंड मोठे विश्वच समुद्रतळावर पसरलेले आहे. १९८०नंतर याबद्दलची नेमकी माहिती आपल्याला मिळू लागली आहे.

सपाट माथ्याच्या पाण्याखालच्या पर्वताला ‘गायोट’ किंवा ‘गेयो’ (Gyuot) म्हणजे सागरी पठार म्हटले जाते. प्रारंभीच्या, पाण्याबाहेर डोकावणाऱ्या, त्रिकोणी उंचवट्यांची लक्षावधी वर्षे सागरी लाटा व विदारण यांमुळे झीज होते आणि त्यांचे माथे सपाट होतात. कालांतराने हा उंचवटा पाण्याखाली जातो. अशा उंचवट्याला गायोट किंवा टेबल माऊंट असे म्हटले जाते.

आजपर्यंत अशा पाण्याखालच्या दहा हजार पर्वतांचा शोध लागला असून समुद्रातळाचा एकूण पसारा पाहता ही संख्या अगदीच नगण्य असण्याची शक्यता जास्त आहे. विशिष्ट भूशास्त्रीय रचनेमुळे ही संख्या प्रशांत महासागरात खूपच जास्त असावी असा अंदाज आहे. एक हजार मीटरपेक्षा कमी उंची असलेल्या पर्वतांची संख्या समुद्रतळावर सर्वाधिक आहे. समुद्रतळाचे दोन टक्के क्षेत्र या पर्वतांनी व्यापले आहे. पूर्वी ‘सोनार’सारखी उपकरणे मोठ्या जहाजावर ठेवून समुद्रातळाचा उंच सखलपणा मोजला गेला. सध्या कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून व त्यावरून सूक्ष्मलहर संदेश प्राप्त करून त्यांच्या साहाय्याने समुद्रतळ मोजला जातो (Satellite Altimetry). अचूक समुद्रतळ मापनासाठी या तंत्राचा खूप चांगला उपयोग होत आहे. खूप खोलवर जाणाऱ्या पाणबुडी (Submersibles) वापरून समुद्रतळावरील पर्वतांची मोजमापे घेऊन त्यावरील रासायनिक, भूशास्त्रीय आणि जैविक नमुनेही गोळा केले जातात. 

पाण्याखालचे पर्वत हा सागरी जिवांचा एक स्वतंत्र अधिवास आहे. या पर्वतांनी पृथ्वीवरचे तीन कोटी वर्ग किमी क्षेत्र व्यापून टाकले आहे. पृथ्वीवरच्या कुठल्याही अधिवासापेक्षा हे अधिवास क्षेत्र खूप मोठे आहे. असे असूनही इतक्या समृद्ध अधिवासाबद्दल तो समुद्रात असल्यामुळे आपल्याला खूपच कमी माहिती आहे.

या पर्वतांचा समुद्रातील उष्ण आणि थंड प्रवाहांवर खूप मोठा परिणाम  होतो. या प्रवाहांमुळे या पर्वतावरील अनेक अन्नद्रव्ये समुद्राच्या पृष्ठभागी येतात. परिणामी, मासेमारी करणाऱ्या लोकांना या पर्वतांच्या जवळपास हजारो टन मासे मिळतात. मासेमारी करणाऱ्यांनी हे निरीक्षण मांडल्यामुळे समुद्रतळावरील बऱ्याच पर्वतांचा शोध लागायलाही मदत झाली आहे. अर्थात यामुळे मोठे मासे पकडण्यासाठी जे ट्रॉलिंग केले जाते त्यात हे अधिवास खरवडले जातात. जंगलतोड केल्यावर जंगलांची जी अवस्था होते तशीच ही परिस्थिती असते. या पर्वतांच्या उंचीत आणि दोन पर्वतांमध्ये इतके अंतर असते की त्यामुळे प्रत्येक पर्वत एखाद्या बेटासारखाच असतो. प्रत्येकाचे त्याचे असे प्रदेशनिष्ठ (Endemic) स्वतंत्र सागरी पर्यावरण असते. 

प्रत्येक सागरी पर्वत हा जैवविविधतेचा समृद्ध प्रदेश (Biodiversity Hotspot) असतो, मात्र अजूनही त्यांची सागरी पारिस्थितिकी (Marine Ecology) आणि त्यांचा आजूबाजूच्या सागरी पर्यावरणावर आणि संपन्नतेवर होणारा परिणाम याबाबतीत सागर शास्त्रज्ञ अनभिज्ञच आहेत. आज समुद्रातळावरील असे अनेक पर्वत विविध संकटांचा सामना करीत आहेत. माणसाकडून होणारी मत्स्य जिवांची हानी हा धोका तर वाढतोच आहे, शिवाय हजारो वर्षे पाण्यात असल्यामुळे त्यांच्या उतारांची आणि बाजूंची झीज व विदारण होऊन त्यावर वारंवार भूस्खलन होऊन ते ढासळू लागले आहेत. समुद्रातील हे पर्वत जमिनीवरील ज्वालामुखी पर्वतांपेक्षा जास्त उंच असतात. समुद्रतळावर वारंवार होणाऱ्या ज्वालामुखीय उद्रेकानंतर ते तयार होतात. प्रवाळ, खेकडे, मासे, शार्क, कासवे, व्हेल आणि डॉल्फिन अशा उथळ व खोल पाण्यातील जिवांचे ते मुख्य आश्रयस्थान आहे. उत्तर प्रशांत महासागरात ‘मरिआना’, ‘गिल्बर्ट’, ‘टूओमोटू’ आणि दक्षिण प्रशांत महासागरात ‘लुईसविले’ व ‘गोमेझ’ हे पर्वत समुद्राखाली आहेत. अटलांटिकमध्ये वालविस रिज, बर्म्युडा आणि केप वेर्दे यांच्या जवळ व हिंदी महासागरात असे अनेक पर्वत आढळतात. सोबतच्या तक्त्यावरून याची कल्पना येऊ शकेल.

आत्तापर्यंत आपण ‘पर्वत’ या पृथ्वीवरील एका महत्त्वाच्या भूरत्नाबद्दल माहिती घेतली. यानंतर अशाच काही इतर भूरत्नांबद्दल माहिती घेणार आहोत.

संबंधित बातम्या