अद्वितीय बैकल सरोवर

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 12 सप्टेंबर 2022

समृद्ध जैववैविध्य हे रशियातल्या सैबेरियामधल्या बैकल सरोवराचे वैशिष्ट्य आहे! एक हजार प्रकारच्या वनस्पती आणि अडीच हजार प्रकारचे प्राणी या सरोवरात आढळून येतात. जानेवारी ते मे या दरम्यान बैकल सरोवर गोठलेल्या स्थितीत असते. या काळात सरोवरावरील बर्फाचा थर त्यावरून चालता येईल इतका घट्ट असतो. २४ हजार वर्षांपूर्वी सरोवराकाठी मानवी वस्ती असावी, असे सूचित करणारे काही मानवी अवशेष या भागात शास्त्रज्ञांना आढळले आहेत. पृथ्वीवरील एकूण गोड्या पाण्यापैकी २० टक्के पाणी याच तलावात आहे.

रशियाच्या दक्षिण सैबेरियामध्ये ‘बैकल’ हे जगातील सर्वात जुने व सर्वात खोल गोड्या पाण्याचे सरोवर आहे. सरोवराचे एकूण पाणलोट क्षेत्र पाच लाख ६० हजार चौरस किमी आहे आणि त्याची सर्वाधिक लांबी ६३६ किमी व सर्वाधिक रुंदी ८० किमी आहे. समुद्रसपाटीपासून सोळाशे मीटर उंचीवर असलेल्या आणि अंदाजे तीन कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या बैकल सरोवराची सरासरी खोली ७४५ मीटर व सर्वाधिक खोली १.६ किमी इतकी आहे.  या सरोवराचा किनारा दोन किमी लांब आहे आणि ते समुद्रसपाटीपासून ४५६ मीटर उंचीवर स्थित आहे. या आकडेवारीवरून हे सरोवर किती विस्तृत आणि विशाल आहे त्याची कल्पना करता येते.     

हे सरोवर बैकल खचदरी प्रदेशात (Rift Zone) एका अतिशय खोल सांरचनिक (Structural) खळग्यात आहे आणि त्याच्या आजूबाजूचे काही पर्वत दोन हजार मीटरपेक्षा जास्त उंच आहेत. जवळच्या प्रदेशात पडलेल्या भेगांतून बाहेर पडलेले अनेक उष्ण पाण्याचे झरेही इथे दिसून येतात. सरोवराचे वार्षिक सरासरी तापमान उणे १.२ अंश सेल्सिअस इतके असते. फेब्रुवारीत ते उणे १८.२ अंश इतके खाली उतरते, तर ऑगस्टमध्ये १३.७ अंश सेल्सिअस इतके वाढते.

या सरोवराचा तळ समुद्रसपाटीच्याही खाली १२०० मीटर खोल आहे आणि त्याखाली सात किमी जाडीचा गाळाचा थर आहे. ज्या खचदरीत हे सरोवर आहे, ती खचदरी जगातील सगळ्यात खोल भूखंडिय (Continental) खचदरी आहे आणि ती आठ ते अकरा किमी खोल आहे! ही खचदरी दरवर्षी दोन सेमी या वेगाने रुंद होत आहे. तिच्या आजूबाजूचा प्रदेश भूकंप प्रवण आहे. सरोवराचा उत्तर भाग ९०० मीटर आणि मधला व दक्षिण भाग अनुक्रमे १६०० आणि १४०० मीटर खोल आहे.

या सरोवरात एकूण २७ बेटे आहेत. सर्वात मोठे ओल्खोन हे ७२ किमी लांबीचे बेट आहे. सरोवरातील पाणी अतिशय स्वच्छ असल्यामुळे पाण्याची दृश्यमानताही (Visibility) चांगली आहे. वर्षातला मोठा काळ सरोवरावरून वादळी वारे वाहत असतात.

समृद्ध जैववैविध्य हे बैकलचे वैशिष्ट्य आहे. एक हजार प्रकारच्या वनस्पती आणि अडीच हजार प्रकारचे प्राणी या सरोवरात आढळून येतात. जानेवारी ते मे या दरम्यान बैकल सरोवर गोठलेल्या स्थितीत असते. या काळात सरोवरावरील बर्फाचा थर त्यावरून चालता येईल इतका घट्ट असतो. २४ हजार वर्षांपूर्वी सरोवराकाठी मानवी वस्ती असावी, असे सूचित करणारे काही मानवी अवशेष या भागात शास्त्रज्ञांना आढळले आहेत. या सरोवरामध्ये जगातील सर्वाधिक गोड्या पाण्याचा साठा आहे (२४ हजार घन किमी). इतर सरोवरांच्या तुलनेत केवळ कॅस्पियन समुद्राचे घनफळ बैकलपेक्षा अधिक आहे, परंतु कॅस्पियन समुद्रामधील पाणी खारे आहे. पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने बैकल सरोवराचा जगात तिसरा क्रमांक लागतो (सुपिरियर सरोवर व व्हिक्टोरिया सरोवरांखालोखाल). पृथ्वीवरील एकूण गोड्या पाण्यापैकी २० टक्के पाणी याच तलावात आहे.

या सरोवराच्या पश्चिम बाजूला, उत्तरेकडून लेना आणि अंगारा या नद्या, पश्चिमेकडून इरकुट व दक्षिणेकडून सेलांग आणि खिलोक या नद्या भरपूर पाण्याचा पुरवठा करतात. उत्तरेकडच्या भागातून अप्पर अंगारा नदीतून सरोवरातील पाणी बहिर्गमित होते. सरोवराच्या आग्नेय बाजूला ४० किमी रुंद सेलेंगा नदीचा एक विस्तृत गाळाचा त्रिभुज प्रदेश आढळून येतो.बैकल सरोवर हे जागतिक वारसा स्थळ आहे. सेलेंगा त्रिभुज प्रदेशातील पाणथळ प्रदेशांना (Wetlands) ‘रामसर’ पाणथळींचा दर्जा देण्यात आला आहे. बैकलच्या जवळजवळ सर्व बाजूंना डोंगर आहेत. ‘सैबेरियाचा मोती’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले बैकल सरोवर एक मोठे पर्यटनकेंद्र आहे. उन्हाळ्यामधील उबदार महिन्यांत येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. ऐतिहासिक चिनी पुस्तकांमध्ये बैकलचा उल्लेख उत्तरी समुद्र असा आढळतो. १६४३मध्ये पहिला रशियन शोधक बैकलपर्यंत पोचला, त्यापूर्वी युरोपीय लोकांना बैकलच्या अस्तित्वाची कल्पना नव्हती. १९व्या शतकाच्या अखेरीस बांधण्यात आलेल्या सैबेरियन रेल्वेमुळे पश्चिम रशियातून बैकलचा प्रवास करणे सुलभ झाले.

अमेरिकेच्या दृष्टीने जसे ‘ग्रँड कॅनियन’चे महत्त्व आहे, तसेच रशियाच्या दृष्टीने बैकल सरोवराचे महत्त्व आहे. सरोवर विज्ञान (Limnology), भूगर्भशास्त्र आणि हवामान बदलाचे पुरावे मिळण्याच्या दृष्टीनेही या सरोवराला खूपच महत्त्व आहे. पृथ्वीचा भूशास्त्रीय इतिहास समजण्याच्या दृष्टीने बैकल सरोवराच्या खचदरीलाही तितकेच महत्त्व आहे. या सरोवराने खचदरीसारखा प्रदेश व्यापला आहे आणि त्यात भरपूर गाळ साठला आहे. या गाळात हवामान बदलाचे अनेक पुरावे सतत सापडत असतात. ५४ अंश उत्तर अक्षांश असे उच्च अक्षांशात त्याचे स्थान असल्यामुळे हवामान बदलाच्या बाबतीत ते जास्त संवेदनशील आहे. यातील गाळात आत्तापर्यंत आजूबाजूच्या भागात होऊन गेलेल्या हिमानी क्रियेच्या (Glaciation) नोंदी व खुणा आजही आढळतात.

या सरोवराचे पाणी इतके गोड आणि स्वच्छ आहे, की यात असलेल्या जुन्या अश्मिभूत पदार्थांत कॅल्शियम कार्बोनेट शिल्लक राहिलेले अजिबात दिसत नाही. अतिशय खोल असूनही यात भरपूर प्राणवायू आहे. त्यामुळे अनेक जैविक निवास यात आढळून येतात. १९९३पासून सरोवरातील अवसादांत (Sediments) १०० मीटरपेक्षाही जास्त खोल जाणारी अंतरके किंवा नळकांडी (Cores) घुसवून केलेल्या निरीक्षणांतून, सरोवरातील गेल्या सात दशलक्ष वर्षांतील हवामान, पर्यावरण आणि भूशास्त्रीय घडामोडींबद्दल भरपूर माहिती मिळत आहे. यातून सरोवर आणि खचदरीचा सगळा इतिहासच उलगडू लागला आहे.

इथे जानेवारीच्या मध्यापासून एप्रिलच्या मध्यापर्यंतचा काळ थंडीचा काळ असतो. या काळात बर्फाचा थर १५० सेमी असतो आणि बर्फ एक मीटरपर्यंत पारदर्शक असतो. बर्फातील भेगा, बुडबुडे सहज दिसू शकतात. पर्यटक त्यावरून हलकी वाहने ओल्खोन, ओगोय आणि खुझहिर बेटांपर्यंत नेऊ शकतात.

ओमुल मासा अस्तंगत होणे, पुट्रिड अल्गीची वाढ, स्पाँज नष्ट होणे आणि विषारी व त्याज्य पदार्थात वाढ या बैकल सरोवराच्या सध्याच्या वाढत्या पर्यावरणीय समस्या आहेत. वाढत्या आणि अनिर्बंध पर्यटनामुळे या समस्यांत वेगाने वाढही होते आहे.

संबंधित बातम्या