झाडांचे ऋतू

गायत्री ओक
सोमवार, 16 मे 2022

अरण्यवाचन

अरण्यवाचन करताना झाडांना विसरून चालणार नाही; त्यांची थोडी तरी ओळख करून घ्यावीच लागेल. उदाहरणार्थ, किमान झाड कोठे आहे हे लक्षात ठेवले, तर एखादा पक्षी कोणत्या झाडावर दिसला हे तरी समजते. पायवाटांवर ‘लिहिलेले’ जसे आपण वाचायला शिकतोय, तशी झाडेसुद्धा निसर्गग्रंथाची पानेच आहेत.

आपण मागे पाहिलेच आहे की सगळी ज्ञानेंद्रिये जागी ठेवली की मग त्यांना जाणवलेल्या वेगवेगळ्या गोष्टींपासून अनुभव तयार होतात आणि त्या अनुभवांच्या आठवणी होतात. माणसाने प्रगती तर खूप केली, पण काही ज्ञानेंद्रियांचा आधीइतकाच तीव्रपणे वापर करणे कमी झाले आणि मग त्या ज्ञानेंद्रियापासून मिळणारे अनुभव मर्यादित झाले. पण जंगलाची मजा अनुभवायची असेल तर तसे करून चालत नाही. जंगलात गंधाची संवेदना वापरायला शिकायचे असेल तर थंडीनंतरचा ऋतू एकदम मस्त. थंडीनंतर आणि उन्हाळ्यात रंग आणि गंधाची मजा खूप अनुभवायला मिळते.

पानगळ झाल्यानंतरचा जंगलातला गंध अनुभवायचा प्रयत्न करा. जानेवारी-फेब्रुवारीनंतर या गंधांमध्ये भर पडत जाते. कुंभाची पांढरी धाग्यासारखी पुंकेसर असलेली मोठी फुले खाली पडतात, त्यांचा एक गडद असा वास असतो. फुलांवर माशा घोंघावताना दिसतात. खाली पडलेल्या फुलांवर मुंग्या दिसतात. 

अजून थोड्या दिवसांनी मोहाची पालवी आणि फुले अशी डबल लॉटरी लागते. मोहाची पाने नवीन येतात तेव्हा तांबूस, गडद आणि चकचकीत दिसतात. सगळीच पाने तशीच असल्याने आख्खे झाड तांबूस रंगाचे दिसायला लागते. याच काळात मोहाची फुले दिसतील. जमिनीच्या दिशेने झुकलेल्या कळ्या आणि कळीचे आवरण फोडून बाहेर येऊ पाहणारे मोहाचे फूल, ही अगदी ‘फोटोजेनिक’ गोष्ट आहे! याच काळात वेगवेगळ्या भागात मोह वेचण्याची लगबग सुरू होते. सकाळी लवकर बाहेर पडून ऊन येईपर्यंत लोक मोहाची फुले गोळा करताना दिसतात. गोडूस चवीच्या या फुलांपासून फक्त पेयच नाही, खायच्या गोष्टीसुद्धा छान होतात. मोहाच्या फुलांच्या दशम्यासुद्धा केल्या जातात. अंगणात वाळत पडलेल्या मोहाच्या फुलांचा वास घ्यायला अंगणापर्यंत जावे लागणारच नाही, अंगणाच्या बाजूने जातानाही येईलच तो!

याच काळात पिंपळाला, कुसुमला अशीच नवीन पालवी दिसते; तीही अशीच तांबूस, आणि आंब्याचीसुद्धा! आंब्याच्या अशा तांबूस पानाचा एखादा तुकडा तोडून हातावर घासला तर त्याचा वास कळेल. आंब्याच्या मोहोराचा वासही थंडीपासूनच सुरू होतो. त्यावरही खूप माश्या येतात. नंतर कैऱ्‍या धरतात, त्यांचा एक चिकटसा वास येत राहतो. 

पिंपळाची नवी पालवी उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल-मेच्या आसपास पारदर्शक पोपटी होते. उन्हाळ्यातल्या वाऱ्‍यांवर पिंपळ सळसळ करत असताना पाहा आणि ती सळसळ ऐका. 

करवंदे खायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात, पण करवंदांची पांढरी फुले फेब्रुवारी मार्चच्या सुमारास येतात. त्यांचा वास रानात भरून राहिलेला असतो. याशिवाय कुसर फुलांसारख्या रानटी फुलांच्या वेलींनासुद्धा याच सुमारास फुले येतात, त्यांचाही वास आवर्जून घ्यायला हवा. सावरीच्या फुलांमध्ये रंग आणि मध प्रॉमिनंट! खाली पडलेल्या सावरीच्या फुलाच्या तळाशी मध दिसेल पाहा. या मांसल फुलांची भाजीही मस्त होते. सावरीच्या फुलांच्या पाकळ्या खातानाही पक्षी दिसतील. 

होळीच्या अलीकडेच पळसाच्या फुलांचा बहर अगदी टिपेला असतो. या झाडांवर लक्ष ठेवायचे. या फुलांच्या रसासाठी यावर मोठ्या प्रमाणात पक्षी दिसतात. पळसाच्या बऱ्‍याच नंतर येतो तो म्हणजे बहाव्याचा बहर; यावरही मधमाश्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या दिसतील. पळसाच्याच पुढेमागे फुलायला लागतो लालभडक रंगाचा पांगारा. याला उन्हाळ्यात फुलांमुळे ओळखणे  शक्य आहे. नंतर कसे ओळखायचं? पानांचा आकार, खोडांवरील पांढरट हिरवट रेषा, यांमुळे पांगारा फुले नसतानाही ओळखता येईल. गुढी पाडवा होऊन कॅलेंडर अक्षय्य तृतीयेकडे सरकायला लागते त्या काळात साधारण पळसाला नवीन पाने यायला लागतात. पळसाच्या, मोहाच्या नवीन लहान पानांवरून हात फिरवला तर मखमली स्पर्श जाणवतो. हाच स्पर्श इतरही नव्या पानांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात जाणवेल. 

कहांडोळ किंवा घोस्ट ट्रीच्या फळांचा स्पर्श मखमली किंवा काहीसा मऊ असतो. या फळांवर लाल रंगाचे मऊ केस असतात. पांढऱ्‍या, छप्पे छप्पे असलेल्या घोस्ट ट्रीची पाने थंडीच्या आसपास गळतात, फुले येतात. आणि वसंताच्या सुमारास त्याच्या फांद्यांवर लाल रंगाची स्टारफिशच्या आकाराची फळे दिसायला लागतात. या फळांच्या बाहेरचा भाग पक्षी खातात असेही निरीक्षण आहे!

याच सुमारास ऐनाच्या झाडाचीही नवीन पालवी दिसायला लागते. हिरडा, बेहडा हे पण ऐनाच्याच कुळातले, पण यांना फळे साधारण थंडीच्या सुमारास येतात. ऐन हिरडा, बेहडा यांच्या कुळातल्या झाडांना ब्रशसारखी फुले येतात. पाडवा संपल्यावर ऐनाचीही नवीन पालवी यायला सुरुवात होते. हिरडा-बेहड्याला जरा लवकर म्हणजेच उन्हाळ्याच्या आधीच फुले-फळे येतात. प्राण्यांना याची फळे खूप आवडतात.

पाडव्यानंतरच्या काळात तुम्ही पश्चिम घाटात फिरलात तर अजून एका फुलाने नजर आणि गंध दोन्ही संवेदना जाग्या होतील. अंजनाची झाडं फुलांनी भरलेली दिसतील. निळ्या रंगाच्या बारीक फुलांच्या घोसाजवळ गेले तर मंद वास येत राहतो, आणि नंतर यालाच फळेही लगडायला लागतात. या फुलांवरही माश्या घोंगावताना दिसतात. पश्चिम घाटातल्या काही जंगलांमध्ये यांचेच राज्य आहे, ते भाग तर उन्हाळ्यात नक्की भेट द्यावेतच असे आहेत. माथेरानला खास अंजनासाठी चक्कर नक्की टाका. 

थंडीनंतरच्या काळात कोणत्याही जंगलात असलो तरी अशी रंग आणि गंधाची मजा अनुभवायला मिळतेच. त्या त्या भागानुसार प्रजाती वेगळ्या असतील, पण फुले-फळे तर नक्की पाहायला मिळतील. आपल्या आसपास असलेले झाडांचे बहर, फळे पाहून ठेवा! त्याला कोणकोणते पक्षी भेट देतायत ते बघून ठेवा!

संबंधित बातम्या