‘नवनिर्मितीचा ध्यास...’

सायली पानसे-शेल्लीकेरी
सोमवार, 18 एप्रिल 2022

संगीतगप्पा

सावनी रविंद्र हे संगीत क्षेत्रातले एक आजचे आघाडीचे नाव. घरी शास्त्रीय संगीताचं वातावरण असतानाही, सावनी मात्र सुगम संगीतामध्ये रमत गेली. कोण काय म्हणेल याचा विचार न करता, सतत नवनिर्मिती करणे हे तिचे वेगळेपण. अनेक पुरस्कारांची मानकरी असलेल्या सावनीला नुकताच ‘बार्डो’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

एखाद्या क्षेत्रात कामगिरी करावयाची असल्यास, ठरावीक टप्प्यांचा एक कच्चा आराखडा मनात तयार असावा लागतो; तसा तुझा होता का?
सावनी रविंद्र : कुठलीच गोष्ट ठरवून केलेली मला आवडत नाही, कारण बरेचदा स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवल्या आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर अपेक्षाभंग होतो. येईल त्या दिवसाचं आणि संधीचं सोनं करायचं, एवढाच प्रयत्न मी करते. घरात संगीताचं वातावरण असणं ही एक खूप मोठी गोष्ट असते आणि मी त्या बाबतीत भाग्यवान होते, की मी गाणं घेऊनच जन्माला आले. घरात शास्त्रीय संगीताचं वातावरण होतं, पण माझा कल सुगम संगीताकडे जास्त होता. शास्त्रीय संगीताचा पाया पक्का करत जमेल तसं लपूनछपून मी चित्रपट संगीत ऐकत असे. ते ऐकताना मी सुगम संगीतामध्ये जास्त रमत होते, असं लक्षात आलं. आई वडिलांनी अर्थातच त्याला पुरेपूर पाठिंबा दिला. ‘आम्ही जे गातो, तेच तू गायला पाहिजेस,’ अशी जबरदस्ती त्यांनी मला कधी केली नाही; त्याउलट मला सुगम संगीत क्षेत्रात काम करता यावं या दृष्टीनं त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले. सुदैवानं आमच्या घरात माझ्या लहानपणापासून खूप मोठे मोठे कलाकार येत असत. यशवंत देव, श्रीनिवास खळे यांसारख्या दिग्गज कलाकारांना मला भेटता आलं, अनेक वेळा त्यांचा जवळून सहवास मिळाला. त्यांच्याशी खूप जवळचं नातं निर्माण झालं आणि योग्य दिशा मिळत गेली.

तुझ्या बरोबरच्या इतर कलाकारांपेक्षा तुझं वेगळं स्थान तू निर्माण केलंस, ते कशामुळे?
सावनी रविंद्र : मला वाटतं, सतत नवीन निर्मिती करण्याचा माझा प्रयत्न हेच माझं वेगळेपण होतं. नवीन केलेलं गाणं किंवा नवीन आखलेला कार्यक्रम लोकांना रुचेल, पटेल याची चिंता न करता वेगवेगळ्या प्रकारचे धोके पत्करत मी नवनिर्मिती करत राहिले. कुठला तरी संगीतकार मला कधीतरी गाणं देईल याची वाट न बघता मी माझ्या यूट्युब सीरीज करत गेले. सतत नवीन काही तरी ठरवून स्वतःला आव्हान देण्याचा माझा स्वभाव आहे. याचमुळे वेगवेगळ्या भाषेत गायलेली गाणी आणि अनेक कार्यक्रमांची निर्मिती माझ्याकडून झाली.

या प्रवासात कधी कुठल्या चुका घडल्या का?
सावनी रविंद्र : माणूस म्हटलं की चुका आल्याच. माझ्याकडूनही अनेक चुका झाल्या, किंबहुना अनेक चुका मी परत परतदेखील केल्या आहेत. त्या वेळी त्या चुकांचं वाईट वाटलं, पण आता वाटतं त्या चुका झाल्या ते चांगलंच झालं. कारण त्या प्रत्येक अनुभवातून मी नवीन काहीतरी शिकत गेले आणि एक माणूस आणि कलाकार म्हणून एक पायरी पुढे जात गेले. अनेक वेळा नवीन गाणं रेकॉर्ड करताना मनासारखं गाता येत नाही. विशेषतः वेगळ्या भाषेत गात असताना त्या भाषेचे उच्चार, शैली पटकन जमत नाही. रेकॉर्डिंगच्या तीन तासांत शंभर टक्के गाता आलं नाही की खूप वाईट वाटतं. पण ते सोडून न देता, नव्या जोमानं सुरुवात करून गाणं मनासारखं झालं की छान वाटतं. 

मनाच्या कप्प्यात साठवून ठेवावेत, असे कुठले प्रसंग...? 
सावनी रविंद्र : कलाकार असल्यामुळे अनेक अनुभव आणि त्यातून येणाऱ्या सुंदर आठवणी आणि प्रसंग सांगण्यासारखे आहेत. त्यातली एक आठवण सांगते. मी माझ्या सांगीतिक प्रवासात स्पर्धांमध्ये खूप कमी वेळा भाग घेतला. एक स्पर्धा होती ‘कलांगण’ संस्थेची, ज्यामध्ये एकोणीसशे सत्तरच्या आधीची गाणी म्हणायची होती. मी तीन गाणी निवडली होती, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘खेड्यामधले घर कौलारू’ आणि ‘श्रावणात घन निळा बरसला’. माझ्या आयुष्यात असा योग आला की स्पर्धेच्याच दिवशी सकाळी मी आशाताईंना भेटले. त्यांच्या घरी आम्ही संगीताविषयी गप्पा मारत होतो. अर्थातच माझं काही कळायचं वय नव्हतं, पण आता ते आठवून त्याचे अर्थ उमगतात. त्यावेळी आईनं त्यांना माझ्या स्पर्धेबद्दल सांगितलं. मला जवळ घेऊन त्या म्हणाल्या, ‘बाळा, एक लक्षात ठेव, गायिका म्हणून तुला सिद्ध व्हायचं असेल, स्वतःला कधी कुठलं आव्हान द्यायचं असेल तर तू नेहमी दीदीची गाणी गा. ती गाणी गाऊन तू खूप मोठी होशील. त्या गाण्यांमधून तुला बरंच काही समजेल.’ पुढे त्या म्हणाल्या, ‘बघ हं, आज परीक्षक तुला दीदीचंच गाणं गायला सांगतील, आणि दीदीचं गाणं गाऊनच तुला बक्षीस मिळेल,’ आणि तेच खरं ठरलं. ‘श्रावणात घन निळा’ गाऊनच मी स्पर्धा जिंकली. तो दिवस, ते सर्व क्षण आयुष्यभर पुरतील असे आहेत. 

तुझ्यात अनेक चांगले गुण आहेत, तसे कुठले दोष आहेत का?
सावनी रविंद्र : बरेच आहेत खरं तर, पण माझा एक चांगला गुणच वाईट ठरतो, त्याबद्दल सांगते. मी खूप भावनिक आहे. मी खूप बारीकसारीक गोष्टी मनावर घेते, ज्यानं मला खूप त्रास होतो. 

कुठला प्रसंग तुला परत अनुभवावासा वाटतो? 
सावनी रविंद्र : राष्ट्रीय पारितोषिक मिळालेला प्रसंग माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. तो अनुभव परत परत मिळावा असं नक्कीच वाटतं आणि म्हणूनच त्या दिशेनं माझा यापुढे कायम प्रयत्न असेल. 

अशी कुठली एखादी गोष्ट आहे, जी तुला काळात मागे जाऊन बदलावीशी वाटते?
सावनी रविंद्र : नाही मला असं काहीच बदलावसं वाटत नाही. कारण ज्या गोष्टी घडल्या त्यातून मी काहीतरी शिकत गेले आणि माणूस म्हणून पुढचा टप्पा गाठत गेले. कुठल्याच घडून गेलेल्या गोष्टींबद्दल मला खंत नाही किंवा चुकीचं वागल्याचं किंवा वाईट गायल्याचं दुःख नाही. कारण शेवटी तो प्रवास आहे आणि त्या प्रवासामधूनच मी शिकत गेले. 

तुझ्या बरोबरच्या वादक कलाकारांबद्दल काय सांगशील?
सावनी रविंद्र : संगीताचा कार्यक्रम करणं हे एक टीमवर्क आहे. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात वादकांचा खूप मोठा सहभाग असतो. एक वेगळं नातं त्यांच्याशी जोडलं जातं, एक कलाकार म्हणूनही आणि खासगी आयुष्यात एक मित्र म्हणूनही. पुण्यातल्या वादकांचा एक आणि मुंबईतल्या वादकांचा एक, असे माझे हक्काचे दोन संच आहेत. माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्यांचा अमूल्य सहभाग असतो. परदेशात कधीतरी जेव्हा ट्रॅकवर कार्यक्रम करायची विनंती होते, तेव्हा मीही आवर्जून तसा कार्यक्रम करायचा टाळते, कारण ट्रॅकवर गाण्यात तो आनंद नक्कीच मिळत नाही. त्यात विचारांची सांगीतिक देवाण-घेवाण होत नाही. लोकांना गायकाचा चेहरा दिसतो, पण एखादा कार्यक्रम यशस्वी होतो तेव्हा त्यात वादकांचा खूप मोठा आणि मोलाचा सहभाग असतो. वादकांच्या संदर्भातला एक किस्सा सांगते. काही वर्षांपूर्वी मी ‘सावनी अनप्लग्ड’ असा कार्यक्रम केला. त्यावेळी ‘अनप्लग्ड’ ही संकल्पना नवीन होती. मी ती यूट्युब सीरीजपासून सुरू केली आणि त्यातूनच या कार्यक्रमाची निर्मिती झाली. सुदैवानं पहिल्याच कार्यक्रमात पं. हृदयनाथ मंगेशकर उपस्थित होते. त्यांना कार्यक्रम तर आवडलाच, पण वादकांचं त्यांनी विशेष कौतुक केलं. प्रत्येक वादकाला त्यांनी दोन हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. एखादं मूळ गाणं वेगळ्या प्रकारे सादर करण्यात माझा जेवढा कस लागतो, तेवढाच किंबहुना थोडा जास्त वादकांचा लागतो; ते त्यांनी अचूक हेरलं आणि सगळ्यांना पाठीवर कौतुकाची थाप दिली. 

सोशल मीडियाला तुझ्या आयुष्यात किती स्थान आहे?
सावनी रविंद्र : मी सोशल मीडिया माझ्या सगळ्या प्रोजेक्टच्या प्रसिद्धीसाठी वापरते. त्याचा फायदा नक्कीच होतो, पण लोकांना तिथे काहीही बोलण्याची मुभा मिळते, त्याचा कधीतरी त्रासही होतो. माझे अनेक फॅन क्लब आहेत, त्यांचा मी मनापासून आनंद घेते. लोकांचं प्रेम आणि कौतुक बघून एक प्रकारचा हुरूप येतो. सगळ्या चाहत्यांना काय नवीन देता येईल याचा सतत विचार केला जातो. 

या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या मुलांना काय सल्ला देशील?
सावनी रविंद्र : आजकाल मिळणाऱ्या झटपट प्रसिद्धीमुळे अनेक मुलांची दिशाभूल होते. अनेक लोकांनी आपला व्हिडिओ पाहिला हे यशाचं समीकरण असू शकत नाही. शास्त्रोक्त पद्धतीनं अनेक वर्षं गुरूंकडे रीतसर शिक्षण घ्यायला पाहिजे. मेहनत केली पाहिजे, साधना केली पाहिजे. गुरुप्रति समर्पण भाव असल्याशिवाय विद्या येत नाही, आणि त्या समर्पण भावात वेगळा आनंद आहे. तो सांगेल त्या वाटेवर चालत राहण्यात आनंद आहे, त्याचा अनुभव प्रत्येक गायकानं घ्यायला हवा. आजकालच्या काळात त्याचं महत्त्व कमी होत आहे, पण ते चुकीचं आहे याचं भान प्रत्येकानं ठेवायला हवं.

संबंधित बातम्या