‘केवळ प्रसिद्धीसाठी संगीताचा वापर नको’

सायली पानसे-शेल्लीकेरी
सोमवार, 2 मे 2022

संगीतगप्पा

संगीत क्षेत्रातला एक उत्कृष्ट वादक, ज्याने प्रत्येक घरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. संगीताचा कुठलाही कार्यक्रम असला तरी स्वतःचा वेगळा ठसा उमटवल्याशिवाय त्याचा कुठलाही कार्यक्रम पूर्ण होत नाही... हा कलाकार म्हणजे प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक!

लहानपणापासून तुझं शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू झालं, तरी तुझं काम मुख्यतः सुगम संगीत क्षेत्रात आहे. असं तू जाणूनबुजून केलंस की तुला तेच क्षेत्र जास्त भावतं? 
अमर ओक ः मी खरं म्हणजे पाचव्या सहाव्या वर्षापासून शिकायला सुरुवात केली. आमच्या घरात तसं संगीत होतंच. माझे आजोबा गायचे आणि दोन काका उत्तम सतार वाजवायचे. माझे वडील बासरी शिकत होते, आणि त्यांच्यामुळे मीही शिकायला जायला लागलो. तेव्हा मी उभी बासरी वाजवायचो. साधारण दहावीच्या आसपास मला आडवी बासरी पहिल्यांदा वाजवायला मिळाली. मी बारावीत असताना मला एका ऑर्केस्ट्रामध्ये वाजवायची संधी मिळाली. सुदैवानं मला लहानपणापासून नोटेशनची चांगली समज होती, त्यामुळं त्याचा फायदा सुगम संगीत वाजवताना झाला. आपण लोकांसमोर सादरीकरण करतो आहोत, टाळ्या मिळत आहेत, कौतुक होत आहे, या सगळ्याची त्या लहान वयात मजा वाटू लागली आणि ते आवडायला लागलं. हळूहळू जम बसत गेला आणि अनेक कार्यक्रमांतून मी वाजवायला लागलो... असा माझा सुगम संगीताचा प्रवास आपोआप सुरू झाला.

 रंगमंचावरचा कुठला गमतीशीर किस्सा आठवतो का? 
अमर ओक ः रंगमंचावरचा नाही, पण लहान वयातला एक किस्सा सांगतो. नवीन नवीन बासरी शिकत होतो तेव्हा हरीजी (पं. हरिप्रसाद चौरसिया) एकदा पुण्यात आले होते. आमच्या ओळखीच्या एक बाई मला त्यांना भेटायला घेऊन गेल्या. मला त्यावेळी हरीजी कोण आहेत काहीच कल्पना नव्हती. मी म्हणजे हाफ चड्डीतला शाळकरी मुलगा होतो. आम्ही भर दुपारी त्यांना भेटायला गेलो. आमचं स्वागत करत त्यांनी माझी चौकशी केली, ‘अच्छा बांसुरी सीखते हो? कितने राग आतें है?’ या त्यांच्या प्रश्नावर मी ‘सात आठ राग तो आते हैं!’ असं उत्तर दिलं. अजूनही त्यांचे शब्द  माझ्या लक्षात आहेत, ‘हमें तो एक राग सीखने में बीस बरस लग गए और आपको सात आठ राग आते हैं?’
 आरोह, अवरोह, बंदिश, पाच छोट्या आणि पाच मोठ्या ताना आल्या की ‘राग’ आला, एवढं शिकायला वीस वर्षं लागतातच कशी? हे मात्र मला त्या लहान वयात कळेना.

तुझ्यात आणि तुझ्या बरोबरच्या इतर बासरी वादकांमधला कुठला फरक सांगशील?
अमर ओक ः मला वाटतं प्रत्येक वादकाची एक वेगळी ओळख आहे. माझ्या यशाचं श्रेय मी माझ्या नशिबाला देईन, कारण योग्य वेळी योग्य जागेवर मी उपस्थित होतो. ‘सारेगमप’ किंवा ‘सूर-ताल’सारखे कार्यक्रम करताना माझी निवड झाली, आणि सातत्याने माझा चेहरा लोकांसमोर येऊ लागला. ‘सारेगमप’ या कार्यक्रमाच्या जवळ जवळ चौदा पर्वांमध्ये मी बासरी वाजवली. दुसऱ्या तिसऱ्या पर्वानंतर वादक घराघरात पोहोचायला लागले तसा मीही घराघरात पोहोचलो.

तुझ्या सहवादकांबरोबर एक संच म्हणून तू खूप काम केलं आहेस, त्यांच्याबरोबरचे काही अनुभव ऐकायला आवडतील. 
अमर ओक ः ‘सारेगमप’च्या सेटवरचे अनेक चांगले किस्से आहेत. पूर्वी ‘सारेगमप’च्या रिहर्सलला फक्त दोन वादक असायचे. इतर सर्व वादक फक्त शूटिंगच्या दिवशी यायचे. त्यामुळे वादकांना सर्व गाणी आणि एडिट केलेलं म्युझिक हे शूटिंगच्या दिवशीच कळायचं. आमचा कीबोर्डवादक सत्यजीत प्रभू इतकं तंतोतंत आणि बारीक-सारिक लिहून ठेवायचा की आम्हाला म्युझिक ऐनवेळी कळूनही आम्हाला ते वाजवता यायचं. तो हे काम इतकं चोख करायचा की वादकांकडून कधीच कुठली चूक व्हायची नाही. त्याचा अजून एक चांगला अनुभव म्हणजे म्युझिक एडिट करताना सर्व वादकांना समान संधी मिळेल असा त्याचा कायम प्रयत्न असायचा. खरं म्हणजे तो कीबोर्ड वाजवत असल्याने प्रत्येक म्युझिक तो स्वतः सहज वाजवू शकत होता, पण एक संच म्हणून काय चांगलं वाटेल याचाच त्यानं कायम विचार केला. आमचा अजून एक वादक निलेश परब; हा असा वादक आहे की तो आपल्या सहवादकांवर जिवापाड प्रेम करतो. अर्चीस लेले, दत्ता तावडे, मनीष कुलकर्णी हे सगळी लोक माझ्या परिवारासारखे आहेत. एक काळ असा होता की आम्ही स्वतःच्या घरी कमी आणि एकमेकांसोबत जास्त वेळ असायचो. त्यामुळे आमचा स्वभाव आमच्या घरच्यांपेक्षाही एकमेकांना जास्त चांगला माहीत आहे. 

कायम स्मरणात राहावी अशी कुठली आठवण सांगशील?
अमर ओक ः अशा आठवणी तर खूप आहेत, पण मला माझ्या गुरुजींची, केदार बोडस यांची, आठवण सांगावीशी वाटते. माझ्या ‘अमर बंसी’ या कार्यक्रमाच्या दीडशेव्या कार्यक्रमाला ते आले होते. मी तेव्हा त्यांना विनंती केली की थोडा वेळ तरी त्यांनी कार्यक्रम ऐकावा. त्यांनी कार्यक्रम ऐकला आणि भरभरून कौतुक केलं. त्यांचं एक वाक्य मला फार आवडलं. ते म्हणाले, ‘इनको जब बजाते हुए देखा तो ऐसा लगा मैं मेरी फोटो खुद देख रहा हूँ।’ मला त्यांचं हे वाक्य कुठल्या पुरस्कारापेक्षाही मोठं वाटतं. तसंच बाबुजी, म्हणजे सुधीर फडके आमच्या एका कार्यक्रमाला आले होते. ते मध्यंतरामध्ये मला शोधत आले, आणि मला म्हणाले, ‘आज सगळ्यात जास्त टाळ्या तुम्ही मिळवल्या बरं का!’ अशा आठवणी फार आनंद देऊन जातात. 

या प्रवासात कधी कुठल्या चुका घडल्या का?
अमर ओक ः मी सन २०००मध्ये अमेरिका आणि कॅनडाच्या दौऱ्यावर गेलो होतो. तिथं माझे काही मित्र भेटले, ज्यांनी माझ्याबरोबर पदवी मिळवली होती आणि आता पदव्युत्तर शिक्षण घेऊन तिकडं स्थायी झाले होते. त्यांची, घरं, गाड्या, पॅकेज ऐकून मला वाटलं, मी का यांच्यासारखं आयुष्य जगायचं नाही? कलाकार म्हणून माझ्या मिळकतीत स्थैर्यही नव्हतं आणि अनिश्चितताही होती. ‘खरं म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर लाखो आहेत, कलाकार एकच असतो,’ हे इतरांनी सांगूनही मला ते पटलं नाही आणि मी ही पदव्युत्तर शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, दोन वर्षं अभ्यास केला आणि तो करता करता लक्षात आलं की हे दहा ते सहा नोकरी करण्याची माझी मानसिकता नाही आणि मी कलाकार म्हणूनच उत्तम आहे.

प्रत्येक कलाकाराच्या सांगीतिक कारकिर्दीत चढ-उतार असतात. तुझ्या आयुष्यात असा कुठला उतार तू अनुभवलास?
अमर ओक ः माझी आई गेली तेव्हा मला खूप त्रास झाला आणि त्या दुःखातून बाहेर पडायला काही काळ गेला. त्याच काळात पुढचे तीन-चार महिने माझे कार्यक्रम खूप कमी झाले. मला त्रास होऊ नये म्हणून, का घरी वेळ देता यावा म्हणून माहीत नाही, 
पण मला तेव्हा काम नव्हतं. कलाकाराला काम नसणं किंवा मनासारखं काम नसणं याचा काय त्रास होतो, याचा अनुभव मी तेव्हा घेतला. 

रीअॅलीटी शोमध्ये अनेक वेळा तू स्पर्धकांना वाहवा देताना दिसतोस, ती दाद कितपत खरी असते? का कॅमेरासाठी दाद द्यावीच लागते?
अमर ओक ः खरं सांगयचं तर सुदैवानं आमच्यावर कॅमेरा असतो तेव्हा आम्ही वाजवत असतो, त्यामुळे कॅमेऱ्यासाठी दाद द्यायची असं होत नाही. हां, लाइव्ह कार्यक्रमात कधी तरी ठरवून दाद द्यावी लागते, पण त्यामागचा भाव आणि उद्देश चांगला असतो हे नक्की. आपण दाद दिल्यामुळे गायकाचा आत्मविश्वास वाढत असेल आणि त्याला चांगलं वाटून तो बरं गात असेल तर ती दाद महत्त्वाची आहे, नाही का?

या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवीन मुलांना काय सल्ला देशील?
अमर ओक ः अभिषेकी बुवांनी दिलेलं उत्तर मला इथं द्यावंसं वाटतं. ते म्हणत, ‘संगीत म्हणजे एक गोरख धंदा आहे. ज्यांना पैसा, प्रसिद्धीसारख्या ऐहिक गोष्टींमध्ये रस आहे, त्यांनी या संगीतात पडूच नये.’ आजकालच्या खूप मुलांना मी प्रसिद्धीच्या मागे धावताना बघतो. पैसेच मिळवायचे असतील तर इतर अनेक उद्योग आहेत नं! माझे गुरुजी म्हणतात, ‘आजकाल आपण संगीत स्वार्थासाठी वापरतो.’ पैसा कमवायला, प्रसिद्धीसाठी किंवा टाळ्या मिळवायला ते वापरलं जातं, हे चुकीचं आहे. हा विचार मनात ठसायला वेळ लागेल, पण निदान तो प्रयत्न तरी असायला हवा!

संबंधित बातम्या