‘गाण्यातच करिअर करायची इच्छा होती...’

सायली पानसे-शेल्लीकेरी
सोमवार, 18 जुलै 2022

पुण्यातला एक आघाडीचा गायक कलाकार... ज्याचा आवाज अनेक कार्यक्रमांमधून आणि चित्रपट गीतांमधून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. भारतातच नाही तर भारताबाहेरही ज्याची ख्याती पसरलेली आहे, अशा हृषिकेश रानडेबरोबर मारलेल्या गप्पा...

करिअर म्हणून संगीत क्षेत्र निवडणं हा विशेषतः मुलांसाठी अवघड निर्णय असू शकतो. तुझ्यासाठी तो निर्णय कितपत अवघड होता?
हृषिकेश रानडे : सुदैवाने हा निर्णय माझ्यासाठी खूप सोपा होता. आमच्या घरात अतिशय मोकळं वातावरण होतं. आई वडिलांनी अमुक कर किंवा करू नकोस अशी कुठल्याच प्रकारची चर्चा माझ्याशी कधीच केली नाही. त्याचं मुख्य कारण असं की मुळात घरी संगीताचंच वातावरण होतं. माझे वडील प्रमोद रानडे व्हायोलिन वाजवतात, गातात. तसंच माझा काकाही संगीत क्षेत्रात होता. त्याचा स्टुडिओ आहे, तो एक उत्तम संगीतकार होता. त्यामुळे गाण्याचे संस्कार खूप लहानपणापासून झाले. हे सगळं अनुभवताना साधारण सातवी-आठवीत मलाही गाण्यातच काही तरी करायची इच्छा निर्माण झाली होती. दहावी होईपर्यंत संगीतातच काम करायचं हा निर्णय पक्का झाला. शिवाय मला विविध भाषांमध्येही रस होता आणि म्हणूनच दहावीनंतर मी कला क्षेत्र निवडलं, ज्यामुळे या क्षेत्रात काम करायला खूप वेळ मिळाला. 

तुझा कुठला गुण तुला इतर गायकांपासून वेगळा ठरवतो?
हृषिकेश रानडे : माझे गुरू पं. शेखर कुंभोजकर आणि पं. विजय कोपरकर किंवा माझे वडील या सगळ्यांकडून मी ज्या ज्या गोष्टी शिकलो, त्यावर मी ठाम राहण्याचा प्रयत्न केला. उदा. सुगम संगीत गाताना उच्चार असोत किंवा भावनांची अभिव्यक्ती असो, त्याकडे मी पुरेपूर लक्ष देतो. पार्श्वगायन करायला लागल्यापासून गेल्या दहा बारा वर्षांत अनेक संगीतकारांकडे मी गायलो, त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो. गेल्या अनेक वर्षांत एक गोष्ट मी एकसारखी ठेवायचा प्रयत्न केला, तो म्हणजे माझ्या आवाजाचा पोत. अजून एक गोष्ट म्हणजे, मी ज्या गाण्यात रमतो आणि मला जे गायला आवडतं तेच आणि तेवढंच मी गातो. गाणं अष्टपैलू असावं किंवा प्रत्येक प्रकार गाता यावा, म्हणून मी तो गाऊन बघितला; त्याचा अट्टहास करण्याचं मात्र मी टाळलं. 

तुझ्या सांगीतिक कारकिर्दीचा आलेख कायम वर जाताना आम्ही बघितला आहे. पण तो कधीतरी खालीही जात असेल, ज्याचा साक्षीदार केवळ तू असतोस. असा कुठला अनुभव आठवतो का?
हृषिकेश रानडे : असे एक नाही तर दोन-तीन टप्पे मला आठवतात. अगदी सुरुवातीला जेव्हा मी २००१मध्ये हिंदी सारेगमप या स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला; तेव्हा तो माहोल, ते वादक सगळंच माझ्यासाठी नवीन होतं. त्यांच्याशी जुळवून घेताना पहिल्या तीन फेऱ्यांनंतरच मी बाद झालो होतो. खूप उत्साहात मी गेलो आणि खूप लवकर तिथून बाहेर पडलो. सगळ्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि माझी कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती. आपला निर्णय योग्य आहे का नाही असं वाटून गेलं आणि त्या सगळ्याचं अर्थातच मला खूप वाईट वाटलं, पण तिथून वेगळा प्रवास सुरू झाला. परत सारेगमपमध्ये भाग घेतला, त्यात मी चांगला गायलो, जिंकलो. त्यानंतर पार्श्वगायन सुरू झालं. एक नवीन ओळख मला मिळाली. त्यानंतर २०१२मध्ये मला ‘पाऊलवाट’ या चित्रपटासाठी नरेंद्र भिडे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली एक गाणं गायची संधी मिळाली. दुर्दैवाने त्या वर्षात मला आवाजाचा खूप त्रास झाला. जवळ जवळ सहा-सात महिने आवाज पूर्ववत झाला नाही. गायला लागलं की आवाज थकायचा. नरेंद्र जवळ जवळ तीन महिने माझ्यासाठी थांबला आणि शेवटी मला ती संधी गमवावी लागली. त्या काळात आवाजामुळे अशी तीन-चार चित्रपटातली गाणी मला सोडावी लागली. कारकीर्द चांगली चालू असताना असं सात आठ महिने गाता न आल्यानं खूप वाईट वाटलं आणि त्याचा मानसिक त्रास झाला. 

संगीत क्षेत्रातली अशी कुठली गोष्ट आहे, जी तुला करायची आहे आणि अजून तशी संधी मिळालेली नाही?
हृषिकेश रानडे : अशा अनेक गोष्टी असतात मनात ज्या राहून जातात.  
वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपटात मी गीतं गायली, पण कलाकार म्हणून तेवढ्यानंच माझं समाधान होत नाही. अनेक चांगल्या चित्रपटांसाठी मी गायलो आहे, पण माझी एक मनापासून इच्छा आहे की या पार्श्वगायनाबरोबर एखाद्या चित्रपटासाठी मला संगीत देता यावं. संगीत देण्याकडे खूप पूर्वीपासून माझा कल असायचा. गेल्या काही वर्षांत मी त्याकडे विशेष लक्षही देत आहे. मी काही गाणी संगीतबद्धही केली आहेत. त्याचे दोन अल्बम आहेत. मालिकेसाठी दोन गाणी केली आहेत. काम चालू आहे. अशा अजून अनेक संधी मिळाव्यात, अशी मनापासून इच्छा आहे.

गायक आणि संगीतकार अशा दोन भूमिका तू करतोस. जास्त कशात रमतोस?
हृषिकेश रानडे :  मी गाण्यात नक्कीच अधिक रमतो, कारण गेली पंधरा वीस वर्षं मी तेच करत आलो आहे. गाण्यातून मला भावना अधिक चांगल्या प्रकारे मांडता येतात आणि मी मोकळेपणानं नवीन गोष्टी करून बघू शकतो, कारण त्याचा अनुभव मला जास्त आहे.

स्वतःच्या गाण्याचे व्हिडिओ करण्याचा सध्या ट्रेंड आहे. एक कलाकार म्हणून त्याचा काय फायदा होतो?
हृषिकेश रानडे : मला असं वाटतं, की गेल्या काही वर्षांत सामाजिक माध्यमांमुळे लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांची पसंती मिळवणं खूप सोपं झालं आहे. खूप खर्च करूनही व्हिडिओ करता येतो आणि वेगवेगळ्या युक्त्या वापरून कमी खर्चातही व्हिडिओ करता येतो. यामुळे त्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे, की रोजच अनेक नवीन गाणी आणि अनेक व्हिडिओ येत असतात. दुर्दैवाने आज व्हिडिओ नसेल तर गाणं तेवढं ऐकलं जात नाही आणि म्हणूनच कुठल्याही गाण्याचा व्हिडिओ करणं क्रमप्राप्त झालं आहे. गाणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा उपयोग नक्कीच होतो आणि त्याहीपेक्षा ती आता काळाची गरज झाली आहे. 

तुझी जोडीदार, प्राजक्ताही प्रसिद्ध गायिका आहे. घरात दोघं कलाकार असल्याचे कोणते फायदे तोटे तुला जाणवतात?
हृषिकेश रानडे : खरं सांगायचं तर मला फायदाच अधिक जाणवतो. आम्ही दोघांनी जवळ जवळ एकाच वेळी आपापल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती; किंबहुना गाण्यामुळेच आमची ओळख झाली. एकमेकांच्या मदतीनं आम्ही एक एक पाऊल पुढं टाकत गेलो. एकमेकांच्या कलाकृतींबद्दल आम्ही कायम खरं आणि स्पष्ट मत देत असतो. नुसतं कौतुक न करता नक्की काय चुकलं आणि कशावर अधिक काम करायला पाहिजे हे आम्ही वाईट वाटून न घेता एकमेकांना सांगत असतो. दुसरं म्हणजे एकमेकांचा दिनक्रम समजून घ्यायला आणि कलाकार म्हणून एकमेकांची मानसिकता समजून घ्यायलाही मदत होते. तोटा मला एकच आठवतो की आमची मुलगी अनुष्का लहान असताना दोघांनाही दौऱ्यावर जायची वेळ आली, की कुणा एकाला घरी थांबावं लागे आणि बहुतेक वेळा प्राजक्ता घरी थांबत असे. तिनं कायम ती जबाबदारी घेतली आणि म्हणून मी मोठ्या आणि लांबच्या दौऱ्यांवर जाऊ शकलो. 

एखादं सांगीतिक काम आल्यास, प्राजक्तालाच घेऊन ते काम करण्याची कधी सक्ती होते का? 
हृषिकेश रानडे : असं नाही होत. आम्हा दोघांपैकी कुणालाही कार्यक्रम आला, तरी तो काय धाटणीचा कार्यक्रम आहे आणि कोणता गायक त्या कार्यक्रमासाठी योग्य असेल हा विचार आम्ही दोघं करतो. प्रत्येक कार्यक्रम दोघांनीच करायला पाहिजे असं मत आमचं नसतं आणि दोघंही ते समजू शकतो. शिवाय कधीतरी दोघांनाही एकावेळी घराबाहेर राहणंही अवघड असतं.  

तुझे वडील, प्रमोद रानडे यांच्याकडून तू संगीत शिकलास; आता तू तुझ्या मुलीला, अनुष्काला गाणं शिकवतोस. या दोन्ही शिकवण्यांमध्ये कुठला फरक तुला प्रकर्षानं जाणवतो?
हृषिकेश रानडे : नक्कीच फरक जाणवतो. मी बाबांकडून पंचवीस वर्षांपूर्वी गाणं शिकलो. तेव्हाच्या काळात मुबलक वेळ असायचा. पण सध्याच्या जीवनशैलीमुळं आत्ताची पिढी इतकी बीझी झाली आहे की काही शिकवायचं असल्यास खूप आधी ठरवून वेळ काढावा लागतो. त्याचं अजून एक कारण मला असं वाटतं, की एकूणच आपल्या आयुष्याला इतकी गती प्राप्त झाली आहे की कशासाठी वेळच मिळत नाही. मी गाणं शिकलो तेव्हा आई-वडील सांगतील त्या वेळी मुकाटपणे रियाजाला बसण्याला पर्याय नव्हता. दुसरं म्हणजे आता मुलांचं लक्ष विचलीत करायला अनेक गोष्टी इतक्या सहज उपलब्ध असतात, की मुलांना एकेठिकाणी बसवून काहीतरी शिकवणं जास्त अवघड झालं आहे. शिवाय आत्ताची मुलं इतकी हुशार आहेत की त्यांना गोष्टी खूप सहज आणि लवकर लक्षात येतात. कुठलीही गोष्ट ते लगेच शिकतात. यामुळे त्यांचं मन खूप पटकन पुढं पुढं धावत राहतं. चालू क्षणात ते फार वेळ रमत नाहीत. 

आजकाल प्रतिभा जेवढी महत्त्वाची आहे, तेवढंच महत्त्वाच्या आहेत ओळखी (PR), सध्याच्या काळात मार्केटिंगचं काय महत्त्व सांगशील?
हृषिकेश रानडे : माझ्या लेखी खूप महत्त्व आहे. कलाकार उत्तम असला तरी त्याच्याकडे संवाद कौशल्य असेलच असं नाही. शिवाय जर तो कार्यक्रमात खूप व्यग्र असेल आणि त्याची इतर मार्केटिंगची कामं कुणी करत असेल तर ती खूप मोठी सोय होते. फक्त मार्केटिंग करण्यापूर्वी आपण कलाकार म्हणून भक्कम आहोत याची खात्री असायला हवी, कारण नुसत्या मार्केटिंगवर कार्यक्रम मिळवत राहणं, हे फार काळ टिकत नाही. 

एक कलाकार म्हणून कोणत्या बाबतीत तुला असुरक्षितता वाटते?
हृषिकेश रानडे : एक गोष्ट मला वाटते जी मी आधीही बोललो; दर चार वर्षांनी जी पिढी पुढे येते ती खूप हुशार आहे, मग ते कला क्षेत्र असेल, तंत्रज्ञान असेल किंवा इतर काही. ती पिढी बदलांसाठी खूप अनुकूल आहे, सजग आहे आणि म्हणून ती खूप पटापट पुढं जाते. तर अशा नवीन मुलांच्या बरोबरीनं काम करणं मला खूप आव्हानात्मक वाटतं. पूर्वीच्या मानानं आजकाल दर दोन-तीन वर्षांत प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा कल बदलतो, तो बदल सहज स्वीकारून पुढं जाणं म्हणावं तितकं सोपं नाही. 

तू संगीत क्षेत्रात नसतास तर तू केलं असतंस?
हृषिकेश रानडे : मी क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे. मी संगीत क्षेत्रात नसतो तर मला शंभर टक्के क्रिकेटसाठी प्रयत्न करायला आवडलं असतं. मी सतत कुठल्या न कुठल्या प्रकारे क्रिकेटशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते मॅच बघणं असेल, त्याची चर्चा असेल. अजून एक म्हणजे मला फिरण्याची प्रचंड आवड आहे. भारतात आणि भारताबाहेरही मला स्वतः गाडी चालवत फिरायला खूप आवडतं. गाडी चालवणं मला अत्यंत प्रिय आहे. गाडी चालवण्याची कुठलीही संधी मी सोडत नाही.

संबंधित बातम्या