अरण्यवाचनाची ओळख...

विश्वास भावे
सोमवार, 10 जानेवारी 2022

अरण्यवाचन

निसर्गग्रंथाच्या या पानांवर काय लिहिलंय ते आपल्याला वाचता आलं आणि ‘जंगल काय सांगतंय’ ते ऐकू येऊ लागलं, अंदाज बांधता आले, त्यावरून वन्यजीवांच्या हालचालींचा मागोवा घेता आला, तर काय बहार येईल? निसर्गात असलेले सर्व क्ल्यू ‘वाचून’ आणि ‘ऐकून’ वन्यजीवांच्या हालचालींचा अंदाज बांधता येणं यालाच आपण ‘अरण्यवाचन’ म्हणतो आहोत... 

आता हिवाळा सुरू झालाय. काही झाडं फुलोऱ्यावर येतायत, तर काहींनी फळंसुद्धा धरली आहेत. रानगवताचा खुसखुशीत मस्त गंध वातावरणात भरून राहू लागला आहे. आता आपण सर्वजण जंगल भटकंतीचे, वन्यजीव छायाचित्रणाचे प्लॅन्स आखत असणार हे नक्की. अशा छान भटकंतीला सुरुवात करतानाच तुमचा एक निसर्गप्रेमी सहकारी म्हणून मला तुमच्याशी काहीतरी बोलावंस वाटतंय. 

भटकंती करताना आपल्याकडे कॅमेरा असो किंवा दुर्बीण; आपण बऱ्याच वेळा एखादा पक्षी, प्राणी ‘दिसेल’ अशी अपेक्षा करून भटकंती करत असतो आणि जर काही ‘दिसलं’ नाही तर आपला विरस होतो. कारण त्यापलीकडे पाहण्याची दृष्टी विकसित झालेली नसते. प्रत्येक वेळी एखादा पक्षी, प्राणी आपल्याला पाहिजे तेव्हा, पाहिजे तसा दिसेलच असं नाही. पण डोळ्यांबरोबरच आपण कान आणि इतर ज्ञानेंद्रिये नीट उघडी ठेवली, तर आपल्याला कळेल की जंगलातल्या पायवाटा, झाडांची खोडं, खडक, पानं, पाणवठे, माती अशा निसर्गाच्या पाटीवर उमटलेल्या सांकेतिक लिपीतून या वन्यजीवांबद्दल, त्यांच्या हालचालींबद्दल जंगल आपल्याला काहीतरी दाखवत असतं आणि सांगत असतं.

जरा कल्पना करा, की निसर्गग्रंथाच्या या पानांवर काय लिहिलंय ते आपल्याला वाचता आलं आणि ‘जंगल काय सांगतंय’ ते ऐकू येऊ लागलं, अंदाज बांधता आले, त्यावरून वन्यजीवांच्या हालचालींचा मागोवा घेता आला, तर काय बहार येईल? आपण दृष्टीच्या क्षेत्राच्या बाहेरचं जंगलसुद्धा एन्जॉय करू शकू आणि जंगलवासीयांच्या जीवनात थेट प्रवेश केल्याचं समाधान मिळवू शकू. ‘काही दिसलं नाही’ अशा तक्रारीच राहणार नाहीत, भटकंतीचा प्रत्येक क्षण थरारक ठरेल... आणि काय सांगावं? यातून अगदी एखादी ‘जंगल डिटेक्टिव्ह स्टोरी’सुद्धा सहज निर्माण होऊ शकेल. 

आता तुम्ही म्हणाल की कोणत्याही डिटेक्टिव्हला ‘क्ल्यू’ तर लागतातच... मग कोणते असतात हे क्ल्यू? निसर्गग्रंथाच्या पानांवर लिहिलेल्या त्या सांकेतिक लिपीबद्दल आपण मगाशी बोललो ना, तेच आहेत आपले जंगल डिटेक्टिव्हचे क्ल्यूज! बघू या तर कोणते आहेत हे क्ल्यू!

जंगलवासींची एक ‘भाषा’ आहे आणि जरी या भाषेची शब्दसामग्री मर्यादित असली, तरी त्याचा अर्थ कळला तर आपल्याला दृष्टिक्षेत्राच्या बाहेरचं जंगल कळायला लागतं. वन्यजीवांच्या या भाषेला एकत्रितपणे आपण ‘कॉल्स’ म्हणू या. यामध्ये इलाका जाहीर करण्यासाठी दिलेले ‘टेरीटरी कॉल्स’, शिकारी प्राण्यांना पाहिल्यावर किंवा त्यांच्या अस्तित्वाची चाहूल लागल्यावर काही प्राणी-पक्षी इतर जंगलवासीयांना सावध राहण्याचा इशारा देतात ते ‘अलार्म कॉल्स’, समागम काळातील एकमेकांना दिलेले ‘रट कॉल्स’, एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी दिलेले कॉल्स आणि असे कित्येक कॉल्स येतात.

याशिवाय जंगलवाटांवर, मातीत, तिथून गेलेल्या जनावरांच्या पावलांचे ठसे उमटलेले असतात. या ठशांच्या एकूण स्वरूपावरून प्रजाती, लिंग, दिशा, वेग, वजन, वय आणि इतरही कित्येक गोष्टी कळू शकतात. 

खरंतर विष्ठा म्हणजे शरीराला नको असलेले पदार्थ... पण विष्ठांवरूनसुद्धा बरंच काही कळू शकतं. उदा, विष्ठा कोणत्या जनावराची आहे? त्याने काय खाल्लं आहे, किती वेळापूर्वी तो इथून गेलाय वगैरे. विष्ठांचे विश्लेषण करून तर एखाद्या जनावराच्या खाद्यसवयींबद्दल संशोधनसुद्धा होऊ शकतं.

 भटकंती करताना आपल्याला फुलं, फळं, रानगवत या सर्वांचे बरेच गंध येत असतातच. पण कधी कधी वाघ, बिबळ्यानं मारलेलं एखादं भक्ष्यसुद्धा सापडू शकतं. मार्जार कुळातील प्राण्यांना इलाका जाहीर करण्यासाठी मूत्रातून झुडुपांवर फवारा मारायची सवय असते. हा वास इतका उग्र असतो की मानवालासुद्धा सहज येऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या आसपास ‘बिग कॅट’ असल्याचं समजतं.

या सर्वसामान्य मागांव्यतिरिक्त शिकारी प्राण्यांनी केलेली शिकार घेऊन जात असताना मागं राहणारे रक्ताचे माग, भक्ष्य ओढून नेतानाचे ‘ड्रॅग मार्क’, बिबळे, अस्वल किंवा वाघ यांचे खोडांवरचे नख्याचे ओरखडे म्हणजेच क्लॉ मार्क, हरणांनी झाडावर शिंगे घासल्याच्या खुणा, केस, काटे, झडलेली शिंगे, भक्ष्याचे अवशेष आणि असे कित्येक इतर माग आपल्याला वन्यजीवांच्या जवळ घेऊन जातात. 

 एवढ्या मोठ्या जंगलात वन्यजीवांना कुठंही कसंही शोधणं तसं अवघडच. पण प्राण्यांचेदेखील ‘पत्ते’ असतात. जंगलात काही जागा अशा असतात की जनावर कितीही बुजरं असलं तरी त्याला तिथं दिवसातून एकदा तरी यावंच लागतं! एक म्हणजे पाणवठे आणि दुसरी म्हणजे शाकाहारी जनावरं क्षारांची गरज भागवण्यासाठी काही खास जागांवर येऊन तिथली माती चाटतात, ती ‘सॉल्ट लिक्स’. अशा जागांवर आपल्याला जनावरांच्या वागणुकीचं सुंदर निरीक्षण करता येतं. त्याचप्रमाणे सांबरासारख्या एकलकोंड्या हरणांनी वापरलेली ‘स्टॅम्पिंग ग्राउंड्स’, रानडुकरांच्या लोळणी, थंड नाले, ओहोळ अशी जनावरांची उन्हाळ्याच्या दिवसातली नेहमीची विश्रांतीस्थळं; अशा या ‘पत्त्यांवर’ आपली त्यांची गाठभेट होऊ शकते.

 असं हे अरण्यवाचन करत असताना ऋतू, विणीचे हंगाम, त्यानुसार प्राणी-पक्ष्यांच्या रंगामध्ये, शरीरामध्ये, पिसाऱ्यांमध्ये होणारे बदल, अन्न, सुरक्षा, निवारा, समागम अशा काही मूलभूत प्रेरणांना प्रतिसाद देताना दिसणाऱ्या विविध जनावरांच्या विशिष्ट वर्तणुकी व सवयी याचा एकत्रित विचार केला, तर जंगल आपल्यासाठी अधिक अर्थपूर्ण होऊ शकतं!

 हे सर्व क्ल्यू ‘वाचून’ आणि ‘ऐकून’ वन्यजीवांच्या हालचालींचा अंदाज बांधता येणं यालाच तर आपण ‘अरण्यवाचन’ म्हणतो आहोत आणि आपल्या या ‘अरण्यवाचन’ नावाच्या लेखमालेत सातत्याने म्हणणार आहोत...! नुसतं वाचूनच एक्साईट व्हायला झालं ना? आता आपण यापुढे या लेखमालेत एकेका ‘क्ल्यू’बद्दल छान गप्पा मारत मारत, एकमेकांचे अनुभव शेअर करत जंगलवासींच्या जीवनात हळूच डोकावण्याचा प्रयत्न करू या. 

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि न्यास ट्रस्टचे संस्थापक आहेत.)

संबंधित बातम्या