प्राण्यांचेसुद्धा ‘पत्ते’ असतात

विश्वास भावे, डोंबिवली
सोमवार, 24 जानेवारी 2022

अरण्यवाचन

‘अरण्याचन’ या संकल्पनेची ओळख करून घेतल्यावर आपल्याला एवढं कळलंय की आपल्याला जंगल ‘वाचायचं’, ‘ऐकायचं’, ‘शोधायचं’ आहे. साहजिकच पहिला प्रश्न मनात येईल तो म्हणजे, बापरे हे करायचं कसं? एवढ्या मोठ्या जंगलात इतक्या प्रकारची जनावरं, पक्षी असतील, केवळ जंगल वाचून, ऐकून त्यांना शोधणं, निरीक्षण करणं हे कसं शक्य आहे? 

आपण एखाद्या जंगलात प्रथमच फिरायला जाणार असू, तर जंगलाबद्दलच्या आणि तिथल्या वन्यजीवांबद्दलच्या आपल्या कल्पना फार वेगळ्या आणि गमतीशीर असतात. आपल्याला वाटतं की इथं कोणताही प्राणी कुठंही फिरताना वगैरे दिसेल. पण खरंतर तसं नसतं. जसे आपले आपल्या गावात ठरावीक ठिकाणे, नाके आणि भेटायच्या जागा असतात तशा प्राण्यांच्यासुद्धा असतात. कोणत्याही प्राण्यांचा कळप किंवा एखादा प्राणी घ्या... त्यांचा वावर एखाद्या विशिष्ट आणि अशाच भागात असतो, जिथं त्यांचं खाद्य त्यांना मिळेल आणि त्यांच्या इतर गरजाही पूर्ण होतील. अशा विशिष्ट भागाला आपण ‘अधिवास’ म्हणू या. त्यातही एका मर्यादित क्षेत्रातच हा वावर असतो. चिंकारा, काळवीट, नीलगाय अशी कुरंग जातीतली हरणं आपल्याला जंगलात दिसणारच नाहीत, तर गवताळ भागात किंवा खुरट्या झुडपी जंगलात दिसतील. एखादं सांबर, भेकर आपल्याला माळरानावर नव्हे, तर जंगलात दिसेल. एकदा हे कळलं की या वन्यजीवांच्या जीवनात हळूच प्रवेश करणं तेवढं अवघड वाटणार नाही. 

थोडक्यात काय? प्राणी आणि पक्ष्यांचेसुद्धा ‘पत्ते’ असतात.

 जरा विचार तर करा.. कोणकोणत्या प्रकारचे असतील हे पत्ते? साहजिकच त्यांच्या मूलभूत गरजा भागवणारं ठिकाण आणि त्यावर हक्क मिळवण्यासाठी ठरवून घेतलेले इलाके, यावरच हे पत्ते ठरणार! त्यातील महत्त्वाचे म्हणजे पाणवठे, तृणभक्षी जनावरं क्षाराची गरज भागवण्यासाठी येणारच असे सॉल्ट लिक, थंडगार नाले, घळी अशी विश्रांतीस्थळे, नेहमी बसायच्या जागा (पर्चिंग), रातनिवारे/दिनथारे (रुस्टींग). 

यातील अत्यंत महत्त्वाची ठिकाणं म्हणजे पाणवठे आणि सॉल्ट लिक! या सॉल्ट लिक म्हणजे क्षारयुक्त मातीच्या जागा असतात आणि कशा कोणास ठाऊक, पण जनावरांना बरोब्बर माहिती असतात. या त्यांच्या इतक्या महत्त्वाच्या गरजा आहेत की इथं ते दिवसातून एक-दोन वेळा काहीतरी धोका पत्करून का होईना येणारच.. म्हणजे सापडला तुम्हाला त्यांचा एक पत्ता! पाणवठे आणि सॉल्ट लिकच्या आसपासच्या ओल्या मातीवर तुम्हाला जनावरांच्या वावराचे सर्व पुरावे सापडतील. अशा ठिकाणी मचाणं बांधून त्यावर बसून वन्यजीव प्रगणनासुद्धा केली जाते आणि इथंच त्यांच्या विविध वागणुकींचं निरीक्षण करता येतं.

 मोर, रानकोंबडे अशा पक्ष्यांना रात्री विशिष्ट झाडांवर बसून राहण्याची सवय असते, त्याला ‘रुस्टींग’ किंवा रातनिवारे म्हणतात. काही विशिष्ट झाडांवर बगळे, करकोच्यांच्या काही प्रजातींना मोठमोठ्या वसाहतींमध्ये राहण्याची सवय असते. घुबड, पिंगळे यांच्यासारख्या निशाचर पक्ष्यांच्या ढोल्या ठरलेल्या असतात. हे निशाचर पक्ष्यांचे दिनथारे आहेत. काही पक्ष्यांना एखाद्या विशिष्ट फांदीवर किंवा कोणत्याही हुकमी जागेवर बसून खाद्य शोधायची सवय असते, त्याला ‘पर्चिंग’चं ठिकाण म्हणतात. अशी खास ठिकाणं म्हणजे त्यांचे पत्तेच आहेत. 

घरटी हा तर पक्ष्यांचा महत्त्वाचा पत्ता. फक्त कोणता पक्षी कोणत्या झाडांवर घरटे बांधेल, हे माहीत पाहिजे. उदाहरणार्थ, शहरात नेहमी आढळणारा नाचण पक्षी बेल, अनंत अशा छोट्या झाडांवर घरटं बांधतो. साधारण मे महिन्यात जरा डोळे आणि कान उघडे ठेवले तर आपल्याला त्यांचं घरट्यासाठी जागा शोधणं, शत्रूंपासून सावध राहणं, अंडी घालणं, पिल्लांचं संगोपन करणं अशा विविध अवस्थांचं आरामात निरीक्षण करता येते. नागझिरा इथं एका ऐनाच्या झाडावर आणि ताडोबा मधील धावड्याच्या एका झाडावर एक राखी डोक्याचा मत्स्यगरुड वर्षानुवर्षं घरटं करतो. शांतपणे आणि थोडं लांब बसून तुम्ही त्याच्या दिनक्रमाचा अभ्यास करू शकता. टिटवीचं घरटे जमिनीवर असतं, तर खंड्याचं नदीनाल्याच्या काठच्या मातीच्या धसामध्ये केलेल्या बिळांमध्ये!

आता थोडी आणखी गंमत बघू या  असा विचार करा की तुम्हाला खंड्या (किंगफिशर) पक्ष्याला हुडकून काढायचं आहे. अगदी त्यांचे अधिवास माहीत असूनसुद्धा शेवटी तिथं गेल्यावर जाणवेल की हा इतरही काही पक्ष्यांचा अधिवास आहेच की!  

अशा वेळेला थोड्या सवयी माहीत असणं गरजेचं असतं. भटकंती करता करता निरीक्षणातूनसुद्धा आपण ही माहिती मिळवू शकतो. फक्त कुठं बघायचं हे माहीत पाहिजे. पाण्यावर गेलो, तर मुख्यतः दोन किंगफिशर दिसतील. एक आपला नेहमीचा खंड्या आणि दुसरा कवड्या धीवर (Pied kingfisher). एखाद्या स्थिर पाण्यावर गेलात आणि खंड्याला शोधायचा असेल, तर तुम्ही काठावरल्या एखाद्या झुडपाच्या पाण्यावर आडव्या आलेल्या फांदीवर किंवा एखाद्या खडकावर नजर ठेवा. कवड्या धीवराला पाण्याच्या वर आकाशात एकाच ठिकाणी स्थिर राहून पंखांची फडफड करत पाण्यातल्या माशाचा वेध घेण्याची विशिष्ट अशी सवय आहे. त्यामुळे त्याला शोधायचं असेल तर  आकाशातसुद्धा नजर ठेवली पाहिजे. स्टोन चॅटसारख्या काही पक्ष्यांना गवताच्या काडीवर बसायची सवय आहे, तर रानकोंबडा, तितर जमिनीलगत आढळतील. कोणाला छोट्या झुडपावरच वावरण्याची सवय आहे, तर कोणाला मोठ्या झाडावर उंच! आमच्या फार्म हाउसवर मला एक दोन बेहड्याच्या झाडांवर हरियलचा थवा (Green Pigeon) हमखास दिसतो आणि एका आंब्याच्या मोठ्या झाडावर संध्याकाळी कवडा पिंगळा दिसणार हे निश्चित असतं.  

या शिवाय स्वजातीच्या प्राण्यांशी संपर्क साधण्याच्या जागा, इलाके, बिळे, ढोल्या, घळी असे कित्येक पत्ते आहेत प्राण्यांचे. 

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि न्यास ट्रस्टचे संस्थापक आहेत.)

संबंधित बातम्या