वाघांचे पत्ते...

विश्वास भावे, डोंबिवली
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

अरण्यवाचन

प्राण्यांनासुद्धा पत्ते असतात, ही गोष्ट एकदा आपण मान्य केली की मग एखाद्या मोठ्या जंगलातदेखील एखाद्या विशिष्ट प्राण्याला गाठणे शक्य आहे हे आपल्याला पटलं असेल. पण त्यातही बहुश्रुत, गूढ जीवनशैली असलेल्या, जगभरामध्ये प्रचंड ‘ग्लॅमर’ असलेल्या अशा जंगलाच्या राजाचा, अर्थात वाघाचा पत्ता कसा शोधता येईल याची उत्सुकतासुद्धा निर्माण झालीच असेल!

लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की वाघ गुहेत राहतात आणि त्यामुळे आपल्या मनात अगदी घट्ट बसलेलं असतं की वाघांचं घर म्हणजे गुहा. पण हे काही खरं नाही. अर्थात आपण ज्याला ‘पत्ता’ म्हणतोय ते म्हणजे फक्त घर नव्हे, तर तो जिथं सापडू शकेल ती ठिकाणं! आता एखाद्याचा पत्ता आपण कसा लिहितो? घर नंबर, रस्ता, प्रभाग, गाव, तालुका, जिल्हा असा; पण आपली पत्रं मात्र उलट्या क्रमानं प्रवास करत करत घरापर्यंत येतात तसंच काहीसं आपण करूया. खरंतर आपला हेतू त्याचं घर शोधणं हा नसून त्याच्या जास्तीत जास्त जवळ पोचणं आणि जमलं तर त्याची भेट घ्यायचा प्रयत्न करणं हा आहे. कारण त्याला तसं कायमस्वरूपी घर नाहीच. पण यासाठी आपल्याला त्याच्या सवयी माहीत पाहिजेत. 

आपण सुरुवात करू तो राहत असलेल्या जंगलापासून! वाघ हे शिकारी जनावर आहे आणि त्यातून एकलकोंडं. आफ्रिकेतले सिंह जसे कळपानं दिसतात तसं वाघाचं नाही. समागम काळातील नर-मादी साहचर्य आणि पिल्लं झाल्यानंतरच्या पहिल्या दोन वर्षांत वाघीण आणि बच्चे याचं एकत्र दिसणं सोडलं तर हा संपूर्ण एकलकोंडा प्राणी आहे आणि म्हणूनच याचा पत्ता शोधणं अधिक कठीण. पण याच एकलकोंड्या, शिकारी जीवनशैलीमुळे एका विशिष्ट भागातल्या भक्ष्य, निवारा, पाणी अशा सर्व साधनसामुग्रीवर स्वामित्व असणं, ही त्याची नुसती सवय नाही तर गरज आहे. नाहीतर या सर्व गोष्टींसाठी त्यांच्यात युद्धं होतील. त्यामुळे प्रत्येक वाघाचा किंवा वाघिणीचा स्वतःचा असा एक इलाका किंवा साम्राज्य असतं. त्याच्या सीमा काही आखीव नसतात, तर वरील गोष्टींची त्या जंगलातील उपलब्धता किती आहे यावर अवलंबून असतात. सर्वसाधारणपणे ३० ते ४० चौ.किमी हा एका वाघाचा इलाका धरला तरी मादीचे इलाके नरापेक्षा छोटे असणं, समागम काळात त्यांचा संपर्क सोपा जावा यासाठी एका नराच्या इलाक्याला किमान दोन माद्यांचे इलाके छेदून गेलेले असणं, संरक्षित जंगलांमध्ये मानवाचं अतिक्रमण न झाल्यानं कमी क्षेत्रात मुबलक खाद्य उपलब्ध असणं अशा बऱ्याच गोष्टींवर हे क्षेत्र अवलंबून असतं. या इलाक्याचा स्वामी असलेला वाघ त्याच्या सीमा ओलांडून शक्यतो स्वजातीयाशी निष्कारण स्पर्धा करत नाही. जंगलात नेहमी भटकणाऱ्यांना कोणता वाघ कोणत्या भागात भेटेल हे बरोबर माहीत असतं. म्हणजे एखाद्या संपूर्ण जंगलात कुठंही न शोधता त्या विशिष्ट इलाक्यात तो सापडणार हे नक्की. चला.... एखाद्या वाघाचा पत्ता शोधायच्या एका टप्प्यापर्यंत तर येऊन पोचलो.. पण पुढे काय? ३०-४० चौ.किमी. हे काही कमी क्षेत्रफळ नव्हे! 

आपण कसे आपल्या शाळा, कॉलेजं, नेहमीची हॉटेल, नाके अशाच ठिकाणी भेटतो तसंच काहीसं वाघाचंदेखील आहे. त्याच्या गरजा म्हणजे भक्ष्य, निवारे, विश्रांतीस्थळं, पाणी आणि काही सवयी. वाघ सैबेरियातून इथं आलेला असल्यानं साहजिकच तापमानाला संवेदनशील असतो. उन्हाळ्यात त्याला हमखास एक सवय असते ती म्हणजे कोणता तरी डोह बघून तिथं डुंबत दुपार किंवा संध्याकाळ घालवणं. दुसरं म्हणजे दिवसातून दोन वेळा तरी त्याला पाणी प्यायला यावंच लागतं, त्यामुळे त्याच्या इलाक्यातले सर्व पाणवठे हे त्याचे पत्ते आहेत. तिसरा पत्ता म्हणजे विश्रांतीचं ठिकाण. वाघाला कायमस्वरूपी घर नसतं. तो भटका प्राणी आहे. शिकारीचा शोध घेणं, शिकार करणं आणि समागम काळातील भटकंती सोडली तर एरवी तो इलाक्याचं ‘पेट्रोलिंग’ करण्यात बिझी असतो. जिथं शिकार होईल त्याच्या आसपास असलेली घाणेरी किंवा तत्सम दाट झुडुपांची गचपणं, बांबूची बेटं, घळी, नाले, पाणवठ्याशेजारचे गवताचे किंवा झुडपी पॅच ही त्याची विश्रांतीस्थळं आहेत. 

वाघाला जंगलात फारसे शत्रू नसल्यानं अशा ठिकाणी तो अगदी निर्भयपणे वावरतो. म्हणजे रोज बदलणारे का होईना, पण हे त्याचे पत्ते आहेत. म्हणजे आता मोठ्या जंगलाकडून त्याच्या इलाक्याकडे, नंतर त्या इलाक्यात तो कुठं भेटण्याची शक्यता असेल त्या ठिकाणांच्या जवळपास आपण पोचलो. आता प्रत्यक्ष भेट किंवा निदान त्याचा ठावठिकाणा अचूक शोधून काढणं एवढंच बाकी राहिलंय. 

 ‘प्राण्यांचे पत्ते माहीत करून घेणं’ हा अरण्यवाचनातील अगदी पहिला धडा वाचता वाचता एकदा का या ठिकाणांच्या जवळ पोचलं, की मग पायाखालच्या वाटेवर उमटलेले त्याचे पावलांचे ठसे, त्याची विष्ठा, जमिनीवर उमटलेले ओरखडे, खोडावरील नख्यांच्या खुणा, इलाका ‘मार्क’ करण्यासाठी मूत्रातून मारलेल्या फवाऱ्याचा उग्र वास, त्याच्या अस्तित्वावर इतर जनावरांच्या दिसणाऱ्या खास प्रतिक्रिया आणि वागणूक अशा अनेक ‘क्ल्यूज’वरून आपण त्याच्या अगदी जवळ जाऊ शकतो आणि काय सांगावं, त्याला त्याच्या पत्त्यावर गाठूसुद्धा शकतो. त्यात परत भारतीय जंगलातलं प्रमुख असं शिकारी जनावर असल्यानं जवळजवळ प्रत्येक प्राणी-पक्षी त्याच्या अस्तित्वाची दखल घेतो आणि हरणं, वानरं, काही पक्षी त्यांचे विशिष्ट ‘अलार्म कॉल्स’ देऊन त्याच्या अस्तित्वाचं, त्याच्या ‘पत्त्या’चं भांडं फोडतात. त्यांच्या तीक्ष्ण नजरेतून किंवा घ्राणेंद्रियांमधून हा धोका दुर्लक्षिला जाणं अशक्य आहे. हे सर्व क्ल्यूज आपल्याला सरळ वाघाच्या पत्त्यावर घेऊन जातील.

आज हा पहिला धडा तर आपण बघितला. हळूहळू इतर क्ल्यूजबद्दलसुद्धा गप्पा मारणारच आहोत!    

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि न्यास ट्रस्टचे संस्थापक आहेत.)

 

संबंधित बातम्या