पत्त्यांचे ऋतू

स्नेहा वगळ
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

 अरण्यवाचन

झळझळीत निळा-जांभळा सनबर्ड फुलातला रस पितानाचा फोटो, शांतपणे पाण्यात पसरलेल्या वाघिणीचा फोटो... कसे या जंगलवाल्यांना बरोब्बर ‘ॲक्शन’मधले प्राणी पाहायला मिळतात नई? प्राण्यांचे पत्ते माहीत असले की प्राणी आणि ‘ॲक्शन’ दोन्ही मिळतं! पण नुसते पत्ते माहीत असून उपयोग नाही. कोणत्या ऋतूमध्ये प्राणी कुठं दिसतो हे माहिती पाहिजे. प्राण्यांचे पत्ते आपण शोधतोय, त्यामुळे कोणत्या ऋतूत प्राण्यांचे पत्ते कोणते असतात हे पाहू.

मोगरा, चाफा, अनंत, गुलाब ज्यांच्या अंगणात असतील त्यांना आता ते बहरताना दिसतील. वसंत ऋतू आलेला आहे. झाडांचं गारठून झालंय आणि नवीन पालवीचे आणि फुलांचे दिवस चालू झालेत! आता अमलतास म्हणजेच बहावा पिवळ्या फुलांच्या झुंबरांनी बहरेल. नव्या पालवीमुळे झाडं झळझळीत पोपटी किंवा कुसुम, मोहासारखी लालचुटूक दिसायला लागतील. सावरीचा बहर आता क्लायमॅक्सला आहे. बहाव्याचे झुबके, सावरीची फुलं, कोवळी पालवी यावर पक्ष्यांची पार्टी चाललेली दिसेल. सुभग, दयाळ, कोकीळ, पोपट, बार्बेट अशा वृक्षवासी पक्ष्यांचा हा समागम काळ असल्यानं त्यांचे प्रियाराधनेचे कॉल्स सतत ऐकू येत राहतील आणि त्यांचे पत्ते शोधायला मदत होईल. 

नंतर ग्रीष्म ऋतूला सुरुवात होईल. उन्हाळ्यात जंगलामध्ये बऱ्‍याच ठिकाणचं पाणी आटून जातं. प्राणी-पक्ष्यांना त्यांची तहान भागवण्यासाठी जंगलातल्या ठरावीक अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित पाणवठ्यांवर दिवसातून निदान दोन वेळा तरी यायला लागतं आणि त्यांचा ‘पत्ता’ लागतो. याच कारणामुळे उन्हाळ्यात बुद्धपौर्णिमेला वन्यप्राणी गणना करण्यासाठी अशाच पाणवठ्यांजवळ मचाणं बांधली जातात. इतर ऋतूत जंगलात बऱ्याच ठिकाणी पाणी सहज उपलब्ध असल्यानं प्राणी जंगलात खोलवर जातात आणि त्यांना ठरावीक पाणवठ्यांवर गाठणं कठीण जातं. पण उन्हाळ्यात मात्र अशा ठरावीक पाणवठ्यांवर पाण्यात डुंबायला येणाऱ्या वाघाचं दर्शनही होतं. 

वसंत-ग्रीष्म काळात विशिष्ट क्रमानं बरीच मोठी झाडं फुलोऱ्यावर असतात, काही मोठ्या झाडांवर ऑर्किड फुलतात. बेल, तेंदू, मोवई, भोकर, खिरणी अशा झाडांचा फलधारणेचा काळ येतो. साहजिकच सूर्यपक्षी, फुलचोख्या, हळद्या, कोतवाल, मैना, बुलबुल, बार्बेट, धनेशसारख्या मध पिणाऱ्या, कीटकभक्षी, फळं खाणाऱ्या असंख्य पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे पत्ते शोधण्यासाठी ही पर्वणी ठरते. 

बेलफळ, तेंदुफळं आवडीची असल्यानं बेलाच्या झाडाजवळ अस्वलं हमखास दिसतात आणि लालभडक रंगाच्या विष्ठेवरून किंवा त्यातील बियांवरून आपल्याला त्याचा पत्ता शोधता येतो. मोहाची फुलं अस्वलाला फार आवडतात आणि अस्वलाची भेट घेण्याचं हे अगदी हमखास ठिकाण! मोहाच्या फुलांपासून दारू तयार करतात त्यामुळे ही फुलं जास्त खाल्ली तर झिंग चढू शकते.. अस्वलपण मोहाची फुलं खाऊन झिंगत असेल का? याचं उत्तर मात्र तुम्ही शोधायचं आहे...!

मग येतो वर्षा ऋतू.. या काळात पक्ष्यांचे आवाज कमी ऐकू येतात, कारण हा बऱ्याच पक्ष्यांचा अंडी घालण्याचा हंगाम आहे. त्यात पावसामुळे सगळीकडे हिरवंगार असल्यानं त्यांना शोधणं पण मुश्कील होतं.. मात्र यावेळी असाणा, साग अशा पावसात फळं असणाऱ्या झाडांचा पक्षी निरीक्षणासाठी उपयोग होऊ शकतो. साप, सरडे, बेडूक अशा सरीसृप आणि उभयचर वर्गातील प्राण्यांचं निरीक्षण करण्यासाठी मात्र हा आदर्श काळ आहे. बेडकांचा हा समागम काळ असल्यानं या काळात त्यांच्या आवाजाचाच दरारा असतो, त्यामुळे इतरवेळी सहजगत्या न दिसणारे हे प्राणी पावसाळ्यात मात्र दिसतात.

पाऊस कमी झाल्यावर, म्हणजेच साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर हा रानफुलं, ऑर्किड, वेगवेगळे कंद तयार होण्याचा काळ आहे. फुलपाखरं, मकरंद पिणारे पक्षी, किडे यांचं निरीक्षण करण्यासाठी चांगला काळ. त्या-त्या भागात राहणाऱ्या स्थानिक लोकांना कंद कुठं उगवतात आणि ती खायला रानडुकरं कधी येतात याचा अचूक अंदाज असतो. भातकापणीच्या सुमारास म्हणजे दिवाळीच्या दरम्यान जेव्हा भात कापून शेतात झोपवून ठेवतात, तेव्हा हा कापलेला आयता भात खायला रानडुकरं येतात. त्यामुळे या काळात अशी भाताची कापणी झालेली शेतं हे रानडुकरं दिसण्याचं ठिकाण...

त्यानंतर येतो हिवाळा, म्हणजेच हेमंत-शिशिर ऋतू. या काळात बऱ्याच  शिकारी प्राणी-पक्ष्यांचा समागम काळ असतो. त्यामुळे शिक्रा, गरुड यांसारख्या पक्ष्यांचा आवाज आपण आपल्या आजूबाजूलादेखील सहज ऐकू शकतो आणि त्या आवाजावरून त्यांचा ठावठिकाणा कळू शकतो.

 साधारणतः जानेवारी ते मार्च या कालावधीत काटेसावर, पळस, पांगारा या झाडांच्या फुलोऱ्याचा काळ असतो. त्यामुळे या काळात मधमाश्या, सूर्यपक्षी, फुलटोच्या यांसारखे पक्षी तुम्हाला याच झाडांवर जास्त दिसतात. या काळात जास्तीत जास्त पक्षी निरीक्षण अशाच फुलोऱ्याच्या झाडांवर होते. या झाडांची फुलं बरीच मांसल असतात, त्यामुळे लंगूर ही फुलं आवडीनं खातात. लंगूरच्या एखाद्या टोळीचं निरीक्षण करायचं असेल, तर अशी फुलोऱ्याची झाडं हे आदर्श ठिकाण आहे. लंगूर हा काही तसा शिस्तबद्ध प्राणी नाही; बकाबका जे मिळेल ते सगळं आणि मिळेल तेवढं फक्त कोंबत जायचं, जसं काही पुढच्या क्षणाला दुष्काळ पडणार आहे. पण या धांदलीत अर्धी फुलं, पानं खाली पडतात. आता आपल्याला वाटेल खाली पडलं म्हणजे फुकट गेलं; पण जंगलात कधीच काहीच वाया जात नाही. ज्या झाडांवर लंगूर, त्या झाडांखाली चितळ, सांबर असे तृणभक्षी प्राणी दिसतातच. त्यांना इतक्या उंचावरची फुलं, पानं खाता येत नाहीत. त्यामुळे लंगुरांच्या या अव्यवस्थितपणाचा तृणभक्षी प्राण्यांना फायदाच होते. एकाच ठिकाणी लंगूर, चितळ, सांबर, रानडुक्कर अशी मेजवानी असेल तेव्हा शिकारी प्राणी दिसण्याची शक्यता पण तेवढीच वाढते...

आता आपण ऋतूनुसार प्राण्याप्रक्ष्यांना कुठे शोधायचे ते पाहिले... असेच भेटू या पुढच्या लेखात, एका नव्या विषयासह. तोपर्यंत या लेखात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नक्की शोधून ठेवा!

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि न्यास ट्रस्टच्या सदस्या आहेत.)

संबंधित बातम्या